शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

यंदा 'कर्तव्य' आहे, पण...! उद्धव - राज यांच्या 'मनोमीलना'चे कांदे पोहे, मानपान, देणंघेणं अन् बरंच काही...

By अमेय गोगटे | Updated: June 19, 2025 21:58 IST

महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एक व्हावं ही त्यांच्या सैनिकांची इच्छा आहे. ती पूर्ण झाली तर राज्यातील राजकारणाला वेगळंच वळण मिळेल. उद्धव-राज यांच्या 'टाळी'बद्दल, मनोमीलनाबद्दल जेव्हा चर्चा होते, तेव्हा काही मुद्दे ठळकपणे जाणवतात.

>> अमेय गोगटे

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. अनेक वर्षांपासून या ना त्या कारणाने हे 'घरचं कार्य' पुढे-पुढे जात होतं. अखेर त्याला मुहूर्त मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. तसं तर, आपल्या राजकारणात इनकमिंग-आउटगोईंग रोजचंच झालंय, पण कुंपणावरची मंडळी 'हीच ती वेळ' म्हणत, सगळी गणितं मांडून, वाऱ्याची दिशा ओळखून 'फायदेशीर' गटात उड्या मारू लागली आहेत. काही जण जुन्या मित्रांना नव्याने साद घालत आहेत, तर काहींनी नव्या मित्रांचा शोध सुरू केलाय. अशातच, दोन भाऊ पुन्हा एकत्र येऊन आपला 'हुकमाचा' ठाकरे ब्रँड रिलाँच करण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. एकंदर कार्यकर्त्यांची तयारी पाहता, यंदा कर्तव्य आहे, असंच वातावरण दिसतंय. अहो, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांना एकाच बॅनरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्यात, यावरून दोन्हीकडचे 'सैनिक' या मन(से)मीलनासाठी किती अधीर आहेत, हे सहज लक्षात येईल. इतकंच कशाला, महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल, असं विधान खुद्द उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. अर्थात, राज यांनी या विषयावर काहीच न बोलता, अचानक देवा'भाऊं'ची भेट घेऊन आपल्या भूमिकेबाबत 'राज' कायम ठेवलाय. 

या पार्श्वभूमीवर, २००६ पासून सुरू असलेली 'भाऊबंदकी' आता २०२५ मध्ये 'भाऊबंधकी'त परिवर्तित होणार का, हे सांगता येत नाही. ही अशी शंका उपस्थित करून, शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. ती रिस्क कोण घेईल (सैनिक भडकले की काय करतात, हे वेगळं सांगायची गरज आहे?), हा भाग आहेच; पण गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडलंय ते पाहता, 'हे असं होईल' किंवा 'हे असं होऊच शकत नाही', हे ठामपणे सांगायचं धाडस कुणीच 'माई का लाल' करणार नाही. मात्र, उद्धव-राज यांच्या 'टाळी'बद्दल, मनोमीलनाबद्दल जेव्हा चर्चा होते, तेव्हा काही मुद्दे ठळकपणे जाणवतात, त्याचा थोड्या रूपकात्मक पद्धतीने विचार करूया. 

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची बातमी जेव्हा वाहिन्यांवर दाखवतात, तेव्हा एका लग्नसोहळ्यातील व्हिज्युअल्स दाखवली जातात. राज, उद्धव आणि रश्मी ठाकरे शेजारी शेजारी उभे आहेत आणि त्यांच्यात काहीतरी हास्यविनोद सुरू आहेत. राज ठाकरेंच्या भाच्याचं हे लग्न होतं. त्याआधी एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या लेकाच्या लग्नावेळी ठाकरे बंधूंच्या गप्पा रंगल्या होत्या. ती दृश्यं पाहून एक विचार मनात आला. दोन मनं जुळणं... जुळलेलीच राहणं... त्यांचं एक होणं आणि पुढे संसार, यात बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात. राजकारणातलं मनोमीलन तर याहून अवघड. वर्षानुवर्षांच्या आघाडीत बिघाडी झाल्याचं आणि युतीत ठिणगी पडल्याचं आपण पाहिलंय. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांनाही एकत्र येण्यासाठी एकेक पाऊल टाकत 'युती'ची गाठ बांधावी लागणार आहे. त्यात कुठल्या पायऱ्या सोप्या अन् कुठल्या निसरड्या आहेत, याचाही त्यांना विचार करावा लागेल.

