- नरेंद्र मोदी, पंतप्रधानआज ११ सप्टेंबर. हा दिवस वेगवेगळ्या घटनांशी जोडलेला आहे. एक आठवण १८९३ ची. याच दिवशी स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे विश्वबंधुत्वाचा संदेश दिला आणि याच दिवशी विश्वबंधुत्वाला धक्का देणारी घटना घडली - अमेरिकेवर झालेला ‘नाइन-इलेव्हन’चा हल्ला. आजच्या दिवसाची आणखी एक खासियत आहे. ज्यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ या मंत्रावर चालत समाजाला संघटित करण्यासाठी, समता-समरसता आणि बंधुत्वाची भावना बळकट करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, असे सरसंघचालक मोहन भागवतजी यांचा आज जन्मदिन आहे. मी भागवतजींना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना!
माझा भागवतजींच्या कुटुंबाशी प्रदीर्घ संबंध आहे. त्यांचे वडील स्वर्गीय मधुकरराव भागवतजींसोबत काम करण्याचे सौभाग्य मला लाभले. मधुकररावजी आयुष्यभर राष्ट्रनिर्मितीच्या कार्यासाठी समर्पित राहिले. तारुण्यातला बराच काळ त्यांनी गुजरातमध्ये संघकार्याची पायाभरणी केली. आपल्या पुत्रावर तेच समर्पणाचे संस्कार त्यांनी केले.
मोहन भागवतजी १९७० च्या दशकात संघाचे प्रचारक झाले. ‘प्रचारक परंपरा’ ही संघकार्याची विशेषता. गेल्या १०० वर्षांत देशभक्तीच्या प्रेरणेने भारलेल्या हजारो युवक-युवतींनी आपले घर-परिवार त्यागून संघ परिवाराच्या माध्यमातून आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्राला समर्पित केले आहे. भागवतजी त्या महान परंपरेचे पाईक. आणीबाणीच्या काळात प्रचारक म्हणून भागवतजींनी विरोधी आंदोलनाला सतत बळकटी दिली. त्यांनी अनेक वर्षे महाराष्ट्रातील ग्रामीण आणि मागास भागात, विशेषतः विदर्भात काम केले. १९९० च्या दशकात ‘अखिल भारतीय शारीरिक शिक्षण कार्यक्रम प्रमुख’ म्हणून त्यांनी केलेल्या कार्याची आजही अनेक स्वयंसेवक आठवण करतात.
२००० साली भागवतजी सरकार्यवाह झाले आणि येथेही भागवतजींनी आपल्या अनोख्या कार्यशैलीचा अमीट ठसा उमटवला. २००९ मध्ये भागवतजी सरसंघचालक झाले आणि आजही अत्यंत ऊर्जा घेऊन कार्यरत आहेत. सरसंघचालक होणे म्हणजे केवळ एक संघटनात्मक जबाबदारी नव्हे. हे एका पवित्र विश्वासाचे बंधन आहे. पिढ्यान् पिढ्या अनेक दूरदर्शी व्यक्तिमत्त्वांनी हा विश्वास बळकट केला.
राष्ट्राच्या नैतिक आणि सांस्कृतिक मार्गाला दिशा दिली. सरसंघचालकपदाची जबाबदारी निभावत असताना भागवतजींनी त्यात आपली वैयक्तिक शक्ती, बुद्धी आणि सहृदय नेतृत्वही जोडले आहे. त्यांनी अधिकाधिक युवकांना संघकार्याकरिता प्रेरित केले. बदलत्या काळाबरोबर बदलण्यासाठी, परिवर्तनासाठी खुल्या मनाने स्वागतशील असणे ही मोहनजींची फार मोठी खासियत आहे.
संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासात भागवतजींचा कार्यकाळ हा सर्वाधिक परिवर्तनाचा कालखंड मानला जाईल. गणवेश बदल, संघशिक्षा वर्गांमध्ये बदल असे अनेक महत्त्वपूर्ण बदल त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. कोरोना काळात त्यांनी संघ स्वयंसेवकांना दिलेली दिशा आणि प्रेरणा सदैव स्मरणात राहील.
समाजकल्याणासाठी संघशक्तीचा सातत्याने उपयोग व्हावा यावर मोहन भागवतजींचा विशेष भर राहिला आहे. यासाठी त्यांनी पंच परिवर्तनाचा मार्ग प्रशस्त केला. यात स्वबोध, सामाजिक समरसता, नागरिक शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन आणि पर्यावरण या सूत्रांवर राष्ट्रनिर्मितीस प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक भारतवासीयाला पंच परिवर्तनाच्या या सूत्रांमधून नक्कीच प्रेरणा मिळेल.
मोहनजींच्या स्वभावाची आणखी एक मोठी खासियत म्हणजे ते मृदुभाषी आहेत. दुसऱ्यांचे ऐकून घेण्याची अद्भुत क्षमता त्यांच्यात आहे. ते नेहमीच ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चे प्रबळ समर्थक राहिले आहेत. भारताची विविधता आणि भारतभूमीची शोभा वाढवणाऱ्या अनेक संस्कृती व परंपरांच्या उत्सवात ते संपूर्ण उत्साहाने सहभागी होतात. ते आपल्या व्यस्ततेतून वेळ काढून संगीत आणि गायन यात रस घेतात, विविध भारतीय वाद्ये वाजविण्यातही ते प्रवीण आहेत, हे फार कमी लोकांना माहिती असेल.
स्वच्छ भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या प्रत्येक जन आंदोलनांमध्ये मोहन भागवतजींनी सहभाग घेतला आणि संपूर्ण संघ परिवाराला या आंदोलनांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी प्रेरित केले. पर्यावरणाशी निगडित प्रयत्न आणि शाश्वत जीवनशैलीप्रतीचे त्यांचे समर्पण मी जाणतो. आत्मनिर्भर भारतावरदेखील मोहनजींचा फार मोठा भर आहे. येत्या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १०० वर्षांचा होईल. विजयादशमीचा उत्सव, गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आणि संघाचे शताब्दी वर्ष हे सारे एकाच दिवशी येत आहेत, हाही एक सुखद योगायोगच म्हटला पाहिजे.
भारत आणि जगभरातील लाखो स्वयंसेवकांसाठी हा एक ऐतिहासिक प्रसंग आहे. आम्ही स्वयंसेवक भाग्यवान आहोत की आमच्याकडे मोहन भागवतजींसारखे दूरदर्शी आणि परिश्रमी सरसंघचालक आहेत. एका तरुण स्वयंसेवकापासून सरसंघचालकापर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास त्यांच्या निष्ठा आणि वैचारिक दृढतेचे दर्शन घडवतो. विचाराप्रती पूर्ण समर्पण आणि व्यवस्थांमध्ये समयानुकूल बदल करत त्यांच्या नेतृत्वाखाली संघकार्याचा सातत्याने विस्तार होत आहे.
(योगेंद्र यादव यांचा नियमित स्तंभ उद्याच्या अंकात प्रसिद्ध होईल.)