शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

राष्ट्रपती बनविणारा एकमात्र कॉम्रेड

By admin | Updated: January 3, 2016 22:55 IST

बहुसंख्य नागपूरकर तसेच मराठी माणसे अर्धेन्दु भूषण बर्धन यांना १९६० पासून निवडणुकीतील अपयशी म्हणूनच ओळखतात. बर्धन यांनी अनेक निवडणुकांत पराभव स्वीकारला

विजय दर्डा, (लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)बहुसंख्य नागपूरकर तसेच मराठी माणसे अर्धेन्दु भूषण बर्धन यांना १९६० पासून निवडणुकीतील अपयशी म्हणूनच ओळखतात. बर्धन यांनी अनेक निवडणुकांत पराभव स्वीकारला; मात्र प्रत्येक वेळी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून बर्धनच असत. असे असले तरी राष्ट्रपती बनविणारे ते एकमात्र कॉम्रेड ठरले आहेत. पहिल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिला होता. त्यावेळी राष्ट्रपतिपदासाठी मार्क्सवादी पक्षाची पहिली पसंती प्रणव मुखर्जी हे होते; मात्र काँग्रेस पक्ष मुखर्जींना सोडू इच्छित नव्हता. ही कोंडी फोडण्यासाठी बर्धन यांनी पुढाकार घेतला. राष्ट्रपतिपदासाठी महिलेचा विचार का करू नये असे मत त्यांनी प्रदर्शित केले. त्यानंतर सर्व सूत्रे फिरली आणि प्रतिभाताई पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या. यानिमित्ताने बर्धन आणि विदर्भातील जुने नाते पुन्हा एकदा पुढे आले. भारतीय राजकारणात सुमारे सात दशके कार्यरत असणाऱ्या बर्धन यांच्या अनेक प्रयत्नांपैकी हा केवळ एक उल्लेख होय. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतलेल्या एका विद्यार्थ्यापासून राष्ट्रीय पातळीवरील नेत्यापर्यंत अनेक भूमिका त्यांनी पेलल्या. अनेक पंतप्रधान आणि महत्त्वाचे राजकीय नेते त्यांनी जवळून पाहिले. त्यामुळे त्यांनी आत्मचरित्र किंवा आठवणी लिहिल्या असत्या तर त्यामधून अनेक किस्से समोर आले असते. कॉम्रेड बर्धन हे वेगळ्याच मुशीत बनलेले होते. चरित्रांमध्ये लिहिले जाणारे फुटकळ किस्से म्हणजे आत्मस्तुती असून, दुसऱ्यांना दोष देण्यासाठी ते केले जाते. त्यामुळे मी असे काही लिहिणार नाही, अशी त्यांची स्पष्ट विचारसरणी होती. कॉम्रेड बर्धन यांच्याकडे बंगला नव्हता. पक्षाच्या मुख्यालयातील केवळ एकाच खोलीत ते राहत होते. त्यांच्या पिढीतील राजकीय नेत्यांनी याच पद्धतीने आयुष्य काढलेले दिसून येते. त्यांच्या मते संघर्ष आणि कर्मठ व धर्मनिष्ठ आचरण हे समानार्थी शब्द बनले होते. नागपूरच्या कामगारांसाठी त्यांनी दिलेले लढे आणि केलेली आंदोलनेही नागपूरकरांनी पाहिली. निवडणुकीच्या राजकारणात ते अपयशी ठरले असले, तरी ज्यांच्या सल्ल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा असे त्यांचे व्यक्तिमत्त्व बनले. सत्तेच्या राजकारणात सर्वत्र विश्वासघाताचे वातावरण असताना असा माणूस तिथे टिकणे ही विरळ गोष्ट आहे.कॉम्रेड बर्धन यांनी राज्याच्या राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला तो त्यांच्या चारित्र्य आणि सच्चेपणाच्या बळावरच. आॅल इंडिया ट्रेड युनियन कॉँग्रेस (आयटक)चे अध्यक्ष म्हणून सर्वप्रथम ते राष्ट्रीय स्तरावर आले. १९९० पासून ते कम्युनिस्ट पक्षाचे सर्वेसर्वाच बनले, असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. केंद्रातील आघाडी सरकारांमधील कम्युनिस्ट पक्ष हा एक घटक होता. या काळामध्ये विविध पक्षांच्या नेत्यांबरोबर त्यांनी केलेले प्रयत्न हे राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय ठरले. बर्धन यांनी इंद्रजित गुप्ता यांच्याकडून पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि नंतर १६ वर्षे त्यांनी पक्षाची धुरा सांभाळली. पद सोडल्यानंतरही बर्धन हेच कम्युनिस्ट पक्षाचा आवाज म्हणून ओळखले जात. बर्धन यांच्याकडे चुका कबूल करण्याची असलेली ताकद हे त्यांचे वैशिष्ट्य होय. १९९६ मध्ये पंतप्रधानपद नाकारणे ही डाव्यांची घोडचूक होती, ही पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी दिलेली कबुली योग्य असल्याचे बर्धन यांनीही मान्य केले. डाव्या पक्षांचे वेगळेपण यामधून दिसून आल्याचे सांगत, भांडवलशाहीच्या राजकारणातही आम्ही वेगळेपण दाखविल्याची प्रांजळ कबुली ते देतात.