- सुकृत करंदीकर(सहसंपादक, लोकमत, पुणे) संकुचितपणाचा दोष पत्करून म्हणता येईल की, मराठी माणसाच्या नावाचा राष्ट्रीय पुरस्कार मराठी माणसालाच मिळण्याचा आनंद महाराष्ट्रानेही साजरा करावा. शिवाजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत हे सिनेसृष्टीतल्या दादासाहेब फाळके या सर्वोच्च पारितोषिकाचे मानकरी ठरले. (Rajinikanth to Be Honoured with Dadasaheb Phalke Award) भाषा, प्रांताच्या सीमा ओलांडून कर्तबगारी गाजवणारी मराठी माणसं तशीही दुर्मीळ. रजनीकांत म्हणजे अचाट लोकप्रियता. ज्ञात विश्वातली कोणतीही गोष्ट लीलया करू शकणारा ‘हिरो’ म्हणजे रजनीकांत. गुंडाच्या पिस्तुलातून सुटलेली गोळी सहजपणे एका हातात झेलायची, दातांनी तिचे दोन तुकडे करायचे आणि हेच दोन तुकडे समोरच्या दोन गुंडांना मारून त्यांचा खात्मा करायचा- हा तद्दन ‘विनोदी सीन’ रजनीकांत ज्या त्वेषाने पडद्यावर साकारतो तेव्हा तर्कबुद्धी खुंटीला टांगून प्रेक्षक आ वासतो. दक्षिण भारतातल्या गेल्या दोन-तीन पिढ्यातली काही लाख पोरं-पोरी रजनीकांतच्या ‘डान्सिंग स्टेप्स’वर फिदा झाली. पिस्तूल, गॉगल, सिगारेट अशा वस्तूंसोबतची रजनीकांतची हातचलाखी कॉपी करण्याचा प्रयत्न देशातल्या काही हजार नटांनी आजवर केला. त्याच्या अनोख्या ‘डायलॉग डिलिव्हरी’वर वेब सिरीजच्या आजच्या जमान्यातही पडद्यासमोर नोटानाण्यांची उधळण होते. पडद्यावर अतर्क्य कारनामे साकारणारा रजनीकांत माणूस म्हणून अगदी साधा आहे. कित्येक हिरोंचा उतारवयातला वेळ टक्कल लपवण्यात जातो. रजनीकांत त्याच्या टकलासह रसिकांसमोर त्याच आत्मविश्वासानं जातो आणि त्यांना आरपार जिंकतो. फाळके पुरस्कार मिळवणारे रजनीकांत हे तिसरे तामिळी. गेल्या ४५ वर्षात रजनीकांत यांनी कोट्यवधी प्रेक्षकांना रिझवले. या कर्तृत्वाचा योग्यवेळी सन्मान झाला. सन २०१८ मध्ये याच पुरस्काराचे मानकरी अमिताभ बच्चन होते. पाठोपाठ २०१९ साठी रजनीकांत. लोकप्रियता आणि कोट्यवधी रुपयांची इंडस्ट्री उभी करण्याची एकहाती ताकद या अनुषंगाने हा क्रम अगदी सार्थ आहे.
rajinikanth : एन्न वाशी, ताssन्नी वाशी... माइंड इट्ट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 01:14 IST