शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

आजचा अग्रलेख: भाऊबंदकीचा राडा! शेण, नारळ, सुपाऱ्या... श्रावणातच राजकीय शिमगा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 07:48 IST

श्रावणी पूजेत शेण, नारळ, सुपाऱ्या, विड्याची पाने असे साहित्य लागते. मात्र, आता या साहित्याचा वापर वेगळ्याच कारणांसाठी होऊ लागला आहे.

श्रावणामध्ये श्रावणी पूजा असते. त्यात शेण, नारळ, सुपाऱ्या, विड्याची पाने असे साहित्य लागते. मात्र, आता या साहित्याचा वापर वेगळ्याच कारणांसाठी होऊ लागला आहे. विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर असताना श्रावण महिन्यातच राजकीय शिमगा सुरू झाला आहे, त्यामुळे या साहित्याचा वापरही वेगळ्या कारणांसाठी होत आहे. राज ठाकरे यांच्या दिशेने बीडमध्ये सुपाऱ्या भिरकावल्या, तर ठाण्यात उद्धव यांच्या गाडीवर बांगड्या, शेण फेकले गेले. बीडचा राडा उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा वचपा ठाण्यात मनसैनिकांनी काढला आणि यानिमित्ताने राडा संस्कृतीचे प्रदर्शन पुन्हा एकदा घडू लागले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या वटवृक्षाच्या दोन फांद्यांनी वेगवेगळी वाट धरून आता अठरा वर्षे उलटली. हे दोन भाऊ पुन्हा एकत्र येणार, अशी कोरडी आशा अनेकांना अनेकदा वाटली, त्यासाठी काही लोकांनी प्रयत्नदेखील केले.

काही वर्षांपूर्वी सामोपचाराचे नाना आणि ‘मामा’ प्रयत्नही झाले, पण त्या दोघा भावांना तसे कधीही वाटले नाही. उलट एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न दोघांनी नेहमीच केला. राज हे उद्धव यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवेळी काळा शर्ट घालून गेले होते. दुरावल्यानंतर काहीच प्रसंगात ते एकत्र आले; पण ते तेवढ्यापुरतेच आणि आता तर दोघांनी एकत्र येण्याची शक्यता पूर्ण मावळली आहे. ती मावळण्याला राजकीय महत्त्वाकांक्षेशिवाय कौटुंबिक ताणतणावाचीही किनार असणारच. वाद तर असंख्य घरांमध्ये असतात. भाऊबंदकी हा आपल्या समाजाचा जुना विकार आहे. या विकाराने अनेक कौटुंबिक जिव्हाळ्याचा बळी घेतला. तुमच्या-माझ्या कुटुंबातील वादाला कुटुंबापलीकडे किंवा फारतर नातेवाइकांपलीकडे फारसे महत्त्व नसते.  मात्र, ठाकरेंच्या घराण्यातील भाऊबंदकीला महाराष्ट्राचा संदर्भ आहे.

शिवतीर्थ (राज यांचा बंगला) आणि मातोश्री (उद्धव यांचे निवासस्थान) यांच्यात फार तर तीनएक किलोमीटरचेच अंतर; पण दोन भावांमध्ये आता मोजता न येण्याइतके अंतर पडले आहे. वडील, मातोश्री, शिवसेना आणि शिवसेना भवन, अशी समृद्धता लाभलेले उद्धव हे आज राज यांच्यापेक्षा राजकारणात अधिक चांगल्या पद्धतीने स्थिरावले आहेत. मात्र, ही समृद्धता झुगारून पक्षचिन्ह, पक्षाचे नाव यावर कोणताही दावा न करता बाहेर पडलेले राज ठाकरे आजही चाचपडत आहेत. सुरुवातीला त्यांना चांगले यश मिळाले, पण नंतर त्याला ओहोटी लागली. उद्धव-राज यांच्यात जो कमालीचा संघर्ष होता, तो अलीकडील वर्षांमध्ये कमी झालेला होता. पण बीड आणि नंतर ठाण्यातील घटना बघता आता हा संघर्ष पुन्हा डोके वर काढणार असे दिसत आहे. विधानसभा निवडणूक ही लोकसभा निवडणुकीपेक्षा किंवा आजवरच्या कोणत्याही निवडणुकीपेक्षा कायदा, सुव्यवस्थेचे प्रश्न उभे करणारी असेल, अशी भीतीयुक्त शंका वाटत आहे. त्याला सामाजिक संदर्भ तर आहेतच, आता ठाकरे विरुद्ध ठाकरे असा कटुतेचाही पदर आहे.

गेल्या काही निवडणुकांमध्ये राज हे याच्या त्याच्या अजेंड्यावर चालले आणि त्यातून स्वत्व गमावून बसले, त्यामुळेच उद्धव यांच्यासह कोणत्याही बड्या नेत्याला वा पक्षाला ते मोठे आव्हान वाटत नव्हते,  पण यावेळी त्यांनी इतर कोणाच्या मांडवात जाण्यापेक्षा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. एरवी शिवतीर्थावर बसणारे राज महाराष्ट्राच्या मैदानात उतरले आहेत. आपल्या हक्काच्या मराठी मतांची विभागणी उद्धव यांना नकोच असणार आणि त्याचवेळी राज यांचा डोळा सर्वांत आधी याच मतांवर असणार. त्यामुळेच दोघांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. हा संघर्ष तीव्र होऊ शकतो. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना जन्माला घातली, शिवसेनेच्या पोटातून मनसेचा जन्म झाला. एका अर्थाने दोघांची जननी एकच; पण पुढे सख्खेच वैरी झाले. आता या वैरत्वाचे पडसाद रस्त्यांवर नव्याने उमटत आहेत. महाराष्ट्रात सहा मोठे पक्ष आपापले बळ आजमावत असताना, त्यात मनसे हा सातवा भिडू उतरत आहे. या भिडूचा त्रास अन्य सहा पक्षांपैकी उद्धवसेनेला अधिक होऊ शकतो.

राडेबाजीचा फायदा राजकीय प्रभाव वाढविण्यासाठी होतो यावर विश्वास असलेल्यांना या राडेबाजीमुळे आपले नुकसानही होऊ शकते, याची जाणीव असण्याची शक्यता कमीच. मोठ्या राजकीय पक्षांना दोन प्रादेशिक पक्ष, दोन भाऊ असे भांडत असल्यास हवेच असणार. दोन भावांनी एकमेकांचा हिशेबच करायचा ठरविला असेल तर कोण काय सांगणार? पुन्हा सांगणे एवढेच की, ठाकरे बंधूंनो! तुमच्यातील वादाला महाराष्ट्राचा संदर्भ आहे, याची जाण ठेवावी आणि या वादाने स्वत:चे नुकसान होणार नाही व महाराष्ट्राचे सौहार्द बिघडणार नाही, एवढेच भान ठेवलेले बरे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे