शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

महाराष्ट्र निवडणूक 2019: राजकीय कोलांटउड्यांचा मतदारांना उबग

By किरण अग्रवाल | Updated: October 22, 2019 22:17 IST

मतदारांना सर्वच राजकीय पक्षांकडून गृहीत धरले जात असले, तरी मतदार आता सुज्ञ झाला आहे व तो राजकारणात वाढीस लागलेल्या अनिष्ट तडजोडी तसेच प्रकारांबद्दल चीड व्यक्त करताना दिसत आहे

- किरण अग्रवाल

मतदारांना सर्वच राजकीय पक्षांकडून गृहीत धरले जात असले, तरी मतदार आता सुज्ञ झाला आहे व तो राजकारणात वाढीस लागलेल्या अनिष्ट तडजोडी तसेच प्रकारांबद्दल चीड व्यक्त करताना दिसत असून, त्यातूनच त्याच्या मनात निवडणुकीबाबत नकारात्मकता वाढीस लागली आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांत मतदानाचा टक्का घटला असल्याचे म्हणता यावे.

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी जे मतदान झाले त्यात जागोजागी मतदानाचे प्रमाण घसरल्याचे लक्षात आले आहे. विशेष म्हणजे शासनाकडून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात असताना असे घडून आले आहे. निवडणूक ही कोणतीही असो, त्याकडे लोकशाहीचा उत्सव म्हणून बघितले जाते. या उत्सवात सर्वच मतदारांनी सहभागी होण्याची अपेक्षा केली जात असते. बऱ्याचदा मतदार व्यवस्थेला दोष देताना दिसतात. परंतु ही व्यवस्था सुधारण्यासाठी मतदानाच्या माध्यमातून मिळालेल्या अधिकाराचा वापर करताना दिसत नाही. त्यामुळे शासनाबरोबरच सामाजिक संस्थाही निवडणुकांच्या तोंडावर मतदान जागृतीच्या मोहिमा राबवताना दिसतात. यंदा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच ठिकाणी अशी जाणीव जागृती मोठ्या प्रमाणात केली गेली होती. ठिकठिकाणच्या जिल्हा प्रशासनाने मतदार याद्यांची शुद्धीकरण मोहीम राबविताना दुबार नोंदणीकृत व मयत मतदारांची नावे वगळल्याने मतदार संख्येची जाणवणारी सूज कमी झाली होती. याखेरीज नवमतदारांच्या नोंदणीला संपूर्ण राज्यातच मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. एकट्या नाशिक जिल्ह्याची आकडेवारी द्यायची तर सुमारे २४ हजार तरुणांना या निवडणुकीत पहिल्यांदा आपला मताधिकार बजवायची संधी मिळाली होती. महिला मतदारांचीही संख्या पुरुषांच्या जवळपास बरोबरीने होती. तरुण व महिला आता स्वयंप्रज्ञेने विचार करू लागल्याने ते मतदानासाठी हिरिरीने बाहेर पडल्याचे दिसूनही येत होते. तरी टक्का घसरलेला दिसून आला.

विशेष म्हणजे, मतदानाबद्दल अधिकचे स्वारस्य जागविण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या. दिव्यांग मतदारांसाठी ने-आणची व्यवस्था करतानाच मतदान केंद्रांवर व्हीलचेअर व मदतनिसांची खास व्यवस्था करण्यात आली होती. लेकुरवाळ्या मातांसाठी काही मतदान केंद्रांवर पाळण्याची व्यवस्थादेखील ठेवण्यात आली होती. पाण्यापासून ते प्रथमोपचारापर्यंत काळजी घेतानाच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एकेक सखी मतदान केंद्र साकारून तेथील सूत्रे संपूर्णत: महिला कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात आली होती. गुलाबी फुग्यांनी व आकर्षक रांगोळ्यांनी अशी केंद्रे सजविली गेली होती. सदर शासकीय प्रयत्नांखेरीज काही व्यावसायिक आस्थापनांनीही मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आपल्याकडील चीजवस्तूंच्या विक्रीसाठी सवलतींच्या व बक्षिसांच्या योजना घोषित केल्या होत्या. काही ग्रामपंचायतींनी फुलांच्या माळा व तोरण वगैरे बांधून तसेच आलेल्या प्रत्येक मतदारास गुलाबपुष्प देऊन स्वागत केलेलेही दिसून आले. हे सारे कशासाठी केले गेले, तर मतदानाचे प्रमाण वाढून लोकशाही व्यवस्था अधिक सुदृढ व्हावी व ती वर्धिष्णू ठरावी म्हणून. पण तरीदेखील अपवाद वगळता अनेक ठिकाणी गेल्या २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा कमी मतदान झालेले दिसून आले.

का झाले असावे असे? याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, राजकारणात तत्त्व व निष्ठांना तिलांजली देत निडरपणे ज्या तडजोडी केल्या जाताना दिसून येत आहेत त्यामुळे असे झाले असण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात बोलून दाखविली जात आहे. यंदा तर घाऊक पद्धतीने पक्षांतरे झाल्याने मतदारांच्या मनात त्याबद्दलची एक नकारात्मकता निर्माण झाली. सत्तेची संधी घेतानाच सत्तेच्या वळचणीला जाऊन आपल्या अयोग्य व्यवहाराला संरक्षण मिळवू पाहण्याचा यामागील हेतू न जाणण्याइतपत मतदार आता अशिक्षित राहिले नाहीत. शिवाय जाहीर प्रचार संपल्यानंतर मतदानाच्या आदल्या रात्री होणारे लक्ष्मीदर्शनाचे कथित प्रकारही सुज्ञांना अस्वस्थ करणारे ठरले आहेत. या एकूणच वाढत्या प्रकारात आपल्या मताचा उपयोगच न राहिल्याची भावना बळावल्यानेच की काय, मतदानाकडे पाठ फिरवली गेली असावी. त्यातूनच मतदानाचा टक्का घसरला. बरे, हे काही दोन-चार मतदारसंघांत झाले असे नाही. नाशिक जिल्ह्याचे उदाहरण द्यायचे तर १५ पैकी तब्बल १२ मतदारसंघांत हा टक्का घसरला आहे. छगन भुजबळ पुत्र पंकज उमेदवारी करीत असलेल्या नांदगाव मतदारसंघात तब्बल ७ टक्क्यांपेक्षा अधिकने मतदान घसरले आहे. तर सिन्नरमध्ये ५ टक्क्यांपेक्षा अधिकने ग्राफ खाली आला आहे. जिल्ह्यात ज्या तीन मतदारसंघांत मतदान वाढले त्यात निफाडची वाढ ही २ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. अन्य कळवण व देवळा या दोन्ही मतदारसंघांतील मतदानाची वाढ ही एक टक्क्याच्या आतच म्हणजे अंशत: म्हणावी अशी आहे. एकूणच बहुसंख्य मतदारसंघांत घटलेले मतदानाचे प्रमाण पाहता त्याचा निकालावर काय परिणाम होईल व कुणाची जय-पराजयाची गणिते कशी सुटतील हा भाग वेगळा, परंतु मतदारांचा जो निरुत्साह यानिमित्ताने समोर येऊन गेला आहे आणि त्यामागील जी कारणे गृहीत धरता येणारी आहेत ती चिंता बाळगून चिंतन करावयास भाग पाडणारीच आहे हे नक्की.   

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग