कबुतरांच्या घाण करण्याच्या सवयीनं गांजलेले लोक कबुतरखाने बंद करण्याचा हिरीरीने पुरस्कार करीत आहेत. त्याचवेळी हेरिटेज मुंबईचे ते वैभव आहे, असे मानणारे कबुतरखान्यांना नवे रंगरूप देण्याची मागणी करीत आहेत. हे दोन्ही वर्ग आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत.मुंबईत गेल्या काही काळापासून स्वत:च खुराड्यात राहणारी माणसं कबुतरांचा दुस्वास करू लागली आहेत. कबुतरखाने हटविण्यासाठी प्रशासकीय ते राजकीय अशा सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. एकीकडे धर्मभावनेतून, पापक्षालनासाठी कबुतरांना दिसामाजी काही तरी धान्य खाऊ घालणारे दानशूर आणि कबुतरांच्या वाढत्या संख्येच्या नावानं बोटं मोडणारे अशी दुफळी मुंबईत अनुभवण्यास मिळत आहे. हा विरोधाभास विलक्षण आहे. काहींसाठी तर त्यांच्या अस्तित्वाची जाणीव ‘ओ शिट’पुरती उरली आहे. शांततेचं प्रतीक असलेल्या कबुतरांवरनं माणसांनी झगड्याचा पवित्रा घेतला आहे. शुकासारखे पूर्ण वैराग्य नसलेल्या या पाखरावरून मुंबईकर विभागले गेले आहेत. कबुतरांच्या घाण करण्याच्या सवयीनं गांजलेले लोक कबुतरखाने बंद करण्याचा हिरीरीने पुरस्कार करीत आहेत. त्याचवेळी हेरिटेज मुंबईचे ते वैभव आहे, असे मानणारे कबुतरखान्यांना नवे रंगरूप देण्याची मागणी करीत आहेत. हे दोन्ही वर्ग आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. त्यातून एक वाद उभा राहिला आहे. वानगीदाखल सांगायचे, तर मुंबईच्या पश्चिम उपनगरांमधील हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या कबुतरखान्यांच्या बाबतीत तर ते हेरिटेज कसे ठरतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुदलात उपनगरांमध्ये मुंबईचा विस्तार झाला, तो ब्रिटिशांनी इथून काढता पाय घेतल्यानंतर. खार रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला भर रस्त्यात मधोमध असलेला कबुतरखाना निर्माण झाला, तोच मुळी नव्वदच्या दशकात! पण मूळ मुंबई बेटावरचे अनेक कबुतरखाने सर्वार्थाने जुने आहेत. प्रश्न नव्या-जुन्याचा नाही. कबुतरांचे लाड करायचे की नागरिकांच्या भावना लक्षात घ्यायच्या, हा या वादाचा गाभा आहे. कारण कबुतरांची वाढती संख्या आणि ही प्रजाती करीत असलेली घाण ही झपाट्याने वाढलेल्या नागरीकरणाच्या व्यवस्थेत मानवी आरोग्याला हानिकारक असल्याचे निष्कर्ष काही वैद्यकतज्ज्ञांनी संशोधनाअंती काढले आहेत. विशेषत: श्वसनाशी संबंधित विकारांचा यात समावेश आहे. पक्षिगणनेपुरतं बोलायचं तर मानवी वस्त्यांच्या सान्निध्यात सहजी आढळणाऱ्या पक्ष्यांमध्ये भारतात कावळ्यांपेक्षाही कबुतरांची संख्या जास्त आहे. त्यांचे आयुष्यही १५ ते २० वर्षांचे. त्यामुळे ही प्रजाती संख्येच्या बाबतीत आटोक्यात कशी ठेवायची, हा प्रश्नही नव्याने भेडसावू लागला आहे. मुंबईच कशाला, युरोपातल्या अनेक शहरांनाही या शांतिदूतांच्या बाबतीत काही प्रश्नांना सामोरे जावे लागले. एकविसाव्या शतकात पदार्पण केल्यावर युरोपात काही शहरांत त्याबद्दलचे निर्णयही झाले. लंडनच्या ट्रॅफलगार स्क्वेअरमध्ये कबुतरांना दाणे खिलवायला आता बंदी आहे. इटलीतल्या व्हेनिसमधल्या सेंट मार्क स्क्वेअरमध्ये कबुतरांसाठी धान्य, दाणे वगैरे विकण्यावर दंड आहे. स्पेनमध्ये तर कबुतरांचे प्रजनन रोखण्यासाठी त्यांना प्रतिबंधक बिया खिलवल्या जातात. मुंबईत असा प्रयोग अमलात येणं अंमळ कठीण आहे. पण भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासारखा हा मुद्दाही ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. तसं पाहिलं तर व्यापाराच्या मिषानं हिंदुस्थानात आलेल्या इंग्रजांनी कबुतरांच्या पोटावर पाय आणला. त्या गोऱ्या सोजिरांनी माणसं नेमून डाक सेवा सुरू केली अन्् तोवर चिठ्ठीद्वारे ह्या हृदयीचे त्या हृदयी बिनबोभाट पोहोचविणारी कबुतरं बिचारी सरप्लस झाली! विरहभावना असह्य झालेल्या अनेक प्रियतमा चिठ्ठी घेऊन येणाऱ्या कुणा कपोताची डोळ्यांत प्राण आणून वाट पाहायच्या. आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदासाची प्रतिभा बहराला आली, तेव्हा सारी कबुतरं भिजल्या अंगानं कुठल्यातरी वळचणीला बसली असणार. अन्यथा त्या महाकाव्याचा दूत होण्याचा मान कुठल्या ढगाला कुठून मिळायला? कबुतरांचं एक बरंय. ती उकिरड्यावर नाही जगत. कुणीही टाकलेले चार-दोन दाण्यांवर त्यांची गुजराण होते. बडबड नाही, गोंधळ नाही. कधी खुशीत आलं की गर्दन फिरवून गोल फिरणार. शृंगाराच्या झरणीला या पाखराला विशेषणाचं पात्र केलं. पण आता मुंबईकरांच्या वादात.. ‘चल उड जारे पंछी, ये देस हुआ बेगाना’ असं स्वत:शीच गुणगुणण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकतेच की !- चंद्रशेखर कुलकर्णी
वेध - चल उड जा रे पंछी ये देस हुआ बेगाना!
By admin | Updated: May 1, 2017 00:54 IST