निर्बंधांची सक्ती हवीच, पुन्हा लॉकडाऊन नकोच...

By किरण अग्रवाल | Published: February 18, 2021 09:31 AM2021-02-18T09:31:49+5:302021-02-18T09:33:54+5:30

गेले वर्षभर घोंघावलेले व संपूर्ण जनजीवन प्रभावित करून गेलेले कोरोनाच्या संकटाचे वादळ चालू वर्षाच्या प्रारंभी बर्‍यापैकी नियंत्रणात आलेले दिसले; पण दुसऱ्याच महिन्यात त्याने डोके वर काढल्यामुळे पुन्हा भीतीची छाया दाटून गेली आहे.

Restrictions must be enforced to stop the spread of coronavirus | निर्बंधांची सक्ती हवीच, पुन्हा लॉकडाऊन नकोच...

निर्बंधांची सक्ती हवीच, पुन्हा लॉकडाऊन नकोच...

Next

- किरण अग्रवाल

आपल्याकडे प्रकृतीबद्दलच्याही गांभीर्याचा अभाव इतका, की गेला गेला म्हणता कोरोना पुन्हा येऊ पाहतो आहे; त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन हवे की निर्बंध, असा निर्वाणीचा प्रश्न विचारण्याची वेळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे. कोरोनाच्या संकटातून जरा कुठे बाहेर पडत असताना व जनजीवन पूर्वपदावर येऊ पाहत असताना मिळालेल्या मोकळेपणाचा असा काही अनिर्बंध वापर व वावर सुरू झाला की यामुळे कोरोनाला पुन्हा शिरकाव करण्याची संधी मिळून जात आहे व तीच धोक्याची बाब ठरू पाहते आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणा धास्तावून जाणे स्वाभाविक ठरले आहे.

गेले वर्षभर घोंघावलेले व संपूर्ण जनजीवन प्रभावित करून गेलेले कोरोनाच्या संकटाचे वादळ चालू वर्षाच्या प्रारंभी बर्‍यापैकी नियंत्रणात आलेले दिसले; पण दुसऱ्याच महिन्यात त्याने डोके वर काढल्यामुळे पुन्हा भीतीची छाया दाटून गेली आहे. खरे तर देशात कोरोना नियंत्रणात असल्याची दिलासादायक आकडेवारी आहे. फेब्रुवारीत चौथ्यांदा असे घडले जेव्हा नव्या रुग्णांची संख्या दहा हजारांपेक्षा कमी आली. देशातील मृतांची संख्या दीड लाखापेक्षा अधिक झाली असली तरी, दहाव्यांदा असे झाले की एका दिवसात १०० पेक्षा कमी लोकांचा मृत्यू झाला. बरे होणाऱ्यांचे प्रमाण तब्बल ९७ टक्क्यांवर पोहोचले आहे, दीव, दमन व दादरा- नगर हवेलीत तर हे प्रमाण ९९.८८ टक्के इतके आहे. यावरून एकूणच देशात कोरोनाचा जोर ओसरतो आहे हेच दिलासादायक चित्र लक्षात यावे; परंतु ते अर्धसत्य म्हणता यावे. कारण गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी कोरोनाने पुन्हा डोके वर काढलेले दिसत आहे. यापूर्वी भीती वर्तविली जात होती त्याप्रमाणे दुसरी लाट अद्याप आली नाही हे नशीब; पण तसे झाले तर सावरायलाही वेळ मिळणार नाही इतके ते धोका व नुकसानदायक असेल असा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.

कोरोना नियंत्रणाबाबत महाराष्ट्र तसाही काहीसा मागेच आहे. लसीकरण सुरू झालेले असले तरी ते पूर्ण क्षमतेने होऊ शकलेले नाही, त्यामुळे उद्दिष्टपूर्तीही अडखळली आहे. त्यामुळे खासगी वैद्यकीय क्षेत्राची मदत यासाठी घेण्याच्या मागणीने जोर धरला आहे. अशात मुंबई, पुण्यासह राज्यातील काही शहरांत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे वर्तमान आहे. त्यासंबंधी गांभीर्याच्या अभावातून हे संकट ओढवून घेतले गेले असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनी लॉकडाऊन हवे की निर्बंध, असा प्रश्‍न केला आहे. कोरोनापासून बचावासाठीचे मास्क, सॅनिटायझरच्या वापराचे तसेच फिजिकल डिस्टन्सिंगच्या पालनाबाबतचे निर्बंध कडक करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या आहेत. कारण कोरोनाच्या विषाणूने पुन्हा डोके वर काढण्याची कारणे यासंबंधीच्या दुर्लक्षातच दडलेली आहेत. तेव्हा निर्बंध कडक केले जाणे गरजेचेच आहे; पण लॉकडाऊन मुळीच नको; ते कोणाच्याही हिताचे ठरणार नाही हे लक्षात घ्यायला हवे. त्याकरिता नागरिकांनीही जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे.

लॉकडाऊनचा फटका सर्वांनीच अनुभवून झाला आहे. एकीकडे अनेक जण कोरोनाशी झुंजत असताना दुसरीकडे अनेकांची लॉकडाऊनमुळे जिवाशीच गाठ पडल्यासारखी स्थिती होती. उद्योगधंदे बंद राहिल्याने अनेकांचा रोजगार हिरावला गेला, बहुतेकांना स्थलांतर करण्याची वेळ आली. उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकल्याने त्यांची त्याअर्थाने जिवाशीच गाठ पडली, पण आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असून, सारे काही सुरळीत होत आहे. लॉकडाऊन काळातील बंदिस्ततेचा व अर्थव्यवस्थेचे चाक रूतल्याचा अनुभव खरेच जीवघेणा होता. आता पुन्हा तो प्रवास नकोच; पण कोरोना संपलेला नसल्याने किंबहुना तो परतून येऊ पाहत असल्याने याबाबतची खबरदारी नितांत गरजेची आहे. त्यासाठी यंत्रणांकडून सक्ती गरजेची आहे. सार्वजनिक कार्यक्रम वा लग्नसमारंभ आदीप्रसंगी उपस्थितीच्या मर्यादा घालून दिल्या आहेत, पण त्याचे पालन होत नाही. कोरोना जणू संपल्याच्या आविर्भावात मास्कचा वापर तर जवळजवळ संपल्यात जमा दिसतो, फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडत आहे; तेव्हा असे करणाऱ्यांवर जरब बसेल असा दंड आकारून व कारवाई करून नियमांच्या काटेकोर पालनाची अंमलबजावणी करायला हवी. माझे कुटुंब, माझी जबाबदारी ओळखून प्रत्येकानेच यासाठी काळजी घ्यायला हवी. ती न घेतली गेल्यास यंत्रणांनी सक्तीने निपटावे; पण लॉकडाऊन नकोच!

Web Title: Restrictions must be enforced to stop the spread of coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.