सध्या जगातल्या एकाच मोठ्या देशाचं अर्थकारण सुदृढ आहे. २०१८ मध्ये युरोपचा सरासरी वाढदर ४ टक्के होता. भारताचा ७ टक्क्यांहून अधिक असला तरी तो वांझोटा समजण्यात येतो. कारण त्यामुळे पुरेशी रोजगारनिर्मिती झालेली नाही. मग राहिला चीन. त्याचा वाढदर अगोदरच घटत होता. पण परवा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या देशाच्या ५०० अब्ज निर्यातीवर आयात शुल्क आकारण्याचं जाहीर केलं आणि त्याचे धक्के त्या साम्यवादी देशाच्या अर्थकारणाला बसले. ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार लॅरी कडलो तर म्हणाले, चीनची स्थिती दयनीय आहे. पण या सर्व आजारी देशांत एकच देश उठून दिसतो. अमेरिकेचं अर्थकारण सर्वाधिक सुदृढ असून ते एवढी रोजगारनिर्मिती करीत आहेत की नोकरवर्ग पगार वाढवूनही अपुरा पडतोय.अमेरिकेत जून २०१८च्या तिमाहीत अर्थवाढ ४.१ टक्क्यानं झाली. हे हत्तीनं पळण्यासारखं समजतात. अमेरिकेचं अर्थकारण जगात सर्वांत मोठं. या देशाचं राष्ट्रीय ढोबळ उत्पन्न १८.५७ ट्रिलीयन डॉलर. तुलनेनं चीनचं ११.२ ट्रिलीयन तर भारताचं २.६ ट्रिलीयन डॉलर आहे. अर्थकारणाचा पाया मोठा असल्यामुळे वाढदर भारतासारखा जास्त असू शकत नाही. तरीपण ४.१ टक्के वाढदर म्हणजे दरवर्षी अमेरिका आपल्या राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नात ७६.१४ अब्ज डॉलरची भर घालते तर आपला एके काळी ७.५ टक्के वाढदर असूनही पाया निमुळता असल्यामुळे फक्त १९ अब्ज डॉलरची वाढ करते.ओबामांच्या ८ वर्षांच्या कारकिर्दीत अर्थकारणाचा वाढदर ३ टक्क्यांपेक्षा कधीच वर गेला नाही. तो सरासरी २ टक्क्यांच्या दरम्यान लंगडत राहिला. त्यांच्या सल्लागारांनी या क्षय लागलेल्या वाढीचं समर्थन केलं की जगात भारत, चीनसारख्या देशांची स्पर्धा सुरू असल्यामुळे अमेरिकेला उच्च दर गाठणं यापुढे कठीण होईल. म्हणून आपण २ टक्के वाढदरातच समाधान मानायला पाहिजे. ओबामांच्या शेवटच्या वर्षात अर्थवाढ मृत्युशय्येवर पडली होती. त्या वर्षी वाढदर १.६% होता.या पराभूत वृत्तीचे जनक म्हणजे हार्वर्डचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक व विद्यापीठाच्या अध्यक्षपदावरून पदच्युत झालेले लरी समर्स. ते डाव्या विचारांचे. त्यामुळे त्यांना अमेरिकेचं भविष्य धूसर वाटलं. त्यात भर टाकणारे दुसरे गृहस्थ म्हणजे प्रिन्सटन विद्यापीठाचे नोबेलप्राप्त प्रोफेसर पॉल क्रुगमन. ते ‘न्यू यॉर्क टाइम्स’चे अनेक वर्षांपासून स्तंभलेखक असल्यामुळे डाव्यांमध्ये त्यांचा प्रभाव जास्त. ते ओबामांना देवासमान मानणारे. त्यामुळे ते या कृष्णवर्णीय अध्यक्षांचे नेहमी कौतुक करीत व यापुढे अमेरिकेला प्रगती करण्यास वाव नाही असं रडगाणं गात. ट्रम्प निवडून आलेले बघून त्यांना धक्काच बसला. म्हणून त्यांनी एक धक्कादायक भाकीत जाहीर केलं. ट्रम्पमुळे देशात अतिमंदीचं सावट पसरणार हे त्यांचं सूतोवाच क्रुगमनच्या प्रतिष्ठेमुळे अनेकांनी शिरसावंद्य मानलं. पण काळानं त्यांना साफ खोटं ठरवलं. मग ट्रम्पनी कुठली जादू केली? अवघ्या दीड वर्षात एवढं परिवर्तन कसं केलं? त्यांनी दोन ढोबळ पावलं उचललीत. एक म्हणजे उद्योगांची गळचेपी करणारे नियम सैल केले.
डोनाल्ड ट्रम्प यांचे अर्थकारण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 02:23 IST