शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

महागड्या मुंबईत माणसाचा जीव सर्वात स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 05:21 IST

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महागड्या मुंबईत सर्वात स्वस्त काय असेल, तर तो माणसाचा जीव हेच छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळ गुरुवारी रात्री कोसळलेल्या पुलाने दाखवून दिले.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महागड्या मुंबईत सर्वात स्वस्त काय असेल, तर तो माणसाचा जीव हेच छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळ गुरुवारी रात्री कोसळलेल्या पुलाने दाखवून दिले. गेल्या दोन वर्षांत पूल आणि पुलाचे भाग पडण्याच्या दोन मोठ्या घटनांत आठ जणांचे जीव गेल्यावर, तसेच त्यापूर्वी एल्फिन्स्टन रोड स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीत २२ जणांचा मृत्यू झाल्यावरही पालिका असो, रेल्वे की मुंबईतील अन्य प्रशासकीय यंत्रणा सुधारलेल्या नाहीत, उलट त्या अधिक निर्ढावलेल्या आहेत, हेच यातून दिसून आले. पुलांच्या दुरुस्तीचे विषय वेगवेगळ्या यंत्रणांनी आपापल्या लाल फितीत हद्द आणि टक्केवारीच्या हिशेबात अडकवून ठेवल्याचा हा गंभीर परिणाम आहे. सार्वजनिक सेवांवर विसंबून असलेल्या नागरिकांवर कधी कमान कोसळण्याची, तर कधी पुलावरून चालताना त्याचा तळ कोसळून जीव जाण्याची घटना घडते, याचा दोष कोणाचा हे स्पष्टपणे ठरविण्याची वेळ आली आहे.अंधेरीत गोखले पुलालगतचा पादचारी पूल रेल्वेवर कोसळल्याच्या घटनेनंतर सर्व पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा निर्णय घेतला गेला. तेव्हा मुंबई आयआयटीच्या पाहणीत ४४५, तर पालिकेच्या पाहणीत २९६ पुलांची स्थिती कमकुवत आढळून आली. आयआयटीच्या अहवालातील निरीक्षणे कठोर असल्याने ती आजतागायत बाहेर आली नाहीत. पण पालिकेच्या अहवालानुसार १८ पूल पाडण्याची, १२५ पुलांच्या मोठ्या दुरुस्तीची गरज होती आणि ज्या १५३ पुलांची किरकोळ दुरुस्ती सुचवली होती, त्यातीलच हिमालय पूल कोसळला!आजवरच्या सर्व दुर्घटनांनंतर एकाही अधिकाऱ्यावर कधीही थेट कारवाई झाली नाही. यंत्रणेतील ढिलाई, बेपर्वाई समोर येऊनही खात्यांतर्गत चौकशी, निलंबनापलीकडे काही घडले नाही. तशी कारवाई होईल असे दिसताच कामगार संघटनांनी त्याला विरोध केला. त्यामुळे न्यायालयात दाद मागून यंत्रणांना कामाला लावण्याचा प्रयत्न जागरूक मुंबईकरांनी, विविध सामाजिक संस्थांनी केला. त्या आधारे दोन वर्षांत न्यायालयाने वारंवार ताशेरे ओढूनही सर्व यंत्रणा, खासकरून पालिका आणि रेल्वे परस्परांकडे बोट दाखवत बसल्या. अखेर या दोन्ही यंत्रणांना समज देण्याची वेळ न्यायालयावर आली. त्यानंतरही हिमालय पूल पडल्याचे कळताच दोन्ही यंत्रणांनी परस्परांकडे बोट दाखवण्याचा खेळ पार पाडलाच. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाच हस्तक्षेप करून जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश द्यावे लागले.गोखले पुलाप्रमाणेच येथेही जीर्ण पुलावर सौंदर्यीकरण आणि डागडुजीच्या नावाखाली सिमेंटच्या लाद्या, रेती यांचा थर वाढवण्यात आला आणि तो असह्य झाल्याने पूल कोसळल्याचे प्राथमिक निरीक्षण आहे. तसे असेल तर क्षमतेची तपासणी न करता या पुलाच्या दुरुस्तीला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर केवळ सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून भागणार नाही, तर त्यांना तुरुंगात डांबून त्यांच्यावर खटले भरत शिक्षा ठोठवायला हवी. मुंबईकरांच्या सहनशीलतेचा महापालिका गैरफायदा घेत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि त्यानंतर काही तासांत त्यावर शिक्कामोर्तब करणारी घटना घडली.महामुंबईचा, तेथील दोन कोटींहून अधिक लोकसंख्येचा पसारा पाहता या संपूर्ण परिसराचा गाडा हाकणे हे एका यंत्रणेचे काम नव्हे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रशासकीय यंत्रणा येथे काम करतील हे गृहीत आहे. गरज आहे त्यांच्यातील समन्वयाची. जबाबदारी निश्चित करण्याची. त्यांच्याशी संबंधित खटले जलदगतीने निकाली लावण्याची. ते होत नसेल, तर त्यातील कोणी तक्रार घेऊन आपल्याकडे येईल आणि त्यानंतर आपण लक्ष घालून हा प्रश्न सोडवू या भूमिकेतून बाहेर पडून राज्य सरकारने या दुर्घटनेनिमित्ताने आपला अधिकार वापरत जबाबदारी निश्चित करून देण्याची गरज आहे. एखाद्या पक्षाला काय वाटते, याचा विचार न करता या संपूर्ण यंत्रणेवर देखरेख करणारी, नियंत्रण ठेवणारी, प्रसंगी आपले अधिकार वापरून हस्तक्षेप करणारी व्यवस्था उभारायला हवी. तरच ही कोसळणारी मुंबई थोडी तरी सावरता येईल आणि या मुंबईकरांना कोणी वाली आहे, हे दिसून येईल.

टॅग्स :CST Bridge Collapseसीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका