शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

‘फेसबुक’ची निबरता मोडणारे नवे पाऊल : मेटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 10:09 IST

वापरकर्त्यांचे वय या निकषावर फेसबुक मध्यमवयीन होत आहे. सध्याच्या अतिविराट श्रीमंतीचा तवंग झटकण्यासाठी झकरबर्गला नवी दिशा हवी आहे!

-प्रा. डॉ. विश्राम ढोले, समाजमाध्यमांचे अभ्यासक

फेसुबकचे नाव चर्चेत राहणे ही, तशी काही नवी गोष्ट नाही. स्थापनेपासून म्हणजे २००४ पासून ते भल्या बुऱ्या कारणांसाठी नेहमी चर्चेत राहिले आहे. पण, सध्या फेसबुक चर्चेत आहे ते खऱ्या अर्थाने नावासाठी. फेसबुक या कंपनीचे नाव बदलून आता मेटा (Meta) ठेवण्यात आले आहे. कंपनीचे सर्वेसर्वा मार्क झकरबर्ग यांनीच मागच्या आठवड्यात तशी घोषणा केली. अर्थात आपण जे वापरतो त्या ॲपचे नाव फेसबुकच राहणार आहे. फेसबुकच्या मालकीच्या व्हॉटस्ॲप इन्स्टाग्राम आणि मेसेंजर या सेवांचेही नाव तेच राहणार आहे. सध्या नाव बदलणार आहे ते, या सेवांची मालकी असलेल्या फेसबुक कंपनीचे.

आता कंपन्यांचे असे नामांतर होणे ही काही फार दुर्मीळ बाब आहे, असे नाही. गुगलनेही २०१५ साली त्यांच्या सर्व सेवा धारण करणाऱ्या कंपनीचे गुगल हे नाव बदलून अल्फाबेट ठेवले होतेच. बरेचदा व्यावसायिक सुसूत्रीकरणासाठी किंवा मालकीतील बदलामुळे कंपन्यांचे असे नामांतर केले जाते. काही वेळा जुन्या नावाला चिकटलेल्या नकोशा प्रतिमांपासून सुटका करून घेण्यासाठीही नाव बदलले जाते. तर, काही वेळा कंपनीच्या बदललेल्या व्यावसायिक उद्दिष्टांशी मेळ घालण्यासाठीही नाव बदलतात.

नामांतराची घोषणा करताना झकरबर्ग यांनी या तिसऱ्या कारणाचा आधार घेतला. फेसबुकच्या काही टिकाकारांच्या म्हणण्यानुसार हे वरवरचे कारण आहे. विशेषतः २०१६ पासून- म्हणजे केंब्रिज अनालिटिका प्रकरणापासून- फेसबुकवर वेगवेगळ्या कारणांसाठी सतत टीका होत आहे. झकरबर्गनाही अमेरिकी काँग्रेसच्या कडक चौकशीला सामोरे जावे लागले होते. विद्वेष पसरविणाऱ्या संदेशांबाबत फेसबुक गंभीर नाही अशी टीकाही होतच असते. गेल्याच महिन्यात फेसबुकमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचारी महिलेने फेसबुकची अंतर्गत कागदपत्रे जाहीर करत दाखवून दिले की, लोकांच्या, समाजाच्या हितापेक्षा फेसबुक व्यापारी हितालाच प्राधान्य देते. धोक्याची, दुष्परिणामांची पूर्वकल्पना येऊनही नफ्याच्या लालसेपायी फेसबुक त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करते. या आणि अशा आरोपांमुळे फेसबुकची सामाजिक प्रतिमा बरीच डागाळली आहे. आता या सगळ्या नकारात्मकतेपासून निदान लक्ष तरी दुसरीकडे वळावे म्हणून फेसबुकने हा नामांतराचा घाट घातला आहे असे या टिकाकारांचे म्हणणे आहे. पण, हा युक्तिवाद तोकडा आहे.

