- रामचन्द्र गुहा(इतिहासकार आणि स्तंभलेखक)माझ्या मागील लेखात मी असे म्हटले होते की, भारताची फाळणी झाली नसती तर इथली परिस्थिती आणखी बिकट झाली असती. त्या लेखावर बऱ्याच वाचकांनी प्रतिक्रिया दिल्या. पैकी काही कौतुकाच्या तर काही विरोधातल्या. अर्थात त्या मला अपेक्षित होत्या. कारण फाळणी हा तसा नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. काहींनी मला जवाहरलाल नेहरुंचा समर्थक तर काहींनी मला रा.स्व.संघाचा समर्थक म्हटले.मी त्या लेखात असे म्हटले होते की, १९४६ सालचा ‘कॅबिनेट मिशन आराखडा’ जर स्वीकारला गेला असता तर भारत आणखीच दुबळा आणि विभागला गेला असता. फाळणी म्हणजे त्यातल्या त्यात दगडापेक्षा वीट मऊ असा प्रकार होता. काग्रेस आणि मुस्लिम लीगकडून येणाऱ्या विसंगत मागण्या येत असताना मागे फिरण्यात तरी काही अर्थ होता का? काही लेखकांच्या मते, गांधीजींनी १९४२ सालच्या भारत छोडो आंदोलनातून लक्ष काढून ते फाळणीच्या विषयावर केंद्रित केले होते. या आंदोलनामुळे इंग्रज कॉँग्रेसवर नाराज होते आणि म्हणून त्यांनी त्या पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात पाठवले होते. त्याच दरम्यान जीनांना पुरेसा वेळ मिळाला आणि त्यांनी मुस्लिम लीगची संघटनात्मक बांधणी केली, शिवाय ते सत्ताधाऱ्यांच्या जवळसुद्धा गेले होते.१९४० साली मुस्लिम लीगने संमत केलेला पाकिस्तानचा ठराव अनेक लेखकांच्या स्मरणात असेल. इतिहास संशोधक डेव्हिड गिलमार्टिन आणि वेंकट धुलिपाला यांच्या मते त्यावेळी देशभरातले मुसलमान स्वतंत्र राष्ट्राच्या संकल्पनेकडे ओढले गेले होते. १९४६पर्यंत पाकिस्तानच्या मागणीचा जोर आणि त्याला असलेले समर्थन वाढतच गेले. त्यावेळी जिना मुसलमानांचे एकमेव प्रवक्ते आणि या मागणीचे प्रभावी प्रचारक झाले होते. आता थोडे मागे म्हणजे १९३७ सालात जाऊ. त्यावेळी कॉँग्रेसने मुस्लिम लीगसोबत प्रांतीय स्तरावर युती करण्यास नकार दिला होता. मुंबई सारख्या महत्वाच्या प्रांतात कॉंग्रेसने तिथले नेतृत्व पारशी ऐवजी हिंदू नेत्याच्या हाती दिले आणि त्यामुळे कॉँग्रेसवर बहुसंख्यकत्वाचे आरोप झाले, ज्याचा परिणाम पुढे धार्मिक विभागणीच्या रूपाने पुढे आला.फाळणीचे मूळ शोधताना ते आणखी मागे म्हणजे १९३० सालात जाते. त्यावेळी कवी मुहम्मद इकबाल मुस्लिम लीगचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. त्यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी म्हटले होते की, ‘भक्कम अशा उत्तर-पश्चिम भारतीय मुस्लिम राज्याची निर्मिती हे मुस्लिमांचे उद्दिष्ट असले पाहिजे, किमान उत्तर-पश्चिम मुस्लिमांचे तरी’. एका प्रतिष्ठित मुस्लिम नेत्याकडून आलेले फाळणीसंबंधीचे हे पहिले स्पष्ट वक्तव्य होते. नेमकी त्याच वेळी तर पाकिस्तानची अपरिहार्य नक्की झाली नसेल? किंवा त्यातच पुढे बंगाल ते पंजाब, सिंध, बलुचिस्तान आणि उत्तर-पश्चिम प्रांत अशा मुस्लिम बहुल भागाचा विचार करून आणखी भर पडली नसेल? हे सगळे इथेच संपत नाही. थोडे आणखी मागे गेले तर, पाकिस्तानचे बीज आदरणीय इकबाल यांनी नाही तर आदरणीय गांधींनी जास्त रोवलेले दिसते. १९२० ते १९२२ च्या काळात गांधींनी खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळीचे नेतृत्व केले. या चळवळीच्या निमित्ताने त्यांचा पहिल्यांदाच संबंध उलेमांशी आला आणि आधुनिकीकरणाच्या वाटेवर असणारे मुस्लिम दुरावले गेले. दुसऱ्यांंदा त्यांचा उलेमांशी संबंध आला तो इंग्रज सरकारच्या विरोधात रस्त्यावरच्या निदर्शनांच्या निमित्ताने. (जरी तो अहिंसक होता) त्यामुळे नेमस्त लोक दुरावले गेले. त्यावेळी जिना हे मुस्लिमांचे नेते म्हणून उदयास येत होते. त्यांच्याकडे दोन्ही प्रकारच्या मुस्लिमांचे नेतृत्व होते. त्यांनी दोन्ही आघाड्यांवर गांधीजींना विरोध केला होता. म्हणूनच गांधी समर्थकांनी डिसेंबर १९२० सालच्या महत्वपूर्ण अशा नागपूर कॉंग्रेसमध्ये त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. गांधी आणि जिना यांच्यात १९२०पर्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते. त्या नंतर त्यांच्यातले संबंध ताणले गेले. त्यामुळे कदाचित नागपूर कॉंग्रेसमध्येच फाळणीच्या मुळाचा शोध संपतो. आणखी खोलात शिरले तर आपला शोध १९२० सालात नाही तर १९०६ सालात जातो. त्यावेळी मुस्लिम जमीनदार आणि संस्थानिकांच्या एका गटाने व्हॉईसरॉय लॉर्ड मिंटोची भेट घेऊन आपल्याला स्वतंत्र मतदारसंघ मिळावा अशी मागणी केली होती. त्यांना हिंदू प्रभावापासून संरक्षण म्हणून तो हवा होता. त्यांची ही मागणी मंजूर झाली आणि त्यानंतरच मुस्लिम मतदार उर्वरित मतदारांपासून वेगळे होत गेले. त्यापायीच सांप्रदायिक राजकारणाच्या प्रक्रि येला चालना मिळाली आणि वेगळ्या राष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली गेली. तर्क-वितर्क आणि कट-कारस्थानांची चिकित्सा व दिवंगत नेत्यांची बदनामी चालूच राहील. पण या लेखाचा अंत आपण फाळणीच्या पुढे जाऊन करु या. भारतीयांसमोर दोन राष्ट्रांच्या निर्मितीमुळे एक मुलभूत प्रश्न नेहमीच उभा राहतो, तो असा की इथे राहिलेल्या मुसलमानांसोबत सरकारने कसे वागावे? १९४७ नंतर हिंदू आणि शीख निर्वासितांचा ओघ भारतात यायला सुरु झाली होती. त्यांच्या या दुर्दशेमुळे त्यांनी दिल्ली आणि उत्तर भारतातील मुसलमानांचा तसाच बदला घ्यावा अशी मागणी पुढे केली होती. गांधींनी याला विरोध केला. १५ नोव्हेंंबर १९४७ रोजी त्यांच्या भाषणात त्यांनी म्हटले होते, ‘माझे असे मत आहे की भारत हिंदू आणि मुस्लिम अशा दोघांचा आहे. जे काही घडले, त्यासाठी तुम्ही मुस्लिम लीगला दोषी मानू शकता. द्विराष्ट्राच्या संकल्पनेच्या मुळाशी मुस्लिम लीगचे भूत होते आणि ही विषवल्ली त्यांनीच रोवली होती. तरी देखील मी असे म्हणेन की ते जसे वागले तसे आपण वागलो तर ती हिंदू धर्माशी प्रतारणा ठरेल’. जाहीर भषणे तसेच रेडिओवरील संभाषणांमधून गांधी आपल्या हिंदू सहकाऱ्यांना सतत सांगत होते की ‘पाकिस्तानात काहीही घडले असले तरी मुसलमांना आपल्या बंधूसारखी वागणूक देणे हे आपले परम कर्तव्य आहे’. आपल्या या संदेशाचा काहीही परिणाम होत नाही असे जाणवल्यानंतर मग ते उपोषणाला बसले. दिल्लीतला हिंसाचार त्यापायी थोडा शमला गेला. त्यानंतर ३० जानेवारी १९४८ रोजी त्यांची हत्त्याच झाली. आपल्यापैकीच एकाने राष्ट्रपित्याची हत्त्या केल्याचे पाहून हिंदू भयचकित झाले. त्यामुळे त्यांच्याकरवी मुसलमानांवर होणारे हल्ले थांबले आणि ऐक्य साधले गेले.फाळणीच्या सात दशकानंतर हा वाद केवळ अभ्यासाचा विषय राहिला आहे. पण आता प्रश्न असा उभा राहिला आहे की फाळणीचे जे अवशेष राहिले आहेत त्यांचे व्यावहारिक महत्व लक्षात घेऊन त्यांना दडपून कसे ठेवायचे? हिंदुत्ववादी विचारसरणी असलेले लोक नेहमीच मुसलमानांच्या राष्ट्रनिष्ठेची परीक्षा घेत असतात. इथे मात्र गांधींचे शब्द सुसंगत वाटतात. पाकिस्तान किंवा बांगलादेश यांनी तिथल्या अल्पसंख्यकांना कसेही वागवले असले तरी भारतीयांनी मात्र प्रतिशोधाच्या भावनेपासून दूरच राहिले पाहिजे.
मुस्लिम प्रतिशोधाच्या भावनेपासून दूर राहायला हवे
By admin | Updated: September 12, 2015 03:44 IST