तोंड बंद...मसाला गायब !

By सचिन जवळकोटे | Published: April 26, 2018 12:02 AM2018-04-26T00:02:51+5:302018-04-26T08:53:18+5:30

केसपेपर घेऊन नेता रुबाब न करता गपगुमानं कोपऱ्यातल्या बाकड्यावर बसला.

Mouth closed ... spice disappears! | तोंड बंद...मसाला गायब !

तोंड बंद...मसाला गायब !

Next

गेल्या चार-पाच दिवसांपासून डॉक्टर का.न. तोंडे यांच्या ‘इएनटी’ हॉस्पिटलमध्ये खच्चून गर्दी होऊ लागलेली. प्रवेशद्वारातील रिसेप्शनिस्टचा हात नवीन केसपेपर्स तयार करता-करता भलताच दुखू लागलेला. विशेष म्हणजे बहुतांश पेशंटस्चा आजार जीभेशीच संबंधित. आत्ताही एक नवा पेशंट आला.
नवा केसपेपर हातात घेत रिसेप्शनिस्टनं विचारल, ‘नाव काय?’... पण पेशंट गप्पच. त्याच्या अंगात कडक स्टार्चचा खादी ड्रेस. कपाळावर मात्र सतराशेसाठ जाळ्या. शेजारी उभी असलेली बहुधा त्याची पत्नी असावी. ‘तुमच्या मिस्टरांना काय झालंय?’ असं विचारताच नेत्याच्या सौभाग्यवतीनं सांगितलं, ‘गेल्या चार दिवसांपासून ते बोलतच नाहीत. तोंडातून आवाजच फुटेनासा झालाय,’ रिसेप्शनिस्टनं पुटपुटत केसपेपर रखडला, ‘बाईऽऽगं.. एकशे सहावा पेशंट हा. इथंही तोच प्रॉब्लेम. नक्कीच साथीचा रोग झालाय या राजकीय नेत्यांच्या जीभेला!’
केसपेपर घेऊन नेता रुबाब न करता गपगुमानं कोपऱ्यातल्या बाकड्यावर बसला. हॉस्पिटलमध्ये सारेच पेशंट खादीधारी. प्रत्येकजण एकमेकाला ओळखणारा. मात्र एकमेकांशी बोलण्याची कुणाचीच तयारी दिसत नव्हती. सारेच नाकासमोर बघून बसलेले. जणू ‘हातावर घडी... तोंडावर बोट.’ विशेष म्हणजे, प्रत्येकाचं नाक भलतंच चमकू लागलेलं. दुसºयांच्या खासगी गोष्टीत नाक खुपसण्याची सवय सुटल्यामुळं कदाचित. एवढ्यात पोटाला हात धरून कळवळत एक पत्रकार हॉस्पिटलमध्ये आला. चेहरा पुरता नि:स्तेज. पोट खंगलेलं. तसं तर ते नेहमीच आत गेलेलं असतं, ही बाब अलहिदा. त्याला बघताच आतला प्रत्येकजण दहा फूट लांब. एवढ्यात नंबर पुकारताच नेता सौभाग्यवतीसह आत गेला. तिनं प्रॉब्लेम सांगताच डॉक्टरांनी काहीही न बोलता प्रिस्किप्शन लिहून दिलं. ते वाचून मात्र नेत्याची पत्नी चपापली; कारण त्यात औषधांचा उल्लेख नव्हताच. फक्त दहा-दहा किलो वजनाची दगडं दोन्ही पायांना बांधण्याचा सल्ला दिलेला. ‘डॉक्टरऽऽ माझ्या मिस्टरांच्या पायाला दगडं बांधल्यानं त्यांच्या तोंडाचा प्रॉब्लेम थोडाच सुटणार?’ तिनं काकुळतीला येऊन विचारताच डॉक्टर गालातल्या गालात हसत उत्तरले, ‘काळजी नको; गेल्या तीन दिवसांत मी जवळपास शंभरपेक्षाही जास्त नेत्यांना हाच सल्ला दिलाय अन् तो उतारा जणू ‘रामबाण’ ठरलाय... कारण जड वजनामुळं या साºया नेत्यांचे पाय जमिनीवर येतायेत. त्यामुळं त्यांच्या तोंडाचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह होतोय.’
पेशंटनं आ वासला. गळ्यातल्या भगव्या उपरणानं कपाळावरचा घाम पुसत त्यानं केबिनचा दरवाजा उघडला. एवढ्यात तो पत्रकार बडबडत आत शिरला, ‘डॉक्टरऽऽ गेल्या चार दिवसांपासून माझ्या पोटात आग पडलीय. शरीरात कुठलंच त्राण राहिलेलं नाही,’ तेव्हा डॉक्टर उत्तरले, ‘तुमच्या शरीरात ऊर्जा देणारे व्हिटॅमिन्स् कमी झालेत, जे रोजच्या मसाल्यात असतात.’ बोलता-बोलता त्यांनी ड्रॉवरमधल्या मसाला शेंगा त्याला खाऊ घातल्या. काही क्षणातच पत्रकार फ्रेश झाला. ‘हा चमत्कार कसा काय घडला?’ या प्रश्नाला उत्तर न देता डॉक्टरांनी केवळ पेपरातली हेडलाईन दाखविली, ‘तोंड आवरा; माध्यमांना मसाला देऊ नका. मोदींनी दिला भाजप नेत्यांंना इशारा!’

Web Title: Mouth closed ... spice disappears!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.