‘माय बॉडी माय राईट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:10 AM2017-08-17T00:10:55+5:302017-08-17T00:10:58+5:30

‘माय बॉडी माय राईट’ही चळवळ जागतिक पातळीवर फार पूर्वीच सुरू झाली असली तरी भारतात तिचा फारसा प्रभाव पडू शकला नव्हता.

'My Body My Right' | ‘माय बॉडी माय राईट’

‘माय बॉडी माय राईट’

googlenewsNext

‘माय बॉडी माय राईट’ही चळवळ जागतिक पातळीवर फार पूर्वीच सुरू झाली असली तरी भारतात तिचा फारसा प्रभाव पडू शकला नव्हता. कालांतराने ती मागेही पडली. परंतु अलीकडेच ‘माय बॉडी माय चॉईस’ या अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या व्हिडिओने मात्र विविध समाज माध्यमांमधून स्त्रीच्या तिच्या शरीरावरील अधिकाराबाबत चर्चा सुरू झाली आणि यानिमित्ताने शरीरावरील अधिकार म्हणजे काय? याचाही उहापोह झाला. स्त्रियांनी यशाची अनेक क्षेत्रे पादाक्रांत केली असली तरी, तिचे शरीर म्हणजे निव्वळ उपभोगाची वस्तू असल्याचा ‘गैर’समज आजही आपल्या या पुरुषप्रधान समाजात दृढ आहे. आपल्या शरीरावर आपलाच अधिकार आहे, हे सत्य असले तरी स्त्रियांच्या बाबतीत मात्र अजूनही त्याला मान्यता मिळालेली नाही अथवा तिच्यासंदर्भात वेगळा नियम लावला जातो असेही म्हणता येईल. खुद्द स्त्रीलासुद्धा आपला हा हक्क राखता आला नाही, हेही तेवढेच खरे. आपल्या संस्कृतीत जिथे स्त्रियांची वेशभूषा, तिचे वागणे, बोलणे, फिरणे इथपासून तर अगदी लहानसहान गोष्टींचे निर्णय तिच्या कुटुंबातील पुरुष अथवा समाज घेत असतो तिथे तिने आपल्या शरीरावर हक्क सांगणे म्हणजे दिवास्वप्नच म्हणायचे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निर्णयामुळे हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वैवाहिक बलात्कार हा फौजदारी गुन्हा ठरत नसल्याचे धक्कादायक आणि स्त्रीचा तिच्या शरीरावरील अधिकार अमान्य करणारे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मर्जीविरुद्ध केलेले लैंगिक कृत्य कायद्यानुसार बलात्काराच्या गुन्ह्याचा भाग असावे का, यावर सर्वंकष चर्चा झाली असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने उपरोक्त मत मांडताना स्पष्ट केले आहे, हे विशेष! आपल्या या मतातून एकाअर्थी लग्नानंतर स्त्रीचा तिच्या शरीरावर अधिकार राहत नाही, असेच सर्वोच्च न्यायालयाला विशद करायचे आहे काय? महिलांसाठी कार्यरत संघटना यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता लक्ष लागून आहे. कारण स्त्रियांना ज्या लैंगिक अत्याचारांचा सामना करावा लागतो त्यातील हा एक भीषण प्रकार असल्याचे निदर्शनास आले आहे. लैंगिक गरज भागविणे हा विवाहामागील एक उद्देश असला तरी, स्त्रीच्या सहमतीशिवाय असे करणे हा खरे तर तिच्यावरील अन्यायच ठरतो. पण आपल्या या समाजात लग्न हाच स्त्री समोरील आयुष्य जगण्याचा एकमेव पर्याय मानला जात असल्याने आणि यावरूनच तिचे चरित्र ठरत असल्याने बरेचदा तिला ही घुसमट सहन करावी लागते.

Web Title: 'My Body My Right'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.