- रघुनाथ पांडे
गडकरींच्या मोठेपणाचे मोल स्वपक्षीयांना कधी कळणार? भाजपावाल्यांनी काँग्रेस नेत्यांशी बोलायला पाहिजे. ते सर्वपक्षीय नेते ठरू लागले आहेत.‘महाराष्ट्राचे बडे नेते केंद्रीय मंत्रिमंडळात अव्वल खुर्च्या पटकावून होते, तरीही राजकीय इच्छाशक्तीच्या अभावे केन्द्र महाराष्ट्राबाबत उदासीनच राहिले’, हे वाक्य ठरलेलेच असायचे. महाराष्ट्राला केंद्र मोजत नाही, तरीही आपण केन्द्रात राज्याचे नेते म्हणून आनंदाने नांदतो, हे अपयश न मानता राज्याचे हित ही सामूहिक जबाबदारी आहे असे मानले जायचे. पण आता स्थिती बदलते आहे.‘मी महाराष्ट्राचा दिल्लीतील राजदूत आहे,’ असे नितीन गडकरी यांनी मंत्री झाल्यावर म्हटले होते. आता यात ‘मी राष्ट्राचा आणि महाराष्ट्राचाही आहे’ असा बदल झाला आहे. तरीही ‘घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी’ असे गडकरींचेही झाले आहे. दिल्लीच्या राजकारणात त्यांना ‘बडे दिलवाला’ म्हणतात. जिथे ते जातात तिथला माहोल त्यांच्याभोवती फिरत राहतो. कामात अत्यंत गंभीर, काटेकोर, शिस्तबध्द आणि कामानंतर जखमेवर अलवार फुंकर मारणारा पालक! विकासाच्या कामात राजीनाराजी, आपपरभाव किंवा हात राखून ते वागत नाहीत. न पटणाऱ्या मुद्यावर ते स्पष्टवक्ते आहेत. (दिल्लीकर त्यांना मूँहफट म्हणतात) पाहतो, बघू, सांगतो, चर्चा करू, असे तकलादू शब्द त्यांच्या कोषातच नाहीत. स्पष्टपणे सांगणारी राजकीय साक्षरता गडकरी रूजवू लागले, हेच त्यांचे मोठे यश आहे. विदर्भाच्याच भाषेत सांगायचे तर गडकरी हे राजकारण्यांसारखे ‘झुलवत’ नाहीत. आपल्यामागे होयबांंचा ताफा फिरवत नाहीत. खरं तर, दिल्ली अविश्वासू जागा आहे. पदोपदी शब्द फिरवणारे भेटतील. मोठेपणाचा आव आणणारे खुजेही दिसतील. झकपक दिखाऊपणा या शहराचा मूळ स्वभावच आहे. तिथे गडकरींनी ‘शब्दाचे’ महत्व पटवून दिले. रस्त्याच्या निर्मितीचा वेग प्रतिदिवस ३० किलोमीटर होईल असे त्यांनी गेल्या वर्षी म्हटले होते. पत्रकार उठसूठ विचारू लागले. एक दिवस ते वैतागलेच. म्हणाले,‘लिहून ठेवा मी जे बोलतो, ते करून दाखवतो!’ माध्यमांमध्ये ते व त्यांचे मंत्रालय म्हणूनच केंद्रस्थानी आहे. परिवहन मंत्रालयाचे यापूर्वीचे मंत्री आठवतात ते बघा!ईशान्य भारत गडकरींचा चाहताच नव्हे तर तेथील सातही मुख्यमंत्री त्यांच्या प्रेमात आहेत. तीन दौरे केले. अरूणाचलात मुक्काम केला. ३५ हजार कोटी रूपये त्यांनी एका झटक्यात रस्त्यांसाठी दिले. तेथील राज्यांचा वार्षिक अर्थसंकल्पही एवढा नाही. हा अवाढव्य आकडा बघून एका मुख्यमंत्र्यानी या रकमेचे काय करायचे ते सांगा, असा प्रतिप्रश्न केला. तेव्हा सात राज्यांच्या विकासासाठी ‘राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे’ स्वतंत्र कार्यालय गोहातीत स्थापन करण्याची घोषणा करून गडकरींनी साऱ्यांना धक्काच दिला. यापूर्वी फारतर ४० ते ४५ कोटी इतका निधी दिला जायचा. देशाच्या मूळ प्रवाहापासून आपण डावलले जात आहोत असा तेथील जनतेचा समज होता. तो गडकरी दूर करीत आहेत. तामीळनाडू, झारखंड, उत्तराखंड, हरयाणा, काश्मीर, राज्यस्थान, पंजाब, केरळ, प. बंगाल, अशा साऱ्याच राज्यातील त्यांचे दौरे दिलासा देणारे असल्याच्या नोंदी स्थानिक माध्यमांच्या आहेत. दिल्लीचा असा एकही कोपरा नाही की जिथे गडकरींचा बोलबाला नाही. संघाच्या दिल्ली बैठकीनंतर पक्षातही हवा बदलू लागली आहे. सरकार, पक्ष आणि संघ या त्रयीला गुंफणारा गडकरी हा धागा झाला आहे.हे सांगायचा मतलब एवढाच की, परवा राजधानीत पुण्याच्या विकासावरून स्थानिक राजकारणाला उत आला. हेवेदावे,आरोप उफाळून आले. नागपूरची मेट्रो मार्गी लागली, पुण्याची रखडली, असा मुद्दा काहींनी चर्चेत आणला. शरद पवारांच्या उपस्थितीत ‘दूध व पाण्यातील’ भेद स्पष्ट झाले. आता विभागवार नियोजन होत आहे. केंद्रातील सर्व मंत्रालयात गडकरी स्वत: लोकप्रतिनिधींना घेऊन जातात. मंत्र्यांची एकत्रित बैठक बोलावून निर्णय घेतात. महाराष्ट्राबाबत असे कधीच केंद्रात झाले नाही. गडकरींची ही ‘एकखिडकी योजना’ आता अन्य राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनाही खुणावू लागल्याने त्यांच्या झपाट्याची चर्चा झडू लागली. प्रश्न असा आहे, गडकरींच्या मोठेपणाचे मोल स्वपक्षीयांना कधी कळणार? त्यासाठी भाजपावाल्यांनी काँग्रेस नेत्यांशी बोलायला पाहिजे. किंबहुना, सोनिया गांधी गडकरींच्या कार्यशैलीची स्तुती कशी करतात, ते खासगीत तरी ऐकायला पाहिजेच. कारण गडकरी राष्ट्रीय नेते झाले आहेत.