जगातले सर्वांत गरीब लोक सर्वाधिक दानशूर; भारताचाही मोठा वाटा

By Devendra Darda | Published: June 25, 2021 10:04 AM2021-06-25T10:04:54+5:302021-06-25T10:05:00+5:30

३१ टक्के लोकांनी गरजूंना आर्थिक मदत केली, तर जगातल्या जवळपास दर पाचव्या व्यक्तीनं स्वत:हून आपला वेळ समाजकार्यासाठी दिला. भारताचाही यातला वाटा खूप मोठा आहे.

The poorest people in the world are the most generous pdc | जगातले सर्वांत गरीब लोक सर्वाधिक दानशूर; भारताचाही मोठा वाटा

जगातले सर्वांत गरीब लोक सर्वाधिक दानशूर; भारताचाही मोठा वाटा

Next

>> देवेंद्र दर्डा, मॅनेजिंग डायरेक्टर, लोकमत

कोरोना काळात अनेक देशांची वाताहात झाली. लक्षावधी लोक मृत्युमुखी पडले, कोट्यवधी लोक बेकार झाले; पण याच काळात एक चांगली गोष्टही घडली. लोक एकत्र आले. एक-दुसऱ्याच्या भावनांशी आणि दु:खाशी  समरस झाले. कोण - कोणाचं काय, ओळख - ना पाळख, कधी चेहराही पाहिलेला नाही; पण जगभरातल्या लक्षावधी नागरिकांनी, हलाखीत सापडलेल्या, दोन वेळच्या जेवणालाही मुश्कील झालेल्या लाखो अनोळखी लोकांना मदत केली. ज्याची जशी ऐपत आणि ज्याला जे जमेल ते त्यानं केलं. कोणी पैशांची मदत केली, कोणी वस्तूंची केली, कोणी सेवा पुरवल्या तर कोणी भावनिक आधार दिला. विशेष म्हणजे कोरोनानं ज्यांचं सर्वस्व हिरावून नेलं, कफल्लक करताना रस्त्यावर आणलं, अशा लोकांनी आपल्यासारख्याच बेसहारा, असहाय लोकांना मोठ्या प्रमाणावर मदत केली. आपण स्वत: अर्धी भाकरी खाताना त्यातली चतकोर दुसऱ्याला देऊ केली.. कोरोना काळाचं हे सर्वांत मोठं फलीत! 

ब्रिटिश संस्था ‘चॅरिटीज एड फाउंडेशन’च्या ‘वर्ल्ड गिव्हिंग इंडेक्स २०२१’च्या अहवालात ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. जगातल्या तब्बल ११४ देशांचा अभ्यास करताना गेल्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये कोणी, कोणाला, किती, कशी मदत केली, याचा अभ्यास करण्यात आला. आपल्या जागतिक पाहणीत त्यांनी लोकांना तीन प्रश्न विचारले- तुमची ओळख नसलेल्या एखाद्या व्यक्तीला कोरोनाकाळात तुम्ही कुठल्याही प्रकारची मदत केली का? त्यांना काही आर्थिक मदत दिली का?  अडलेल्या लोकांच्या भल्यासाठी तुम्ही स्वत:हून स्वयंसेवक म्हणून काम केलं का?  या तीन प्रमुख प्रश्नांच्या आधारे त्यांनी आपले निष्कर्ष काढले. जगातील तब्बल तीनशे कोटी (तीन बिलिअन) लोकांनी गेल्या वर्षी आपल्याला अपरिचित असलेल्या अनेक लोकांना मदत केली. मदत करणाऱ्या या लोकांचा आकडा जागतिक लोकसंख्येच्या तब्बल ५५ टक्के इतका आहे.

३१ टक्के लोकांनी गरजूंना आर्थिक मदत केली, तर जगातल्या जवळपास दर पाचव्या व्यक्तीनं स्वत:हून आपला वेळ समाजकार्यासाठी दिला. भारताचाही यातला वाटा खूप मोठा आहे. गेली १० वर्षे दानाच्या बाबतीत ८२ व्या स्थानावर असलेल्या भारतानं यंदा पहिल्या विसात झेप घेत तब्बल १४ वा क्रमांक पटकावला आहे. २०१७ पासून भारताच्या दानशूरपणात वाढ होत गेली; आणि भारताचा क्रमांकही वर वर सरकत गेला. या वर्षी भारतानं आतापर्यंतचं सर्वोत्तम स्थान पटकावलं आहे. आकडेवारीनुसार, ६१ टक्के भारतीयांनी त्यांना पूर्णत: अनोळखी, अपरिचित असलेल्या लोकांना काही ना काही मदत केली. ३४ टक्के लोकांनी सामाजिक सेवा करताना प्रत्यक्ष मैदानात उतरून काम केलं, तर ३६ टक्के भारतीयांनी पैशांची मदत केली. 

श्रीमंत, विकसित देशांपेक्षा गरीब देशांनी आणि गरीब लोकांनी केलेली मदत जास्त आहे, त्यासाठी मोठ्या हिरिरीनं ते पुढं आले, हे या वेळचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य! इतर वेळी दानशूरपणात आघाडी घेणाऱ्या, पहिल्या दहांत असणाऱ्या अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, आयर्लंड, नेदरलँड‌्स या श्रीमंत देशांची दानातील क्रमवारी मात्र कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणावर घसरली आहे. पहिल्या पाचातला आपला क्रमांक कधीही न सोडणारी अमेरिका या वेळी चक्क १९ व्या स्थानावर घसरली आहे. जपान आणि माली यांसारखे धनाढ्य देश तर या पंक्तीत अखेरच्या स्थानी आहेत. लोकांना मदत करण्यात त्यांनी फारशी रुची दाखविलेली नाही.

बेल्जियम, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इटली, आइसलँड, नेदरलँडस, स्लोवानिया या युरोपियन देशांनीही गरजू, अनोळखी लोकांना मदत करण्यात फारसा रस दाखविला नाही. मग, गरिबांना मदत करणारे देश आणि लोक आहेत तरी कोण? गरजवंतांना आपुलकीचा आणि मदतीचा हात देणाऱ्या पहिल्या दहा देशांत या वेळी नायजेरिया, कॅमेरून, जाम्बिया, केनिया, युगांडा, इजिप्त या तब्बल सहा आफ्रिकी देशांचा समावेश आहे.  इजिप्त या देशाचा बराच मोठा भूभाग उत्तर आफ्रिकेत मोडतो. ज्यांना स्वत:लाच पुरेसं खायला-प्यायला नाही, घरदार नाही अशा गरीब लोकांनी आणि देशांनी केलेली ही मदत म्हणूनच मोठी मौल्यवान आहे. 

कोरोना काळात अनोळखी, गरीब लोकांना मदत करण्यात इंडोनेशिया सर्वांत उदार देश ठरला आहे. तेथील ८३ टक्के लोकांनी आर्थिक मदत केली, तर समाजकार्यातही हा देश अग्रेसर (६० टक्के) राहिला आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी मात्र पहिल्या दहातील आपला क्रमांक कायम राखला आहे. दानशूर देशांची क्रमवारी ही अशी- १ - इंडोनेशिया, २ - केनिया, ३ - नायजेरिया, ४ - म्यानमार, ५ - ऑस्ट्रेलिया, ६ - घाना, ७ - न्यूझीलंड, ८ - युगांडा, ९ - कोसोवो, १० - थायलंड, ११ - तजाकिस्तान, १२ - बहारीन, १३ - युनायटेड अरब अमिरात, १४ - भारत, १५ - इथिओपिया. 

Web Title: The poorest people in the world are the most generous pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.