डॉ. गिरीश जाखोटिया
आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर समाजसुधारक अण्णाभाऊ साठेंची जयंती. दोघेही आपापल्या क्षेत्रातील अत्यंत आदरणीय लोकनेते. यांनी संस्था उभ्या केल्या व चळवळी चालविल्या त्या लोककल्याणार्थ. आजचे बहुतांश राजकारणी व त्यांचे पक्ष, उद्योगपती व त्यांच्या कंपन्या, सांस्कृतिक व क्रीडा संस्था, देशांची सरकारे इत्यादी तपासली तर ‘जीवघेण्या यशा’साठी सारंकाही करण्याची वृत्ती दिसून येते. यातलाच एक भाग प्रचलित झालाय तो ‘नेटवर्किंग’चा. हे यशाचं नेटवर्क चालविण्यासाठी मग विविध गुणसूत्रांनी नटलेली ‘संतती’ उधार घेणंही आता क्षम्य झालं आहे. ‘यशासाठी सबकुछ’ मानणाऱ्या नि प्रचलित झालेल्या या आजच्या संस्कृतीबद्दल व्यूहात्मक नजरेने थोडक्यात इथे पाहू या.
वर्ल्डकपच्या विजयानंतर कळले की इंग्लंडच्या संघातील तब्बल सात खेळाडू हे मूळ ब्रिटिश वंशाचे नव्हते. एका चिनी आॅटोमोबाइल कंपनीने एक ब्रिटिश कंपनी व ब्रँड खरेदी केला आणि या ब्रँडच्या नावे भारतात एक कंपनी नुकतीच उघडली. या कंपनीचा प्रमुख हा भारतीय आहे. आणखी एक बातमी आम्हा सर्वांना कळलेय की ब्रिटिश सरकारमध्ये भारतीय वंशाचे काही मंत्री व चिटणीस नियुक्त झालेत. एका अन्य बलाढ्य राजकीय पक्षातही आता विविध (?) प्रकारची नेतेमंडळी सामील झाली आहेत. या साºया गोष्टींत वरवर पाहता काही वावगं दिसत नाही. अशा कंपन्या, असे पक्ष, अशी बहुवांशिक मंत्रिमंडळे ही केंद्रभागी असणाºया एका ‘विशिष्ट’ विचारसरणीवर चालतात. या ‘विशिष्टते’बद्दलही आक्षेप असू नये जोपर्यंत ती अनैतिक नसते. या सगळ्या प्रकारांना आपण जीवशास्त्रीय भाषेत ‘आयोजित संतती’ म्हणू शकू. म्हणजे यशाच्या सातत्यासाठी स्वत:ला हव्या असणाºया गुणसूत्रांची संतती बनवून घेणं. प्राचीन इतिहासात हा प्रकार सर्रास वापरला जायचा. ‘नियोग’ अथवा ‘अयोनिज’ अशा या प्रकारात ‘संतती - निर्मिती’ व्हायची नि मग तिला ठरवलेल्या पित्याकडून वा पालकाकडून हवे ते ‘संस्कार’ दिले जायचे. ही संतती मग ‘वंशाचा दिवा वा वारसदार’ वगैरे व्हायची. यश देईपर्यंत या संततीचा वापर नि आदरसत्कार! यश देणं बंद केलं की दुसºया संततीचा शोध. थोडक्यात काय तर यश महत्त्वाचं, संतती नाही.
आता या साºया विषय - मांडणीतील आयोजित संतती, विविध प्रक्रिया, त्या चालविणारे कारस्थानी सामान्य लोक, सामुदायिक वा संस्थात्मक दहशत, अनाकलनीय भंपक ध्येये व त्यासाठीचा मतलबी लवचीकपणा इत्यादी बाबी तुमच्या अवतीभवतीच्या घटनांना लावून पाहा, एक अकराळ-विकराळ चित्र उभं राहील. या चित्रानेच आम्ही सदासर्वकाळ गंडवले - घाबरवले गेलो आहोत. आम्ही त्या चित्राचाच एक भाग असलो तर ते बदलू नाही शकणार. धाडस करा, तारतम्य वापरा, चित्रातून बाहेर पडा; म्हणजे त्याला बदलता येईल. हां, हेसुद्धा तपासा की या सामुदायिक खेळात तुम्ही कुठे ‘आयोजित संतती’ म्हणून वापरले जात नाही आहात ना?(लेखक व्यूहात्मक व्यवस्थापन, अर्थकारण व उद्योजकीय सल्लागार आहेत)