शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘हिंमत करो, पता तो चलही जाता है.. है ना?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 05:22 IST

पैसा-प्रसिद्धी-स्पर्धा-वेग हे आधुनिक दंश होण्याआधीच्या काळातल्या कलावंतांकडे कलेखेरीज आणखी एक जादू होती - आयुष्याच्या रहस्यांचे तुकडे!

- अपर्णा वेलणकर, कार्यकारी संपादक, लोकमतकाही माणसे शरीराने उरली नाहीत, तरी असतात. हजारो आयुष्यांना त्यांनी केलेल्या स्पर्शातून उगवून आलेले अरण्य असावे घनदाट, तशी  सावली धरून उभी असतात. पंडित बिरजू महाराज हे असेच एक झाड होते.. म्हणजे आहे.. असेल! जीवनभराच्या साधनेतून अखंड शोषलेले गायन-वादन-नर्तन हेच आयुष्य होत जाते; तेव्हा हाडा-मांसाच्या मर्त्य मानवी देहातून पावलापावलावर कसे लयदार तत्कार फुटतात, सूर उमलतात आणि लय-तालाची जादू रोजच्या श्वासालाच किती लडिवाळपणे बिलगून असते याचे सदेह उदाहरण म्हणजे महाराजजी! त्यांची आठवण नेहमी रुणझुणतच येते. शास्त्रीय नर्तनाच्या भारतीय इतिहासातले त्यांचे स्थान, कथकच्या घरंदाज रुबाबाचा त्यांनी सांभाळलेला - सतत वर्धिष्णू ठेवलेला आब हे सारे शब्दात न मावेल असे! पण त्यांचा स्पर्श अनुभवलेल्या प्रत्येकाने काळजात जपलेल्या महाराजजींच्या आठवणी मात्र त्यांनी कलाईवर बांधलेल्या मोगरीच्या गजऱ्यासारख्या! आजूबाजूने घमघमती फुले गुंफलेली, पण आयुष्याचे मर्म सांगत त्याच्या आतून धावणारा दोरा हे महाराजजींनी अनुभवातून खणून काढलेले सत्त्व! ** त्यांच्यासोबतच्या सहवासाचे, संवादाचे कितीतरी लखलखते तुकडे आहेत, हा त्यातला एक.

 पंडित बिरजू महाराज आणि शाश्वती सेन. कथकची कार्यशाळा ऐन रंगात आलेली. विविध वयोगटातल्या मुलींचे दोन-तीन गट त्यांना दिलेले ‘टुकडे’ घोटून घेत नाचत असतात.. शाश्वतीदीदींची नजर तेज आणि कान तयार. एखादीच्या पायातल्या घुंगरांचा कणसूर ऐकू यायच्या आतच त्यांची नजर त्या मुलीवर स्थिरावलेली असे... कार्यशाळा ऐन बहरात आलेली.महाराजजी मात्र शुभ्र बिछायतीवर विडा लावत सुखाने बसलेले. मनात नृत्य चालले आहे हे अंगांगात दिसावे अशी लयदार समाधी. तोड्या टुकड्यांबरोबर धावणारी पढंत आणि गिनती चालू. महाराजजींच्या समोरच कार्यशाळेतल्या छोट्या मुलींचा गट. परकऱ्या पोरी. पावले नुक्ती तालात पडू लागलेली. शरीरात नुक्ती लय भरू लागलेली. शास्त्र ‘समजणे’ अद्याप दूर होते. घोकंपट्टी.. गिरवणे.. घोटून घेणे चाललेले.मोठ्या मुली जीव तोडून नाचत होत्या. महाराजजींच्या नजरेखाली ‘शिकणे’ हे किती भाग्याचे; याची त्यांना जाण होती. नजरेत काठोकाठ आदर. निरतिशय प्रेम. धाक.. छोट्या परकऱ्या पोरी  मात्र मजेत होत्या. निर्भर. उसळत्या झऱ्यासारख्या. चुकत चुकत शिकणे चालू होते. शाश्वती दीदीचा ओरडा बसला की खुसुखुसू हसायचे की ‘फिरसे शुरू..’
अचानक महाराजजी उठून त्या पोरींमध्ये नाचायला गेले. शाश्वतीदीदीसकट बाकी साऱ्या जणी स्तब्ध उभ्या राहिल्या. समोर एक जादू सुरू होती. सोपे सोपे भाव... महाराजजी अत्यंत तन्मयतेने त्या छोट्या गटाला शिकवू लागले. तिसऱ्या की चौथ्या रांगेत एक खट्याळ चिमुरडी होती. काही झाले की तिला सारखे हसूच येई. चूक झाली की महाराजजी लटके रागवत.. पुन्हा हसूच येई तिला. शेवटी  एक छोटा ‘टुकडा’ बसला. बाकीच्या पोरींची पावले शिस्तीत पडू लागली. पण हिचे  भलतेच.. तिचे नाचणे लयदार होते; पण इतरांसारखे नव्हते. सुंदर होते, पण शिस्तीत बसणारे नव्हते. महाराजजींनी तिला जवळ घेत विचारले, ‘कहाँ जा रही हो, कुछ पता है?’ ‘कुछ नही पता, महाराजजी’ - म्हणून ती धिटुकली पुन्हा तिच्याचसारखी नाचत राहिली. ‘बहोत खुब बेटे, ऐसेही करते रहना’- महाराजजी म्हणाले. थोडे तिला. थोडे स्वत:लाच! मी समोरच होते. संध्याकाळ झाली, तरी महाराजजींनी त्या चिमुकलीला दिलेली तिच्या मनासारखे नाचण्याची, इतरांहून वेगळे असण्याची परवानगी  मनातून गेली नव्हती.ताल-मात्रांच्या, पढंत-गिनतीच्या गणितात चोख बसवलेली कथकची पावले अशी वेगळ्या दिशेने जाईन म्हणाली, तर ते घराणेदार शिक्षणाला कसे चालेल? समूहाच्या सौंदर्यातून कुणी एकटी शिस्तीचे दार असे बेधडक उघडू पाहील, तर लवलवत्या लयीचे चित्र विस्कटणार नाही का? हे कसे चालेल? संध्याकाळी उशिरा गप्पांची मैफल रंगली. दिवसभराच्या श्रमाने दमलेले महाराजजी ओसंडत्या आनंदाने फुलून आले होते. 
मी सहज विचारले, ‘महाराजजी, कुछ पता नहीं होगा की कहाँ जा रहे है, तो कहाँतक जा पाएंगे?“‘यही तो गलती होती है, बेटे’ - आता त्यांनी माझ्या पावलांची दिशा सुधारायला घेतली होती.‘जिसका पता नहीं होता, वहाँ जाने की हिंमत नहीं होती.. और जब हिंमत नही होगी तो पता कैसे चलेगा?’ क्षणभर श्वासच थांबला.‘हिंमत करो, पता तो चलही जाता है.. है ना?.’- मी न बोलता महाराजजींच्या पायाशी वाकले. का ते त्यांना आधीच कळले होते.** गुरु कोणाला म्हणावे? ज्याच्या सहवासात प्रश्नांच्या गाठी सोडवण्याचे मार्ग गवसतात, जो  आयुष्यावर सावली धरतो, तापत्या उन्हातून चालत राहण्याचे वेड आपल्या आयुष्याला टोचतो, तो आपला गुरू!! - आणि तोही, जो असा एखाद्-दुसरा लखलखता तुकडा सहज काढून आपल्या हातावर ठेवतो!! पैसा-प्रसिध्दी-स्पर्धा-वेग हे आधुनिक दंश होण्याआधीच्या काळातल्या सगळ्या अभावांची- हालअपेष्टांची-उपासतापासांची-प्रसंगी हेटाळणीची किंमत चुकवून ध्यास धरल्यासारखा व्यासंग केलेल्या कलाकारांच्या पाठीला कणा होता. त्यांनी सोसलेल्या-प्यायलेल्या आयुष्याच्या अर्काने त्यांना त्यांची कला दिली होती, आणि आयुष्याची खोल समजूतही! - बिरजू महाराजजी त्या पिढीतले... होते... म्हणजे असतीलच!!! aparna.velankar@lokmat.com