शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

साहिर! श्रीमंत बापाचा बंडखोर मुलगा!

By विजय दर्डा | Updated: October 23, 2023 07:31 IST

साहिर म्हणजे आकर्षक, मनमोहक, जागृत ! साहिर लुधियानवी आज नाहीत; परंतु, जगण्याचा अर्थ सांगणारी त्यांची गाणी आपण कायम गुणगुणत राहू...

डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

मुंबईला कॉलेजमध्ये शिकत असताना मी पहिल्यांदा साहिर लुधियानवी यांना भेटलो. माझ्या घराच्या खाली संगीत दिग्दर्शक जयदेव राहत होते. त्या काळात जयदेव ‘हम दोनों’ या चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया... हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया...’ या गाण्याचे संगीत तयार करत होते. माझ्या कवीमनाला त्याने भुरळ घातली. त्यावेळी त्यांच्याशी जो माझा पहिला परिचय झाला तो आजही माझ्या मनात ताजा आहे.

त्यांचे व्यक्तिमत्त्वच असे होते की, इच्छा असली तरी जग त्यांना विसरू शकणार नाही. माणुसकीने ओतप्रोत भरलेला एक माणूस प्रेमाच्या समुद्रात डुबक्या मारतो आणि नंतर दु:खाच्या उंबरठ्यावर बसून वेदनेला इतकी घट्ट मिठी मारतो ज्यात त्याच्या स्वत:च्या हृदयाचाच चुराडा होतो. त्यांनी लग्न केले नव्हते; पण एका पित्याच्या मनातला भाव मात्र कागदावर उतरवला. ‘बाबूल की दुआएं लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले...’ या प्रेमवेड्या अनोख्या कवीने जगाला असा संदेश दिला की जो विसरू म्हणता विसरता येत नाही. ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा... इन्सानकी औलाद हे इन्सान बनेगा...’ ‘अल्लाह तेरो नाम... ईश्वर तेरो नाम... 

८ मार्च १९२१ ला लुधियानात जन्माला आलेल्या अब्दुल हयी साहिर म्हणजेच साहिर लुधियानवी यांचे २५ ऑक्टोबर १९८०ला मुंबईत निधन झाले. जाताना ते मागे गीतांची एक सरगम सोडून तर गेलेच शिवाय जगण्यातल्या अनेक कहाण्याही सोडून गेले. ते खरोखरच एक अजीब कवी होते. साहिर यांनी जेव्हा गीतांच्या दुनियेत पाऊल ठेवले, तेव्हा फैज अहमद फैज, फिराक गोरखपुरी आणि इक्बाल यांच्यासारखे नामवंत शायर लिहीत होते. आपल्यासाठी जागा तयार करणे कोणासाठीही सोपे नव्हते. साहिर यांनी तसे काही प्रयत्नही केले नाहीत. त्यांच्या हृदयातून जो आवाज उमटला तो लोकांचे मन भेदून गेला आणि ते गीतकारांचे खलीफा झाले. 

‘तल्खिया’ या नावाने त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९४३ मध्ये आला. या जगाचा निरोप घेईपर्यंत त्यांनी गीतांची साथसंगत सोडली नाही आणि गीतही त्यांच्याबरोबर राहिले. त्यांचे गाणे अमर झाले, त्यांचे काव्य अमर झाले, ते स्वत: अमर झाले. जीवनाचे अनेक आयाम त्यांनी जवळून पाहिले होते. त्यांचे वडील जहागीरदार होते. त्यांना एकापेक्षा अधिक पत्नी होत्या. आईबद्दल पित्याला वाटत असलेला कोरडेपणा साहिर यांना आतमध्ये टोचत राहिला.   दोघे विभक्त झाले तेव्हा साहिर यांनीही पिता आणि त्यांची जहागिरी दोन्हींचाही त्याग केला. कदाचित साहिर यांच्या नशिबात हेच लिहिले असावे. कारण या अनुभवातून ते गेले नसते तर समाज आतून किती पोखरलेला आहे हे त्यांना कसे कळते? हे विद्रोही सूर कुठून येतात? तीच तर त्यांची ओळख होती. त्यांनी लिहिले आहे- 

‘ये महलों, ये तख्तों, ये ताजोंकी दुनिया, ये इंसां के दुश्मन, समाजों की दुनिया... ‘प्यासा’ चित्रपटातून जेव्हा त्यांची रचना गाण्याच्या स्वरूपात समोर आली, 

‘जिन्हें नाज है हिंद पर वो कहा है? ये पुरपेच गलियाँ, ये बदनाम बाजार, ये गुमनाम राही, ये सिक्कोंकी झंकार, ये इस्मत के सौदे, ये सौदेपे तकरार, जिन्हें नाज है हिंद पर वो कहां है?.. 

...तेव्हा संसदेमध्ये गोंधळ माजला. साहिर यांच्या या गीताने ‘चकलाबाजार’ची (रेडलाइट एरिया) दर्दभरी कहाणी समोर मांडली गेली होती. सत्तारुढांना त्यांनी आरसा दाखवला. संसदेमध्ये एखाद्या गाण्यामुळे हलकल्लोळ व्हावा, अशी ती कदाचित पहिलीच वेळ होती. अशा क्रांतिकारी कवीच्या कवितेत प्रेमाचा संदर्भ पुन्हा पुन्हा येतो, कारण त्यांनी प्रेम मनापासून अनुभवले. मात्र, नशिबाला ते मंजूर नव्हते. तारुण्यात ते अशा एका मुलीवर प्रेम करून बसले, जी केवळ १६व्या वर्षी नवरी झाली होती. सगळ्या जगाला तिचे नाव माहीत आहे, अमृता प्रितम !   

एका लग्न झालेल्या मुलीच्या प्रेमात पडणे त्यावेळी किती बंडखोरी असेल? परंतु अमृतासुद्धा प्रेमात होती हे वास्तव होते. ते प्रेम असफल झाले, कारण साहिर अब्दुल होते. अमृता यांच्या पित्याला ते मान्य नव्हते. पतीचा संताप स्वाभाविक होता. एकमेकांना ढीगभर पत्रे लिहून झाल्यावर साहिर दूर मुंबईला निघून गेले. अमृता दिल्लीत राहिल्या; परंतु, प्रेम अमर असते. अमृता प्रीतम यांची ही गोष्ट या ठिकाणी अशासाठी काढली की त्यांना बाजूला ठेवून साहिरला समजून घेताच येत नाही. साहिर आणि अमृता यांचे एक मित्र होते इमरोज. अमृतासाठी लिहिलेली सगळी गीते साहिर आधी इमरोज यांना ऐकवत असत. इकडे इमरोज यांच्या मनात अमृताविषयी अव्यक्त असे प्रेम होते. अमृताच्या उरलेल्या संपूर्ण आयुष्यात ते तिच्याबरोबर राहिले. अमृता त्यांच्याबरोबर स्कूटरवर बसून बाहेर जात असे, तेव्हा आपल्या बोटांनी त्यांच्या पाठीवर लिहीत असे ‘साहिर, साहिर, साहिर’ !

साहिरविषयीच्या गाढ प्रेमाचा स्पर्श इमरोज आपल्या पाठीवर अनुभवत असत; परंतु, त्यांच्या मनावर घाव पडत नसत. याला म्हणतात खरे प्रेम. इमरोजने आपले प्रेम निभावले. अमृताने तिचे.

गायिका सुधा मल्होत्रावरही साहिरचे तेवढेच प्रेम होते; परंतु, तेथेही धर्म आडवा आला. सुधाचे लग्न ठरले तेव्हा निश्चित झाले, हे प्रेम अधुरे राहील. 

साहिरच्या मित्रांनी एका मैफलीचे आयोजन केले. सुधालाही बोलावले. साहिर यांनी लिहिलेल्या बऱ्याच कविता तेथे वाचल्या. जेव्हा त्यांना कविता सादर करायला सांगितले गेले तेव्हा साहिर यांचे शब्द होते... 

‘चलो एक बार फिर से  अजनबी बन जाये हम दोनो’...

हे गीत नंतर ‘गुमराह’ या चित्रपटात प्रकटले. त्याआधी ‘दीदी’ चित्रपटात सुधाने साहिरची रचना गायली होती. 

‘तुम गर भूल भी जाओ तो, ये हक है तुमको’....तर असे होते हे प्रेम. साहिरने असेही लिहिले आहे,

उडे जब जब जुल्फे तेरी..ऐ मेरी जोहराजबीं..मैं पल दो पल का शायर हूं..

श्रेष्ठ दर्जाच्या लेखिका अमृता यांनी आपले प्रसिद्ध आत्मकथन ‘रसीदी टिकट’मध्ये लिहिले आहे, साहिर यांना आपल्या दिसण्याविषयी एक न्यूनगंड होता, त्यामुळे ज्या उंचीचे गीतकार ते होते, तेवढा आत्मविश्वास त्यांच्यात कधीच निर्माण झाला नाही.. परंतु मी साहिर यांना भेटलो आहे, त्यांना समजून घेतले आहे. त्यांची गीतरचना वाचली आहे. मला तर ते व्यक्तिमत्त्व एखाद्या कुशल शल्यविशारदाने जगण्यातल्या विसंगती फाडून ठेवाव्यात तसे वाटते.

पाकिस्तानमधील ‘सवेरा’ नामक नियतकालिकात छापून आलेल्या लेखांसाठी साहिरच्या विरुद्ध वॉरंट निघाले होते. कोणालाही हे कसे विसरता येईल? शेवटी साहिरनी पाकिस्तान सोडले. दिल्लीमार्गे ते मुंबईत आले. त्यांच्या गीतांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. त्यांची ताकद इतकी होती की मानधन म्हणून लता मंगेशकर यांना मिळणाऱ्या रकमेपेक्षा ते १ रुपया जास्त घेत असत ! 

राज्यसभेत माझ्याबरोबर असलेल्या जावेद अख्तर यांनी मला साहिर यांच्याशी संबंधित एक किस्सा सांगितला होता. जावेदभाई साहिर यांना भेटण्यासाठी एकदा त्यांच्या घरी गेले. साहिर यांनी विचारले की, ‘अरे तरुण माणसा, तू उदास का आहेस?’ जावेद उत्तरले, ‘पैसे संपत आलेत; काही काम असेल तर द्या.’

साहिर यांनी जावेद यांच्या नजरेला नजर न भिडवता टेबलावर ठेवलेल्या २०० रुपयांकडे इशारा केला आणि म्हटले की ‘तूर्तास हे राहू दे तुझ्याजवळ, काय करता येईल हे फकीर पाहील..’ काळ पुढे सरकला. जावेदभाईंना चांगले दिवस आले. मैफलीत ते साहिर यांच्याबरोबर बसू लागले. तेव्हा ते त्यांना एकदा म्हणाले की तुमचे २०० रुपये माझ्याकडे आहेत, पण देणार नाही. दुसरे लोक विचारायचे तर हे म्हणायचे, ‘का ते त्यांनाच विचारा !’ मग २५ ऑक्टोबर १९८०चा तो काळाकुट्ट दिवस उगवला. साहिर या जगातून निघून गेले. जुहूच्या कब्रस्तानात त्यांना चिरविश्रांती देण्यात आली. सगळे निघून गेले, पण जावेदभाई खूप वेळ तिथेच बसून होते. जेव्हा उठले आणि आपल्या गाडीत जाऊन बसणार तेवढ्यात साहिर यांचे दोस्त अशफाक पळत पळत आले आणि म्हणाले, ‘आपल्याकडे काही पैसे आहेत काय? कबर खोदणाऱ्याला द्यायचे आहेत.’

जावेद अख्तर यांनी विचारले की ‘किती पाहिजेत?’ अशफाक हळूच म्हणाले, ‘दोनशे पुरेत !’ केवढा मोठा योगायोग आहे ना ! साहिर लुधियानवी यांच्या काव्यात जीवनाचा सर्व अर्थ सामावलेला आहे. ते लिहितात,

‘मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी है’.. परंतु साहिर यांची कहाणी तर अमर झाली आहे. त्यांची गीते कायम गुणगुणत राहू आपण..

 

टॅग्स :bollywoodबॉलिवूड