डॉ. बाबासाहेब आंबेडकर व म. गांधी हे लोकोत्तर नेते होते. दोघांचाही लोकशाहीवर विश्वास होता. दोघांचाही रक्तपातास विरोध होता. म. गांधींनी सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा अंगीकार केला, तर बाबासाहेबांनी समता, स्वातंत्र्य, बंधुभाव या तत्त्वत्रयींचा पुरस्कार केला. दोघांनीही राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायासाठी सत्याग्रही मार्गांचा अवलंब केला. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी उभारण्यात आलेल्या मंडपात गांधीजींचा फोटो होता.
अस्पृश्यता निवारणासाठी हिंदू समाजाचे मतपरिवर्तन व्हायला हवे, असे म. गांधींना वाटे, तर बाबासाहेबांची वृत्ती मुळावर घाव घालणारी होती. अस्पृश्यांची मुक्ती पारंपरिक ग्रामव्यवस्थेत होऊ शकत नाही, म्हणून खेडी नष्ट करा, असे बाबासाहेब सांगत, तर गाव हाच भारतीय समाजव्यवस्थेचा कणा आहे, म्हणून गांधी ग्रामस्वराज्याची भाषा करीत. गांधींचा राष्ट्रवाद राजकीय स्वातंत्र्याला प्राधान्य देणारा होता, तर बाबासाहेबांचा राष्ट्रवाद राजकीय स्वातंत्र्याबरोबरच स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या तत्त्वत्रयींवर आधारित होता. धर्मांतरामुळे काहीच साध्य होणार नाही, असे गांधी सांगत; पण धर्मांतराने दलितांना स्वतंत्र ओळख दिली.
हिंदू समाजात फूट पडेल या सबबीखाली म. गांधींचा अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारासंघास विरोध होता. बाबासाहेबांचा मात्र काही काळ विभक्त आणि नंतर अस्पृश्यांच्या संमतीने संयुक्त मतदारसंघ ठेवण्यातच अस्पृश्यांचे हित आहे, असा दावा होता. अस्पृश्यांचे आपणच एकमेव पुढारी आहोत, असा दावा करणाऱ्या म. गांधींनी १९३१ साली म्हटले होते, ‘आंबेडकरांना माझ्या तोंडावर थुंकण्याचा अधिकार आहे, ते आपले डोके फोडत नाहीत, हा त्यांचा संयम आहे.’