शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

माइंडक्लोन्स: आता मृत्यूनंतरही जिवंत राहा; ही अशक्यप्राय कल्पना नाही, तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 05:49 IST

आपल्या मृत्यूनंतरही आपले माइंडक्लोन्स जिवंत असतील, बोलतील, आठवणी सांगतील... हे शक्य व्हावं यासाठी चाललेल्या प्रयत्नांची कहाणी...

अच्युत गोडबोले, ख्यातनाम लेखकसहलेखिका- आसावरी निफाडकर

आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू हा सगळ्यात मोठा आघात असतो. त्यांच्या स्मृती आपल्याबरोबर कायम असतातच, पण उद्या या स्मृती कदाचित मूर्तरूपात आपल्या समोर प्रकटतील !

२०१३ च्या सुमारास विल्यम सिम्स ब्रेनब्रिज या संशोधकानं ‘पर्सनॅलिटी कॅप्चर’ची संकल्पना मांडली. ‘एखाद्या माणसाला पूर्णपणे जाणून घेऊन त्याला ‘री-क्रिएट’ करायचं; त्यासाठी त्या व्यक्तीला किमान लाखभर प्रश्न विचारायचे आणि मिळालेल्या उत्तरांची त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित आणि इतर अशा दोन भागांमध्ये विभागणी करायची. ही माहिती मग AI च्या ‘माइंडफाईल’ या सॉफ्टवेअरला पुरवली की, ते सॉफ्टवेअर त्या व्यक्तीचा अवतार बनवू शकेल,’ 

- अशी ती संकल्पना होती. पण त्यात प्रगती झाली नाही. त्याच सुमारास बेल लॅब्समधल्या थॉमस लॅन्डर यानंही असेच प्रयोग केले होते. माणसाची स्मरणशक्ती किती असते हे तपासण्यासाठी त्यानं अनेक लोकांना बरीच चित्रं दाखवली आणि अनेक वाक्यं वाचायला दिली. काही दिवसांनी त्यांना परत ती चित्रं आणि वाक्यं आठवताहेत की नाही, हे तपासलं. असे अनेकदा प्रयोग केल्यावर त्याला माणूस दर सेकंदाला २ बिट्स एवढी माहिती लक्षात ठेवू शकतो, म्हणजेच त्याच्या संपूर्ण आयुष्यात हजारो मेगाबाईट्स माहिती तो लक्षात ठेवू शकतो, हे त्यानं शोधून काढलं होतं !

जानेवारी २०१४ मध्ये एमआयटीमध्ये आयोजित ‘इंटेन्सिव्ह प्रोग्रॅम फॉर आंत्रप्रुनर्स’ या वर्कशॉपमध्ये मारीयस उराश्चे या तरुणानं आपली ‘स्काईप विथ दी डेड’ नावाची कल्पना मांडली. आपले विचार, आठवणी, सवयी हे सगळं साठवता येईल, असं एखादं टूल बनवून त्यावर प्रक्रिया करून आपल्यासारखाच एक आपला ‘अवतार’ म्हणजेच आपला क्लोन तयार करायचा, असं ठरलं. तो आपल्या मनाच्या आठवणीतला क्लोन असल्यानं त्याला ‘माइंडक्लोन’ म्हणतात. २८ जानेवारी २०१४ रोजी या कल्पनेचं ‘इटर्नी.मी’ असं बारसं झालं. या विचित्र वाटणाऱ्या कल्पनेत कोणाला रस असेल का, हे बघण्यासाठी एक वेबपेज तयार केलं गेलं. आश्चर्य म्हणजे अल्झायमर, कॅन्सर अशा अनेक जीवघेण्या आजारांशी लढणाऱ्या आणि आयुष्यातले काही महिनेच हातात असलेल्या हजारो रुग्णांकडून त्याला इमेल्स आले. २०१५ साली उराश्चेनं ‘इटर्नी.मी (Eterni.me)’ नावाचं एक सॉफ्टवेअर तयार केलं.  या सॉफ्टवेअरच्या मदतीनं आपण आपली ‘डिजिटल फूटप्रिंट्स’ आपल्यामागे सोडून जाऊ शकतो. म्हणजे चक्क आपल्या 3D अवताराच्या रूपात आपले आप्त त्यांच्या मृत्यूनंतरही आपल्या संपर्कात राहू शकतील. हे जरी विचित्र वाटत असलं तरी, त्याच्या या कल्पनेनं प्रत्यक्षात यायच्या आधीच धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. 

जिवंत असतानाचा आपला स्वभाव, हावभाव, गुण-अवगुण, आवडी-निवडी या सगळ्यांचा अभ्यास करून उद्या त्यांचं एक ‘कोड’ तयार करून ते अल्गॉरिदममध्ये टाकलं जाईल आणि त्यातून आपले डिजिटल अवतार तयार होतील. ते आपल्या आठवणी, अनुभव, आवडी-निवडी सगळं पुढच्या पिढीबरोबर शेअर करू शकतील. आपल्या मृत्यूनंतरही आपले माइंडक्लोन्स प्रत्यक्ष त्यांच्यासमोर बसून बोलतील, सगळीकडे वावरतील, आठवणी सांगतील वगैरे. आपला डिजिटल अवतार तयार करण्यासाठी आज तब्बल ३०,००० लोक प्रतीक्षा करताहेत ! पण आपल्या आयुष्यभराच्या स्मृती साठविणार तरी कशा आणि कुठे?

नैसर्गिकरित्या आपल्या मेंदूतल्या ‘हिपोकॅम्पस’ नावाच्या भागात आपल्या लांब पल्ल्याच्या (लाँग टर्म) स्मृती साठविल्या जातात. २०११ साली वेक फॉरेस्ट युनिव्हर्सिटी आणि सदर्न कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी यांनी मिळून चक्क एक कृत्रिम ‘हिपोकॅम्पस’ तयार करण्यात यश मिळवलं. कृत्रिम ‘हिपोकॅम्पस’चा उपयोग स्मृती साठविण्यासाठी खरंच करता येऊ शकेल का, हे तपासण्यासाठी त्यांनी एका उंदरावर एक प्रयोग केला आणि तो यशस्वीही झाला. कृत्रिम ‘हिपोकॅम्पस’ बंद झाला की त्या उंदराची ती स्मृतीही नष्ट होते आहे, हेही त्यांच्या लक्षात आलं. थोडक्यात आपल्या स्मृती अशा कृत्रिम ‘हिपोकॅम्पस’मार्फत कॉम्प्युटरमध्ये आणि एक्स्टर्नल हार्ड डिस्कमध्ये डिजिटल रूपात आपण जसा आपला डेटा साठवतो, तशाप्रकारे साठवता येऊ शकतील आणि त्यातल्या स्मृती डाऊनलोडही करता येतील !

हे झालं मृतकांच्या ‘लाईफ आफ्टर डेथ’च्या बाबतीत. पण एखादी व्यक्ती जेव्हा लहान वयात मृत्युमुखी पडते, तेव्हा तिच्या जवळची मंडळी, ही व्यक्ती जगली असती, तर तिनं पुढे आपल्या आयुष्यात काय काय केलं असतं, याचा अंदाज बांधतील आणि उद्या त्यांचेही डिजिटल अवतार करता येतील ! २०१५ साली मार्टिन रुथबोल्टनं आपली बायको बिना अस्पेन हिच्यासारखा ‘बिना ४८’ नावाचा रोबॉट लोकांसमोर आणला. हा रोबॉट तयार करण्याआधी ३ वर्षांपूर्वी खऱ्या बिनाची २० तास मुलाखत घेतली गेली. त्यात तिच्या लहानपणापासूनच्या अनेक आठवणी, सवयी, आवडी-निवडी या सगळ्यांबद्दल तिनं सांगितलं. ही मुलाखत मग AI च्या सॉफ्टवेअरमध्ये लोड केली गेली. हे सॉफ्टवेअर एका ‘कॅरेक्टर इंजिन’मध्ये घालून मार्टिननं बिनासारखा दिसणारा हा रोबॉट तयार केला. ‘बिना ४८’ अगदी खऱ्या बिनासारखी वागते, हसते, बोलते आणि उत्तरं देते. त्यामुळे खरी बिना जिवंत राहिली नाही तरी, ती ‘बिना ४८’च्या रूपात कायम जिवंत राहील ! उद्या आपण आपले ‘माइंडक्लोन्स’ म्हणजे आपली डिजिटल कॉपी तयार करून ठेवू शकू. अशा अनेक क्लोन्सचे अनुभव आणि माहिती यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात ‘डेटा’ निर्माण होऊ शकतो. याचा फायदा अनेक क्षेत्रातल्या अनेक कंपन्यांना नकळतपणे होईल. ही अशक्यप्राय कल्पना नाही, तर प्रत्यक्षात येऊ पाहणारं वास्तव आहे; कारण कदाचित पुढच्या २०-३० वर्षांतच ‘माइंडक्लोनिंग’ शक्य होईल !! 

godbole.nifadkar@gmail.com