   

१. ओळख आणि बोलणीउद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चुलत भाऊ. एकत्रच लहानाचे मोठे झालेत. सैनिकांचाही एकमेकांशी जुना परिचय आहे. पण, चांगली ओळख असणं आणि एकमेकांना चांगलेच ओळखून असणं, यात मोठा फरक आहे. किंबहुना, गेल्या वेळी तेच वेगळं व्हायचं कारण ठरलं होतं. आता झालं गेलं विसरून पुन्हा एकत्र यायचं तर संवाद व्हायला हवा, बोलणं व्हायला हवं. संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, दोघांकडेही एकमेकांचे फोन नंबर आहेत, त्यामुळे कदाचित त्यांचं बोलणं झालंही असेल. तसं असेल तर, एक महत्त्वाचं पाऊल दोन्ही नेत्यांनी टाकलंय. पण, ही बातमी येते न येते तोच, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाल्याचं समोर आलंय. दोघांनीही त्याबाबत काहीच भाष्य केलेलं नाही. तसंही, बंद खोलीत किंवा बंद दाराआड काय ठरतं, हे नंतरच कळतं, नाही का?   

२. कांदे पोहेकाही वर्षांपूर्वी जेव्हा शिवसेना (एकसंध) आणि भाजपाचं सगळं छान होतं, तेव्हा 'लोकमत'च्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, आम्ही 'मातोश्री'वर गेलो, रश्मी वहिनींच्या हातची साबुदाणा खिचडी खाल्ली आणि युतीचं निश्चित झालं. म्हणजे, लग्नाची बोलणी करताना जसे कांदे पोहे लागतात, तशी या चर्चेवेळीही काहीतरी मस्त डीश असेल तर मार्ग सुकर होऊ शकतो. तसंही म्हणतात ना, हृदयाचा मार्ग पोटातून जातो वगैरे. इथे तर राज ठाकरे म्हणजे पट्टीचे खवय्ये. खाणं आणि खिलवणं त्यांना प्रचंड आवडतं. तिकडे, रश्मी वहिनींच्या खिचडीने तर एकदा कमाल करून दाखवली आहेच. त्यामुळे आता ही 'ब्रन्च पे चर्चा' किंवा 'डीनर डिप्लोमसी' 'शिवतीर्थ'वर होते की 'मातोश्री'वर होते, हे पाहावं लागेल. 

३. मानपानइथून आता जरा कठीण पायऱ्या सुरू होतात. लग्नात एखादी आत्या किंवा दाजी रुसून बसतात. साडी किंवा सूटने त्यांची समजूत काढता येते. पण इथे 'सूट'ऐवजी 'सीट'चं गणित आहे ना! त्याही मर्यादित आहेत. बरं, खटका कशावरूनही उडू शकतो. जात, पात, धर्म, पंथ, भाषा असे बरेच फॅक्टर राजकारणात महत्त्वाचे आहेत. या सगळ्याच वर्गातील लोकांना जपणं, सांभाळणं आणि खूश करणं, हे साधं काम नाही. आत्तापर्यंत मनसेने सगळ्याच मोठ्या निवडणुका स्वबळावर लढवल्या आहेत. त्यामुळे हवे तेवढे उमेदवार ते रिंगणात उतरवू शकत होते. जेव्हा युतीचं जागावाटप होतं, तेव्हा बऱ्याच जागांसाठी घासाघीस करावी लागते. काही जागा सोडाव्या लागतात. काही नको असलेल्या घ्याव्या लागतात. आत्ता सत्ताधारी महायुतीमध्ये काय चाललंय, ते आपण बघतच आहोत. प्रत्येकालाच त्याचा पक्ष वाढवायचा आहे. अशावेळी ठाकरे बंधूंना मध्यममार्ग काढावा लागेल; तेही स्वतःचा मानसन्मान सांभाळून. 'टाळी'साठी मी हात पुढे केला होता, तेव्हा समोरून प्रतारणा झाली, अशी खदखद राज ठाकरे यांनी मागे एका मुलाखतीत बोलून दाखवली होती. त्यांची काही विधानं उद्धव ठाकरेंना बोचणारीही होती. त्यामुळे हे सगळे अपमान विसरून सगळ्यांचं मानपान बघणं, हे नक्कीच आव्हानात्मक आहे. 