एकतर फेसबुकने त्यांच्या कोणत्याच सेवांचे नाव बदललेले नाही. साऱ्या बऱ्यावाईट प्रतिमांसह ती नावे अजूनही तीच आहेत. शिवाय, टीकेमुळे इतक्या सहजी नाव बदलावे इतकी काही फेसबुक कंपनी संवेदनशील राहिलेली नाही. ती आर्थिकदृष्ट्या गबर आणि संवेदनशीलतेच्या बाबतीत निबर झाली आहे. एका अर्थाने हा गबरपणा आणि निबरपणाच या नामांतरामागचे खोलवरचे कारण आहे. फेसबुक आजही आर्थिकदृष्ट्या अत्यंत भक्कम आहे. पण, ही गबरता फार काळ टिकणार नाही याची कंपनीला कल्पना येऊ लागली आहे. सुरुवातीच्या दहाएक वर्षातील नवलाई, कौतुक आणि नफ्याच्या चढत्या आलेखानंतर फेसबुक हळूहळू आर्थिक वाढीच्या पठाराकडे झुकू लागले आहे. ते चुकवायचे म्हणून बऱ्यावाईट क्लृप्त्या केल्या तर, आता होणाऱ्या टीका आणि चिकित्सेची धार फार वाढली आहे. सरकारी चौकशा, बदलत्या कर रचना यामुळेही ताण वाढले आहेत. फेसबुकची ग्राहक संख्या वाढत आहे हे खरेच. पण, त्या वाढीत पूर्वीचा जोश नाही. आजमितीला जगभरातील जवळजवळ तीन अब्ज लोक महिन्यातून निदान एकदा तरी फेसबुकचा वापर करतात. आणि त्यात व्हॉटस्ॲप, इन्स्टा, मेसेंजरचे युनिक ग्राहक मिळवले तर, ही संख्या जाते साडे तीन अब्जांपर्यंत. जगाची लोकसंख्या आहे सुमारे ७.८ अब्ज. म्हणजे जवळजवळ निम्मी लोकसंख्या फेसबुक कंपनीची ग्राहक आहे. त्यामुळे आता ग्राहक वाढीचा आणि आर्थिक फायद्याचा यानंतरचा रस्ता अधिक दमछाक करणारा असणार याची कंपनीला कल्पना आली आहे.

शिवाय फेसबुकच्या एकूण वापरामध्ये आता हळूहळू निबरता येऊ लागली आहे. बराच काळापासून फेसबुक वापरणाऱ्यांना आता फेसबुक थकवा किंवा कंटाळा (फटिग) येऊ लागला आहे. त्यातली बरीच मंडळी फेसबुकवरून कलटीही मारू लागली आहेत. टीनएजर ते तिशीपर्यंतचा ग्राहक वर्ग अभिव्यक्तीच्या पातळीवर उत्साही आणि खरेदीच्या बाबतीत प्रयोगोत्सुक. पण, हा रसरसता ग्राहक वर्ग आता फेसबुकपासून हळूहळू दूर जात आहे. वापरकर्त्यांचे वय या निकषावर फेसबुक मध्यमवयीन होत आहे. इन्स्टा जरी आज तरूणाईने गजबजलेले असले तरी तिथेही छोट्या मोठ्या ॲप्सचे आव्हान वाढण्याची शक्यता आहे. फेसबुकची आजची स्थिती उत्तमच. पण, इतक्या मोठ्या कंपन्यांना फक्त आजच्यापुरते आणि पायाखालचे पाहून चालत नाही. दूरचा अंदाज घेऊन पावले टाकावी लागतात. वृद्धीमुळे आलेली निबरता मोडावी लागते.

आता ही निबरता मोडून काढायची असेल तर, आहे त्या पलीकडचे काहीतरी नवे देण्याची तयारी करावी लागते. फेसबुक कंपनीचे मेटा हे नामांतर शब्दशः आहे त्या पलीकडे जाण्याच्या प्रयत्नांची सुरुवात आहे. मेटा हा इंग्रजीतील एक पूर्वपद म्हणून वापरला जाणारा शब्द आहे. त्याचा एक अर्थ ‘आहे त्याच्या पुढे किंवा वर जाणे’ असा होतो. पण, डिजिटल क्षेत्रात मेटाला आणखी एक अर्थ आहे. मेटाव्हर्स या शब्दाचे एक बोली लघुरुप म्हणूनही मेटा हा शब्द वापरला जातो. एखादे प्रस्थापित क्षेत्र म्हणूनही व्हर्स हा शब्द वापरला जातो. प्रस्थापित क्षेत्राच्या पलीकडे किंवा वर जाणारे नवे क्षेत्र म्हणजे मेटाव्हर्स. अर्थात हा झाला शाब्दिक अर्थ. डिजिटल व्यवहारात मेटाव्हर्सचा ढोबळ अर्थ व्हर्च्युअल किंवा आभासी अनुभवांचे जग. सध्याचे इंटरनेटचे जग तसे द्वीमिती. ते उलगडते लांबी रुंदी असलेल्या द्विमिती पडद्यावर. मेटाव्हर्सची दुनिया आभासी त्रिमितीची तर, असेलच पण वावराच्या, संवेदनांच्या ज्या शक्यता प्रत्यक्ष जगामध्ये उपलब्ध नाहीत, त्याही तिथे अनुभवायला मिळू शकतील. फेसबुकचे नामांतर ही या ‘मेटा’ अनुभव विश्वाची नांदी आहे.  या नव्या आभासी विश्वात नेमके काय असेल?- त्याबाबत या लेखाच्या उत्तरार्धात, उद्या!vishramdhole@gmail.com

टॅग्स :Facebookफेसबुक