शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election Result 2024: महायुतीचा ऐतिहासिक विजय, मात्र पुन्हा तोच प्रश्न - शरद पवार यांचे युग संपले का?

By shrimant mane | Updated: November 24, 2024 08:19 IST

महाविकास आघाडीची मोट शरद पवारांनीच बांधली. मतदारांनी ताे प्रयोग नाकारला असेल तर पवारांची जबाबदारी आहेच! यापुढे पुरोगामी महाराष्ट्रात पूर्णपणे काँग्रेसी, धर्मनिरपेक्ष, लेफ्ट-सेंटर राजकारणाचे भवितव्य काय असेल?

श्रीमंत माने संपादक, लोकमत, नागपूर

विधानसभा निवडणुकीतील महायुतीचा ऐतिहासिक, अद्वितीय विजय किंवा भगव्या त्सुनामीत उद्ध्वस्त झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग या दोहोंचे तपशील थोडे बाजूला ठेवू. त्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे तो या निवडणूक निकालाने शरद पवारांचे युग खरेच संपले का? मागच्या निवडणुकीवेळी लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार असलेले तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलण्याच्या ओघात पवारांचे युग संपल्याचे विधान केले होते. पवारांनी त्याला उत्तर दिले ते पावसातल्या सभेने व प्रचाराच्या झंझावाताने आणि निवडणूक निकालानंतरच्या महाविकास आघाडी नावाच्या प्रयोगाने. 

शनिवारी विधानसभा निकालात महायुतीच्या ऐतिहासिक विजयाचा वारू चाैखूर उधळू लागल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली - एरव्ही जनमताचा काैल अनुकूल असो की प्रतिकूल, त्यावर संयमाने व्यक्त होणाऱ्या शरद पवारांची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. पवारांचे हे माैनच निकालाचा धक्का किती मोठा आहे, याचे निदर्शक ठरावे. उण्यापुऱ्या सहा दशकांत आपल्या विरोधकांना अनेकवेळा कात्रजचा घाट दाखवणाऱ्या शरद पवारांनी बरोबर पाच वर्षांपूर्वी, २३ नोव्हेंबरलाच महाविकास आघाडीचा राजकीय प्रयोग साकारला होता. मुख्यमंत्रिपदाचे आमिष दाखवून त्यांनी उद्धव ठाकरे यांना भाजपपासून फोडले. वैचारिकदृष्ट्या दुसरे टाेक असणाऱ्या दोन्ही काँग्रेससोबत त्यांची मोट बांधली. त्या प्रयोगाच्या नमनालाच अजित पवारांनी बंड केले, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी उरकून घेतला. तेव्हा शरद पवार कमालीचे सक्रिय झाले. दुपारपर्यंत अजित पवारांच्या तंबूतील बहुतेक आमदार परत आणले. तीन दिवसात अजित पवारांनाही परतावे लागले. काही झालेच नसल्याचे दाखवत आघाडीने अडीच वर्षे कारभार केला. त्याचा शेवट शिवसेनेच्या फुटीने झाला.

मुरब्बी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यादेखत जवळपास सगळे आमदार घेऊन सुरतकडे निघाले. तेव्हा, पवारांची प्रतिक्रिया उद्धव यांच्याबद्दल फार चिंता दाखवणारी नव्हती. जणू काही त्यांना हे अपेक्षितच होते. उद्धव ठाकरे पायउतार झाले तेव्हाही ‘राजीनामा देण्याआधी मला विचारायला हवे होते’, अशीच कोरडी प्रतिक्रिया पवारांनी दिली. वर्षभरानंतर तशीच वेळ खुद्द पवारांवर आली. पुतणे अजित पवार हेदखील शिंदे यांच्याप्रमाणेच डोळ्यादेखत झपकन पक्ष फोडून निघून गेले. तेव्हा ‘आपण अशा बंडाळीला घाबरत नाही. पक्ष पुन्हा उभा करू, आमदार निवडून आणू. चाळीस वर्षांपूर्वी असेच आमदार गेले होते, तेव्हा तितकेच आमदार पुन्हा निवडून आणले’, असा दुर्दम्य आशावाद शरद पवार व्यक्त करत राहिले. लोकसभेवेळी त्यांनी चमत्कार घडवला. दहा जागा लढवून आठ जिंकल्या. काँग्रेसलाही मोठे यश मिळाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उभ्या राहिलेल्या आंदोलनाचा भाजप व महायुतीला फटका बसला, आघाडीचा फायदा झाला. 

