शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

पुणे, तेथे आता हे उणे...

By admin | Updated: June 6, 2014 08:51 IST

पुण्यात काल जे घडले, ते त्या शहराच्या पुण्याईसह सार्‍या महाराष्ट्राला काळिमा फासणारे आहे.

पुण्यात काल जे घडले, ते त्या शहराच्या पुण्याईसह सार्‍या महाराष्ट्राला काळिमा फासणारे आहे. स्वत:ला हिंदू राष्ट्रसेनेचे म्हणवून घेणार्‍या १० जणांच्या टोळीने एका तरुण व निरपराध मुस्लिम अभियंत्याचा केवळ धार्मिक कारणाखातर केलेला निर्घृण खून ही देशात येऊ घातलेल्या तशा त-हेच्या आपत्तींची नांदी ठरू नये, अशी सार्‍यांनी प्रार्थना करावी व धार्मिक सलोख्यासाठी मनोमन झटावे, असे सांगणारी ही घटना आहे. कोणाएका पुढार्‍याविषयी कोणाएका अज्ञात माणसाने टिष्ट्वटरवर काही मजकूर टाकला. तो टाकणारा कोण याचा पत्ता नाही, तो मजकूर कोणता याची माहिती नाही आणि त्यामुळे खरोखरीच धार्मिक भावनांना धक्का लागतो की नाही, याची शहानिशा नाही. मात्र, तेवढ्या एका कारणाखातर एका तरुणाचा बळी घ्यायला १० जणांनी सज्ज व्हावे, ही धार्मिक असहिष्णुतेची व येऊ घातलेल्या अमानुष आपत्तीची सूचना देणारी बाब आहे. स्वत:ला जातिपंथाचे वा धर्मविचाराचे प्रतीक म्हणवून घेणारे अनेक संत, महंत, महात्मे व गुरू सध्या समाजात वावरत आहेत. राजकारणात राहिलेल्या व अजून असलेल्या काही पुढार्‍यांनीही स्वत:ला धर्मपंथाचा पेहराव चढविला आहे. त्यांच्या अंधश्रद्ध अनुयायांना आपल्या त्या पुढारी बाबाचा अवमान वा त्याच्यावरील टीका ही थेट धर्मावरील टीका वाटते. १९९१पासून देशात धर्मांधतेचे वातावरण गडद करण्याचे राजकारणच एका राजकीय परिवाराने केले. त्याची प्रतिक्रियाही सार्‍या देशात तशीच उमटली. तीत केवळ बाबरी मशीदच उद्ध्वस्त झाली नाही, ओडिशातील १,२००हून अधिक प्रार्थनास्थळे जाळली गेली आणि काही धर्मपंथांचे प्रमुखही मारले गेले. एवढा उन्माद ही आग शमवायला व संबंधितांना अंतर्मुख करायला पुरेसा होता; पण तसे झाले नाही. पाकिस्तान या शेजारी देशाने आपल्या हस्तकांकरवी या आगीत जास्तीचे तेल टाकण्याचा अपराध केला. त्याच्याही मग प्रतिक्रिया उमटल्या. मुंबई, भिवंडी, मालेगाव, बंगळुरू, हैदराबाद, पंजाब अशी सगळी क्षेत्रेच पेटून उठलेली दिसली. धार्मिक ठिणगी केवढीही लहान असली वा ती कुठेही पडली, तरी ती सारा समाज आगीच्या कवेत आणू शकते, याचेच ते चित्र होते. अशा वेळी समाजाला संयम, सामंजस्य व विवेक शिकवणारी वजनदार व आदरणीय माणसे एके काळी देशात होती. संतप्त समाजाला सामोरे जाण्याचे धाडस नेहरूंमध्ये होते, पटेलांमध्ये होते आणि एसेम जोशींमध्ये होते. अगदी अलीकडे सोलापुरात झालेल्या दंगलीच्या वेळी घरातले वडिलांचे श्राद्ध टाकून उघड्या अंगाने जमावाला सामोरे जाणार्‍या विलासराव देशमुखांनी ते दाखविले; पण ही माणसे आताशा कमी झाली आहेत. शांततेहून भडका हाच जास्तीचा राजकीय फायदा मिळवून ,देतो हे समजलेली माणसे सध्या राजकारणात सक्रिय आहेत. ती अशाच गोष्टींचा लाभ घेतात व ठिणगीचे रूपांतर आगीत करतात. तशी पुण्यातली घटनाही सामान्य नाही. मोहसीन शेख हा सोलापूरचा २८ वर्षांचा तरुण इंजिनिअर तिथल्या हडपसर भागात एका भाड्याच्या खोलीत आपले तीन मित्र व धाकट्या भावासोबत राहणारा. पुणे हे सभ्य व संयमी शहर म्हणून तेथे कायमचे वस्तीला जायचे मोहसीनच्या आई-वडिलांच्या मनात. प्रत्यक्षात परवा मोहसीन जेवण आणायला आपल्या मित्रासोबत मोटारसायकलने खोलीबाहेर पडला आणि परतताना त्याला त्याचे मारेकरी आडवे आले. हॉकीस्टिक, काठ्या आणि तशाच इतर हत्यारांनी त्यांनी मोहसीनला बेदम मारले. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला. त्या दिवशी पुण्यात बसवर दगडफेक करण्याचा व त्यांची जाळपोळ करण्याचा एक ‘पोग्रॅम’ या मारेकर्‍यांच्या साथीदारांनी केलाही होता. हे मारेकरी कधी एकटे नसतात. त्यांच्या मागे टोळ्या असतात आणि त्या टोळ्यांच्या मागे त्यांचे समर्थन करणार्‍या संघटनाही असतात. महाराष्ट्राचे पोलीस खाते दुबळे आहे. गृहमंत्री घोषणांवर थांबणारे आहेत आणि टोळीबाजांचे समर्थक शक्यतो तपासाच्या कक्षेबाहेर राहतील, याची काळजी घेणार्‍या यंत्रणा गृहमंत्रालयात कार्यरत आहेत. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी ज्या यंत्रणेला सापडत नाहीत, तिला ठरवून केलेल्या धार्मिक हत्याकांडामागचे खरे सूत्रधार कधी सापडतील, यावर विश्वास तरी कोणी व कसा ठेवायचा? मोहसीनचे मारेकरी हे पुण्याचे वा महाराष्ट्राचे प्रतिनिधी नाहीत. त्यामुळे त्यांच्या अपराधाचे ओझे त्यांच्यावर ठेवण्याचे कारणही नाही. मात्र, अशा घटनांचा सार्वत्रिक निषेध होत नसेल, तर तो मात्र सार्‍या समाजाच्या अपराधीपणाचा वा अपराधप्रसंगी मूक राहण्याच्या दुबळ्या मानसिकतेचा परिणाम म्हणावा लागेल व तो टाळणे, हे आपले कर्तव्य आहे.