जगात गरिबांची कमी नाही, तसंच गर्भश्रीमंतांची संख्याही कमी नाही. जगात काही शहरं तर अशी आहेत, तिथे मोजता येणार नाहीत इतके गर्भश्रीमंत राहतात. उदाहरणादाखल नाव घ्यायचं तर अमेरिकेतील न्यूयॉर्क हे शहर. तिथे किती गर्भश्रीमंत राहतात? न्यूयॉर्कमधे राहणाऱ्या लोकांपैकी तब्बल ४ टक्के लोकांच्या घरात कुबेर पाणी भरतो!
या शहरात तब्बल साडेतीन लाख मिलेनिअर्स (लक्षाधीश), ६७५ सेंटी-मिलेनिअर्स (कमीतकमी १०० दशलक्ष डॉलर्स संपत्ती असलेले लोक) आणि ६० अब्जाधीश राहतात. यामुळेच या शहराला जगातील सर्वांत श्रीमंत शहर म्हटलं जातं. जगातील टॉपमोस्ट पहिल्या दहा श्रीमंत शहरांची यादी पाहिली तर त्यात नऊ अमेरिकेतील आहेत. ‘हेनली ॲण्ड पार्टनर्स’ या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात २०२४मध्ये जगातील सर्वाधिक श्रीमंत राहात असलेल्या शहरांच्या यादीत पुन्हा एकदा न्यूयॉर्क शहरानं पहिला क्रमांक पटकावला आहे. सन २०२३मध्ये न्यूयॉर्क शहराची अर्थव्यवस्था जवळपास एक ट्रिलियन डॉलर्स इतकी होती. त्यामुळेच न्यूयॉर्कला अमेरिकेची आर्थिक राजधानीही म्हटलं जातं. या शहराला श्रीमंत आणि श्रीमंतांचं शहर बनवण्यात अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. अमेरिकन शेअर बाजार वॉल स्ट्रीट याच शहरात आहे. न्यूयॉकचं स्टॉक एक्स्जेंच आणि नॅसडॅक जगातील सर्वांत मोठे शेअर बाजार आहेत.
येथील एकट्या सिक्युरिटीज उद्योगात दोन लाख लोकांना रोजगार मिळतो आणि अब्जावधी डॉलर्सचा कर भरला जातो. जगातील आघाडीच्या अनेक दिग्गज वित्तीय कंपन्यांची मुख्यालयेही या शहरात आहेत. मीडिया, तंत्रज्ञान, फॅशन, हेल्थकेअर अशा अनेक क्षेत्रात या शहराचं नाव आहे. तंत्रज्ञान उद्योग इथे झपाट्यानं विकसित होत आहे. गुगल, ॲमेझॉन आणि फेसबुकसारख्या मोठ्या टेक कंपन्या या शहरात आपला व्यवसाय वाढवत आहेत. इथल्या फॅशन इंडस्ट्रीमध्येही सुमारे दोन लाख लोक काम करतात. द न्यूयॉर्क टाइम्स, एनबीसीसारखी जगातली अनेक मातब्बर मीडिया हाऊसेस याच शहरातून ऑपरेट होतात.
रिअल इस्टेट क्षेत्रातही न्यूयॉर्क जगात आघाडीवर आहे. त्यामुळेच इथल्या घरांच्या किमती जगात सर्वांत महागड्या आहेत. न्यूयॉर्कमध्ये घर घेणं भल्याभल्यांना जड जातं. न्यूयॉर्कमधील ‘फिफ्थ ॲव्हेन्यू’ला जगातील सर्वाधिक महाग ‘शॉपिंग स्ट्रिट’ म्हटलं जातं. इथे दुकान विकत घेणं जाऊ द्या, पण भाड्यानं घेणंही अनेक श्रीमंतांना परवडण्यासारखं नाही. जगातल्या सर्वाधिक महागड्या शहरांत न्यूयॉर्कचं नाव आघाडीवर आहे. इतकं महागडं शहर असूनही जगभरातील जवळपास सगळ्याच गर्भश्रीमंतांना न्यूयॉर्कमध्ये आपलं घर असावं, असं वाटतं. कारण इथे स्वत:च्या मालकीचं घर असणं अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जातं. त्यामुळेच न्यूयॉर्कमध्ये जगातील सर्वच संस्कृतींचा संगम झालेला आहे.
न्यूयॉर्कची लोकसंख्या सुमारे ८२ लाख आहे आणि इथे तब्बल ८०० भाषा बोलल्या जातात. या शहरानं जगभरातील कुशल, तज्ज्ञ, मेहनती लोकांना आकर्षित करण्याचं हेच कारण आहे. या शहरात आपल्या भाग्याचे दरवाजे उघडतील, आपली भरभराट होईल, मुख्य म्हणजे आपल्या क्षमतेचं सोनं इथेच होईल, असं अनेकांना वाटतं. म्हणूनच न्यूयॉर्कला ‘संधींचं शहर’ असंही म्हटलं जातं.