मनोज जरांगे यांच्या पाठीशी शरद पवारच आहेत, असे बोलले गेले. प्रत्यक्ष पवारांनी थेट कोणतीही भूमिका घेतली नाही. परिणामी, सामाजिक आंदोलनामागे राजकीय डावपेच असल्याचा मुद्दा लोकांपर्यंत नेण्याची संधी भाजपला मिळाली. राज्यातील सत्तेवरून पायउतार झाल्यामुळे हतोत्साही झालेल्या महाविकास आघाडी नावाच्या प्रयोगात लोकसभा निवडणुकीतील विजयाने पुन्हा प्राण फुंकला गेला. ‘आता विधानसभेवर आपलाच झेंडा’ असाच आघाडीच्या नेत्यांचा एकूण अविर्भाव होता. आघाडीचा रथ जमिनीपासून चार बोटे अंतरावर दाैडत होता. मग हरयाणाचा धक्का बसला. अर्थात, रथ जमिनीवर आला तरी नेते हवेतच होते. जागा वाटपावेळी ते एकमेकांनाच बेंडकुळ्या दाखवत राहिले. संजय राऊत विरुद्ध नाना पटोले असा एक मनाेरंजक सामना थेट माध्यमांपुढेच रंगला. आघाडी तुटू शकेल, इतकी ताणली गेली. मग पवारांच्याच सल्ल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी बाळासाहेब थोरात यांना चर्चेेचे अधिकार देण्याचा पर्याय पुढे आणला. जागा वाटपाचे गाडे पुढे सरकले खरे. पण, कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नव्हता. जागा वाटप अधिकृतपणे जाहीर होण्याआधीच एकेका पक्षाने आपापले उमेदवार जाहीर केले. त्यात खुद्द पवारांचा पक्षही मागे नव्हता. त्यानंतर स्वत:  पवार तसेच उद्धव ठाकरे राज्यभर प्रचारसभा घेत राहिले.

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील मुद्दे पुन्हा विधानसभेच्या वेष्टनात पुढे आणले. या सगळ्यांना प्रतिसादही चांगला मिळाला. तथापि, ऐतिहासिक पराभवाची नामुष्की आघाडीच्या वाट्याला आली. महाविकास आघाडीचा विचार करताना शरद पवार यांच्याबाबत इतका खल करण्याचे कारण हे की, या सगळ्याचे कर्तेधर्ते तेच आहेत. त्या मेढीभोवतीच राजकारणाच्या नव्या खळ्यात सारी मळणी होत आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांच्यासाठी पवारच पितृतुल्य मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिले. काँग्रेसच्या दिल्लीश्वरांनी सगळे निर्णय पवारांवर सोपविले. एकूणच महाविकास आघाडीच्या सगळ्या व्यूहरचनेला पवारांच्या अनुभवाचा आधार होता. आघाडीतील रुसवे-फुगवे, वादविवाद या सगळ्यात त्यांचाच शब्द अंतिम मानला जायचा.

एक्झिट पोलमध्ये भाजपला जास्त जागा मिळतील, असा अंदाज आल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे पवारांकडे जातील, असे मानणारेदेखील अनेक होते. त्याचमुळे महाविकास आघाडीचा प्रयोग व शरद पवार हा अविभाज्य मामला ठरतो.  महाराष्ट्रातील मतदारांनी ताे प्रयोग नाकारला असेल तर त्याचा पाया असलेली महाराष्ट्राची अस्मिता, शिव-फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा, दिल्लीच्या तख्तापुढे न झुकण्याची परंपरा किंवा राज्यातील शेतकरी-कष्टकरी, तरुण-महिलांच्या प्रश्नाभोवती गुंफलेल्या प्रचाराचे भवितव्य काय आहे? काँग्रेसच्या प्रचाराची दिशा जातगणना, राज्यघटनेचे संरक्षण, विद्वेषाला प्रेमाचे उत्तर अशी होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ग्रामीण महाराष्ट्रावर प्रभाव असल्याचे मानले जाते. त्यासोबत मुंबई-कोकणातील मतदारांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याप्रती सहानुभूती यांची सांगड घालण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला.  

शेती व संलग्न अर्थकारणाच्या पवारांच्या अभ्यासावर आघाडीची मदार होती. ऐन निवडणुकीत सोयाबीनच्या बाजारभावाचा मुद्दा पुढे आला. तरीदेखील शेतकरी आघाडीच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. या पृष्ठभूमीवर, या पराभवाची कारणमीमांसा होईल. शनिवारच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष निर्विवादपणे केंद्रस्थानी येणे हा गेल्या किमान तीस वर्षांमधील गैरकाँग्रेसी राजकारणाचा परमोच्च बिंदू आहे. देशात ज्या ज्या राज्यांमध्ये भाजप असा शीर्षस्थानी गेला, तिथून तो कधी हटला नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळी पूर्णपणे काँग्रेसी, धर्मनिरपेक्ष, लेफ्ट-सेंटर राजकारणाचे महाराष्ट्रातील भवितव्य काय, हा प्रश्न यापुढच्या काळात सतत चर्चेत असेल.shrimant.mane@lokmat.com

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Sharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीUddhav Thackerayउद्धव ठाकरे