अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करयुद्धातून अजूनही बाहेर आलेले नाहीत. कोणाकोणावर आणि किती कर लादावा, असं त्यांना झालं आहे. हॉलिवूडला वाचविण्यासाठी त्यांनी आता विदेशी चित्रपट निर्मात्यांना धारेवर धरलं आहे. ट्रम्प यांनी म्हटलं आहे, अमेरिकेच्याबाहेर जे चित्रपट निर्माण झाले आहेत, ते जर अमेरिकेत रिलीज करण्यात आले, तर त्यांच्यावर शंभर टक्के कर लादला जाईल.
आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'टूथ सोशल'वर पोस्ट करून त्यांनी माहिती दिली की, अमेरिकेच्या वाणिज्य विभागालाही त्यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत की, परदेशातला कोणताही चित्रपट येथे रिलीज होणार असेल, तर त्यांच्यावर शंभर टक्के कर लादला जाईल याची काळजी घ्या.
ट्रम्प यांच्या मते दुसरे देश आकर्षक ऑफर देऊन अमेरिकी चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या देशात बोलवून चित्रपटांची निर्मिती करतात. त्यामुळे अमेरिकेतील फिल्म इंडस्ट्री वेगानं मरणपंथाला लागते आहे. हे सहन केलं जाणार नाही. त्यासाठी अशा चित्रपटांचा अमेरिकेतील प्रवेश रोखलाच पाहिजे. अमेरिकन चित्रपटांची निर्मती वेगानं परदेशात जाऊ लगल्यानं अमेरिकेच्या चित्रपटनिर्मितीला २०२१च्या तुलनेत २०२३मध्ये तब्बल २६ टक्के तोटा झाला आहे.
अमेरिकेच्या मोशन पिक्चर असोसिएशनच्या माहितीनुसार २०२३मध्ये अमेरिकेच्या चित्रपटांनी जगभरात केवळ २२.६ अब्ज डॉलर्सच कमाई केली. ट्रम्प यांनी यापूर्वी अनेकदा सांगितलं आहे की, हॉलिवूडला त्यांना पूर्वीपेक्षा जास्त मजबूत आणि शक्तिशाली बनवायचं आहे. हॉलिवूड जगात सर्वोत्कृष्ट आहेच, पण हॉलिवूडची ही प्रतिमा त्यांना आणखी खूप उंचावर नेऊन ठेवायची आहे, मात्र अमेरिकेचे निर्मातेच बाहेर देशांत जाऊन चित्रपट तयार करायला लागल्यामुळे त्यांचा तीळपापड झाला आहे आणि त्यावर त्यांनी आगपाखड केली आहे. हॉलिवूडला पुन्हा ऊर्जितावस्था मिळावी यासाठी मेल गिब्सन, जॉन व्हाइट आणि सिल्वेस्टर स्टॅलोनसारख्या बड्या अभिनेत्यांना त्यांनी 'स्पेशल अॅम्बेसेडर 'ही बनवलं आहे.
अमेरिकेसाठी हॉलिवूड ही केवळ मोठी फिल्म इंडस्ट्रीच नाही, तर 'सॉफ्ट पॉवर'च्या रूपानं अमेरिकेचं ते एक मोठं आणि महत्त्वाचं हत्यारदेखील आहे. हॉलिवूड चित्रपटांच्या माध्यमातून अमेरिकेनं गेल्या शतकभरात अमेरिकन संस्कृती, भाषा, जीवनशैली आणि विचारसरणी संपूर्ण जगभर पोहोचवली आहे आणि आपलं महत्त्व संपूर्ण जगात वाढवलं आहे.
स्पायडरमॅन, अॅव्हेंजर्स, टायटॅनिक, गॉडफादर, स्टार वॉर्स, हॅरी पॉटरसारखे चित्रपट केवळ मनोरंजनाची दुनिया नव्हती, तर अमेरिकेच्या 'जागतिक ओळखीचा' एक महत्त्वाचा हिस्सा होता. अमेरिकेत दरवर्षी शेकडो चित्रपट तयार होतात, ते केवळ अमेरिकेपुरते सीमित राहत नाहीत, तर जवळपास जगाच्या प्रत्येक देशात हे चित्रपट रिलीज होतात. २०२३मध्ये अमेरिकन चित्रपटांनी जगभरात केलेली २२.६ अब्ज डॉलर्सची कमाई २०२२च्या तुलनेत कमी असली, तरी त्यामुळे १५.३ अब्ज डॉलर्सचा व्यापार अधिशेष निर्माण झाला. गेल्या काही काळात कोविडनंतर चित्रपट संघटनांचे संप, लॉस एंजेलिसमध्ये लागलेली आग, वाढता निर्मिती खर्च यामुळे हॉलिवूडला हादरे बसताहेत.