४. देणंघेणं अन् तडजोडआज दोन्हीकडचे कार्यकर्ते 'ठाकरे ब्रँड'साठी आग्रही आहेत. पण, हे मनोमीलन झालं तर महापालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये सर्वाधिक तडजोड त्यांनाच करावी लागू शकते. एखादी हक्काची जागा सोडणं, कठीण जागा मिळाली तर तिथे लढणं, ही अस्तित्वाची लढाईही ठरू शकते. समोर जे आहेत, तेही कधी काळी आपलेच मित्र होते. कदाचित अजूनही असू शकतात. या 'महाभारता'मुळे नात्यात कटुता येऊ शकते. या सगळ्या 'ॲडजस्टमेंट'साठी मनाची तयारी त्यांना करावी लागेल. 

आणखी एक मोठी तडजोड खास करून राज आणि त्यांच्या शिलेदारांना कदाचित करावी लागू शकते. ती म्हणजे, मविआमधील घटक पक्षांशी जमवून घेणं - जुळवून घेणं. अर्थात, याबाबत आधी उद्धव यांना सर्व बाजूंनी विचार करावा लागेल. राज ठाकरेंना सोबत घ्यायचं असेल तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांच्यासोबत राहायचं की मविआतून बाहेर पडायचं, हे त्यांना ठरवावं लागेल. ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर काँग्रेसला ते रुचेल का, पचेल का, हाही प्रश्न आहेच. त्यामुळे हा गुंता सोडवणं, यावरच नवी गाठ बांधणं ठरणार आहे. 

५. 'बिग बॉस' कोण?या प्रश्नाचं उत्तर एकदा का सापडलं की ठाकरे बंधूंना एकत्र येण्यापासून आणि एकत्र राहण्यापासून कुणीच थांबवू शकणार नाही. पण, हे उत्तर सोपं नाही. दोन वेगळे पक्ष आहेत, उद्धव आणि राज त्यांच्या त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत, पण जेव्हा दोन पक्ष एकत्र येतील तेव्हा त्या युतीचं नेतृत्व कोण करणार, 'फायनल कॉल' कुणाचा असणार, हे ठरवणं लाँग टर्म पार्टनरशिपसाठी आवश्यक आहे. शरद पवार हे वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असल्याने ते मविआचे नेतृत्व करत होते - आहेत. महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस प्रमुख नेते आहेत आणि भाजपाच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा आदेश एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही मानतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सर्वेसर्वा असताना त्यांच्या हाताखाली उद्धव आणि राज दोघंही त्यांना नेमून दिलेलं काम करत होते. पण पुढे बाळासाहेबांचं वय आणि प्रकृतीच्या कारणास्तव उद्धव कार्याध्यक्ष झाले आणि 'बडव्यां'मुळे राज नाराज व्हायला सुरुवात झाली. आता हे बडवे कोण होते, ते आता कुठे आहेत, सध्या कुठल्या भूमिकेत आहेत, किती प्रभावी आहेत, हे सगळं विचारात घ्यावं लागेल. भूतकाळातल्या सगळ्या चुका दुरुस्त करूनच ठाकरे बंधूंना पुढे जावं लागेल आणि 'बिग बॉस' कोण हे एकमताने ठरवावं लागेल.  

माझ्या डिक्शनरीमध्ये 'इम्पॉसिबल' हा शब्द नाही, असं काही जण म्हणतात. 'डिक्शनरी'चं माहीत नाही, पण राजकारणात 'इम्पॉसिबल' असं काहीच राहिलेलं नाही. अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही नाही नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी ठासून सांगितलं होतं. पण, त्यांनी अजित पवारांसोबत दोन वेळा सरकार स्थापन केलं. ज्या शिवसेनेने कायम काँग्रेसला विरोध केला, त्या सेनेचे नेते उद्धव ठाकरे चक्क काँग्रेसचा पाठिंबा घेऊन मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. या घटना पाहता, वरील पाचही मुद्द्यांवर भक्कम तोडगा शोधून 'दादू' (उद्धव) आणि 'राजा' (राज) पुन्हा एकत्र येऊच शकतात. शेवटी त्यांचं रक्ताचं नातं आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एक व्हावं ही त्यांच्या सैनिकांची इच्छा आहे. ती पूर्ण झाली तर राज्यातील राजकारणाला वेगळंच वळण मिळेल. नवी समीकरणं पाहायला मिळतील. नाहीतरी ते म्हणणातच ना, "शादी का लड्डू जो खाए पछताए, जो न खाए वो भी पछताए" त्यामुळे तो खायचा की नाही, हे ज्याचं त्याने ठरवावं. आम्ही फक्त त्या वाटेतील काटे दाखवून दिलेत. नांदा सौख्यभरे, या सदिच्छा असतीलच!

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस