शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

वेध - क्रिकेटमधील ‘पृथ्वी’चे प्रेमगीत

By admin | Updated: January 9, 2017 00:25 IST

गावसकर नावाचा सूर्य मावळत होता तेव्हा तेंडुलकर नावाचा सूर्य क्रिकेटच्या क्षितिजावर उदयाला आला. तेच आवर्तन पृथ्वीच्या उदयातून जाणवू लागले आहे.

 मुंबई ही भारतीय क्रिकेटची पंढरी. मुंबईच्या स्टेडियमवर जाणाऱ्या पब्लिकचं पहिलं प्रेम क्रिकेटवर असतं. इथं हजेरी लावणाऱ्याला क्रिकेट अंतर्बाह्य समजतं. किंबहुना क्रिकेट हा बहुसंख्य मुंबईकरांचा बहिश्चर प्राण आहे. वैभवाचे दिवस हा मुंबईकर क्रिकेटरसिकांच्या अभिमानाचा विषय. विजय मर्चंट ते अजित वाडेकर आणि सुनील गावसकर ते सचिन तेंडुलकरपर्यंत अनेकानेक दैवते या रसिकांनी मनोभावे पुजली. मन:पूत मिरविलीही. पण अगदी काल-परवा संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या कसोटी सामन्यात भारत जिंकला. तरीही मुंबईकर क्रिकेटरसिकांच्या मनाचा एक कंगोरा काजळला होता. फार वर्षांनी एक आक्रित घडलं होतं. अजिंक्य रहाणे जायबंदी झाल्यामुळे तो अंतिम अकरा खेळाडूंमध्ये नव्हता. परिणामी मुंबईत झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघात एकही मुंबईकर नव्हता.एक काळ होता, जेव्हा निदान अर्धा डझन मुंबईकर भारतीय संघात असायचे. पण या सामन्यात एकही मुंबईकर खेळाडू भारतीय संघात नव्हता. मुंबईचं क्रिकेट संपलं की काय, याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. इथल्या क्रिकेटरसिकांची मान खिन्न भावनेनं गुडघ्यात खुपसली गेली. हे चित्र गेल्या गुरुवारी अचानक बदललं. राजकोटमध्ये तामिळनाडू विरुद्ध मुंबई या रणजी सामन्यात अवघ्या सतरा वर्षांच्या मुंबईकरानं पदार्पणातच आक्रमक शतक ठोकून मुंबईसाठी अंतिम सामन्याचा दरवाजा उघडून दिला. रणजी करंडकाच्या सामन्यात पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत तो जाऊन बसला. लहान चणीचा, कमी उंचीचा आणि निरागस भाव असलेला बालिश चेहऱ्याचा पृथ्वी शॉ एका रात्रीत क्रिकेटविश्वातील चर्चेचा केंद्रबिंदू बनलेला वा अपघाताने गवसलेला हिरा नाही. सचिन आणि राहुल द्रविडला टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावर बघता बघता क्रिकेटच्या, त्यातही बॅटिंगच्या प्रेमात पडलेल्या पृथ्वीची कहाणी जितकी संघर्षाची, तितकीच तळपत्या यशाची आहे. आशेचा किरण मनामनात जागविणारीही आहे. मुंबईतलं क्रिकेट पोसलं जातं, ते शालेय स्तरावर. हॅरीस आणि गाइल्स शील्डच्या आंतरशालेय स्पर्धांमधून. मुंबईतल्या क्रिकेटचं घट्ट नेटवर्क या स्पर्धांमधूनच तर विणलं जातं. सचिन, विनोद कांबळी, अमोल मुजुमदार, प्रवीण अमरे अशा अनेकांसारखं पृथ्वीचं नाणंही बावनकशी सोन्याचं असल्याचं आधीच सिद्ध झालं होतं. तीन वर्षांपूर्वी हॅरिस शील्डच्या सामन्यात ५४६ धावांची विक्रमी खेळी करणारा पृथ्वी तेव्हा आकर्षण बिंदू बनला. त्याच्या पाठोपाठ कल्याणच्या प्रणव धनावडेनं हजार धावांची विश्वविक्रमी खेळी केली. शाळेत विक्रमी खेळी केलेल्या पृथ्वीला जेमतेम सतरा वर्षे पुरी होत असताना मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळालं. दिलीप वेंगसरकर आणि राहुल द्रविडच्या त्याच्याविषयीच्या मताचाही त्यात वाटा आहे.प्रश्न एकट्या पृथ्वीचा नाही. श्रीमंतीचं पाठबळ नसलेली मुंबई आणि मुंबईच्या जवळपास शंभर किलोमीटरच्या पट्ट्यातील गुणवत्ताही आपल्या लायकीनुसार मिळकत करू शकते, हे चांगलं लक्षण आहे. अगदी अलीकडे श्रीलंकेत झालेल्या १९ वर्षांखालील युवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पृथ्वी भारतीय संघातून खेळला. आक्रमकतेची चुणूक दाखवून गेला. राजकोटमधल्या रणजी सामन्यात पदार्पणात शतक झळकावल्यानंतर मुंबईकर क्रिकेटरसिकांना जणू नवा सचिन सापडल्याचा आनंद झाला. तो तितका कसदार आहे की नाही, अपेक्षांचे ओझे तो चिमुकल्या खांद्यावर वाहू शकेल की नाही, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे काळाच्या उदरात दडली आहेत. ती मिळायची तेव्हा मिळतीलच. पण त्याच्या आगमनाने आशेला नवी पालवी फुटली आहे. गावसकर नावाचा सूर्य मावळत होता तेव्हा तेंडुलकर नावाचा सूर्य क्रिकेटच्या क्षितिजावर उदयाला आला. तेच आवर्तन पृथ्वीच्या उदयातून जाणवू लागले आहे. गुणवत्ता बावनकशी असली की तिला फार काळ झाकता येत नाही. मुंबईतल्या क्रिकेटमधल्या सोन्यासारख्या गुणवत्तेला इथल्या मातीचा सुगंध आहे. त्यातूनच मध्यंतरी निराश झालेली मुंबई नव्या उत्साहात पृथ्वीचे प्रेमगीत गुणगुणायला लागली आहे!- चंद्रशेखर कुलकर्णी