शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वाचनीय लेख - गृहपाठ नको, मग आपण शाळाही बंद करणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 09:41 IST

गृहपाठामुळे ताण येतो म्हणून गृहपाठ बंदी करण्याऐवजी गृहपाठाचे स्वरूप बदलून ते अधिक रंजक करण्याची खरी गरज आहे!

भाऊसाहेब चासकर

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करायचा मनोदय राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बोलून दाखवला आहे. मात्र गृहपाठासाठी आग्रही असलेल्या पालकांच्या ते पचनी पडलेले दिसत नाही.  समाजमाध्यमांत तिखट टीका होऊ लागली आणि विरोधाला तोंड फुटले!मुलांना गृहपाठाचा मानसिक ताण येतो म्हणून दुसरे टोक गाठून एकदम गृहपाठबंदी करणे योग्य होणार नाही. सुंदर हस्ताक्षर काढून वहीवर ‘छान’, ‘सुंदर’ असा अभिप्राय आणि शिक्षकांची शाबासकी मिळवणे मुलांना आवडते. काही शाळांमध्ये गृहपाठावर ‘स्मायली’ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ लागलेली असते. एखाद्या दिवशी गृहपाठ द्यायचा राहिल्यास शाळा सुटायच्या वेळेस विद्यार्थी आग्रह धरतात. शिकवलेले किती समजले? हे गृहपाठातून शिक्षकांना समजायला मदत होते. शिकवण्याची दिशा ठरवायला मदत होते. लेखी, तोंडी परीक्षा, प्रकल्प, प्रात्यक्षिक, उपक्रम यांसोबत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनात ‘स्वाध्याय’ हे एक साधन तंत्र आहे. घरचा अभ्यास दिला नाही तर मुले दप्तर उघडून बघत नाहीत, म्हणून ‘गृहपाठ द्या’ असा पालकांचा आग्रह असतो. शिक्षणमंत्री म्हणतात तसे विद्यार्थ्यांच्या मन, मेंदूवर ताण आहेत का? तर निश्चित आहेत.

शहरी भागातल्या अनेक शाळांमधल्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी असते. वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांचे आकलन जणू एकसारखेच आहे, असे गृहीत धरून शिक्षक शिकवतात. अनेक संकल्पना विद्यार्थ्यांना समजलेल्या नसतात आणि परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांच्या मनावर भारी दडपण येते. त्यातून ताणतणाव, तीव्र भीती आणि पुढे नैराश्य अशा गोष्टी घडतात.  पण गृहपाठामुळे ताण येतो म्हणून गृहपाठबंदी करण्याऐवजी  गृहपाठाचे स्वरूप बदलण्याची गरज आहे. त्यात रंजकता, नावीन्य आणणे आवश्यक आहे. लिहिताना मुलांना मजा वाटेल, त्यांच्याठायी असलेल्या शोधक वृत्तीला प्रोत्साहन देता येईल, असे गृहपाठ पाहिजेत. सध्या पावसाचे दिवस आहेत. वर्गात कविता शिकवून झाल्यानंतर मुलांनी घरी पाऊस विषयावर गप्पा माराव्यात. विजा कडाडतात, ओढे-नाले वाहते होतात, धबधबे कोसळू लागतात, नद्या दुथडी भरून वाहू लागतात, धरणे भरतात, कालवे, जास्त पावसाने होणारी पिकांची नासाडी, येणारे महापूर,  पावसाच्या भल्या-बुऱ्या आठवणी, अनुभव-प्रसंग मोठी माणसे मुलांसोबत वाटून घेतील. अनेक गोष्टी मुलांना समजतील. शिक्षण मुलांच्या जीवनाशी जोडले जाईल. पावसावर मुले आनंदाने निबंध लिहितील. गणितातील लिटर, मीटर असे मापन, कोन मोजणे... सगळ्या विषयांत हे शक्य आहे. शरीराला विशिष्ट ठिकाणी जखम झाल्यास डॉक्टर उपचार करतात, गरज भासल्यास शस्रक्रिया करतात. अवयव काढून टाकत नाहीत. गृहपाठ बंद केल्यास शिक्षण शरीराचा एक अवयव काढून टाकल्यासारखे होईल! कोविड काळात मुलांच्या लिहिण्या-वाचण्याची गती मंदावलेली आहे, मुलांना लेखन सरावाची प्रचंड आवश्यकता आहे, हे इथे मुद्दाम लक्षात घ्यायला हवे.  समजा, ‘आम्हांला शाळेचा वैताग येतो’ असे मुलांनी सांगितले तर आपण शाळा बंद करणार आहोत का? - शिक्षणात काही गोष्टी अनिवार्य करायला लागतात.

शिक्षकांनी मन लावून शिकवावे, ही मंत्रिमहोदयांची अपेक्षा रास्त आहे. मन लावून शिकवायला बहुसंख्य शिक्षक उत्सुक आहेत. पण मग अशैक्षणिक कामांचा भडिमार थांबवण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा.  शिक्षकभरती बंद आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका शाळांतच नाही तर मराठी माध्यमाच्या खासगी अनुदानित शाळांमध्येही पुरेसे शिक्षक नाहीत. जे  आहेत त्यांना सतत कसली ना कसली माहिती लिहून गुगल फॉर्ममध्ये पाठवावी लागते. प्रशासनाची माहितीची भूक भागतच नाही!  शिक्षकांना वर्गात शिकवण्याची संधी मिळणे दुर्मीळ झाले आहे. सरकार, मंत्री किंवा अधिकारी बदलले की धोरण बदलते.  ही धरसोडवृत्ती शिक्षणाला बाधक आहे.  विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करूनच शिक्षण क्षेत्रातले निर्णय विचारपूर्वक घेतले पाहिजेत.  प्रश्न लाखो मुलांच्या शिक्षणाचा, भविष्याचा आणि आयुष्याचा असतो!

(लेखक सहायक शिक्षक, जि. प. शाळा, वीरगाव, अहमदनगर)

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रDeepak Kesarkarदीपक केसरकर