आपण केलेल्या चुका आणि घोडचुकांची कबुली देण्याला अनेक राजकारणी कचरतात; मात्र कॉम्रेड बर्धन हे त्यांच्यापैकी नव्हते. सन २००८ मध्ये कॉँग्रेस पक्षाबरोबरचे संबंध तोडणे ही डाव्यांची आणखी एक घोडचूक असल्याचे त्यांनी मान्य केले. डाव्यांच्या या कृतीमुळे अनेक घडामोडी घडल्या आणि निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी उजव्या शक्तींचा उदय झाल्याचेही ते मान्य करतात. बर्धन यांच्या निधनाने विचारसरणीची स्पष्टता आणि घटनांचे पृथ:करण करणारा एक नेता काळाच्या पडद्याआड गेला. त्यामुळे निर्माण होणारी पोकळी भरून निघणे कठीण आहे. आपल्या विरोधकांनाही मते असतात व त्यांच्यासाठी कठोर आणि बोचरी टीका करणे चुकीचे असल्याचे बर्धन यांचे स्पष्ट मत होते.हिंदी भाषिक मध्य प्रांताची राजधानी असलेल्या नागपूरचा समावेश कालांतराने महाराष्ट्रात झाल्याने नागपूर हे कॉस्मोपोलिटन झाले आहे. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्यापासून अनेक नेते या भूमीने दिले आहेत. त्यांची यादीही मोठी आहे. यामध्ये श्यामाचरण आणि विद्याचरण शुक्ला बंधू, माजी केंद्रीय मंत्री एन. के. पी. साळवे, वसंत साठे यांच्यापासून विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंतच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रीय राजकारणामध्ये आपला ठसा उमटवला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाही ठसा उमटलेला दिसत आहे. कॉम्रेड बर्धन हे अशा व्यक्तिमत्वांपैकीच एक मार्गदर्शक होते. संघ आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्या विचारधारा या दोन धु्रवांवरील असल्या, तरी या दोन्ही विचारधारांचे नेते नागपुरातूनच पुढे आलेले दिसतात हे विशेष. कॉँग्रेस आणि नागपूर यांच्यातील नातेही चमकदार कामगिरीचे असून, ते कोणालाही विसरता येणारे नाही. राजकारण आणि वादविवाद हे नेहमी हातात हात गुंफूनच असतात; मात्र कॉम्रेड बर्धन यांच्याबाबत मतभेद असलेले दिसून येत नाहीत. त्यांनी आपले वैयक्तिक आणि राजकीय जीवन हे कायम वेगळे ठेवल्यानेच अशा वादांचे प्रसंग आलेले दिसत नाहीत. नागपूरमध्ये असताना ते मध्यमवर्गीय वस्तीत राहत. त्यांच्या दोन्ही मुलांना कधी आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये न आणण्याचा कटाक्ष त्यांनी पाळला.कम्युनिस्ट पक्षांना निवडणुकीच्या राजकारणात फारसा उज्ज्वल काळ नाही. यामुळे डाव्या विचारसरणीची गरज नाही असे मानणे आपमतलबीपणाचे ठरेल असा विचार करणेच चुकीचे आहे. कॉम्रेड बर्धन यांना ही वस्तुस्थिती ज्ञात होती. त्यामुळेच त्यांनी डाव्या पक्षांना टिकायचे असेल तर आत्मपरीक्षण करा, बदला आणि वर्तमान परिस्थितीशी योग्य तो मेळ साधा, असा सल्ला दिलेला होता. डाव्या पक्षांचे नेते आत्मपरीक्षणाला तयार आहेत का, हा खरा प्रश्न आहे. अन्यथा त्यांना साईडलाइनला राहण्यावरच समाधान मानावे लागणार आहे. असे झाल्यास या नेत्यांना पुन्हा राष्ट्रपती बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावता येणार नाही, हे मात्र निश्चित.हे लिखाण संपविण्यापूर्वी...पठाणकोट येथील हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. असे प्रकार टाळणे गरजेचे आहे. या हल्ल्यांचा केवळ निषेध न करता त्यापासून काही तरी धडा घेणे गरजेचे आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी केवळ शब्द पुरेसे नाहीत. या गोंधळाच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची खरी गरज आहे.