शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशचा महाघोटाळा

By admin | Updated: June 27, 2014 10:35 IST

कपाळावर गंधाचा मोठा टिळा लावल्याने जसा कोणी धार्मिक होत नाही, तसा संघात गेल्याने कोणी देशभक्त वा नीतिमानही होत नाही.

कपाळावर गंधाचा मोठा टिळा लावल्याने जसा कोणी धार्मिक होत नाही, तसा संघात गेल्याने कोणी देशभक्त वा नीतिमानही होत नाही. लक्ष्मीकांत वर्मा हा ५२ वर्षांचा माजी पुरोहित कपाळावर मोठे गंध लावतो आणि तो संघाचा अतिशय सार्मथ्यवान स्वयंसेवक व वरिष्ठ कार्यकर्ताही आहे. मध्य प्रदेश सरकारचा शिक्षणमंत्री असलेला हा लक्ष्मीकांत त्याच्या ३00 साथीदारांसह सध्या जेलमध्ये आहे. राज्यात होणार्‍या व्यावसायिक स्पर्धांच्या परीक्षांत घोटाळे करून कोट्यवधी रुपयांची माया जमविल्याचा आरोप त्याच्यावर आहे आणि त्याला व त्याच्या साथीदारांना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर तुरुंगात डांबण्यात आले आहे. या लक्ष्मीकांतचा स्वीय सहायक असलेला सुधीर शर्मा या नावाचा आणखी एक इसम संघाने चालविलेल्या एका शाळेत साधा शिक्षक होता. आपल्या खाण मंत्रिपदाच्या कार्यकाळात लक्ष्मीकांतने त्याला आपला सहायक बनविले. या सुधीरजवळ आता स्वत:ची हेलिकॉप्टरे आहेत. संघ व भाजपामधील लक्ष्मीकांतचा भाव एवढा, की तो मागेल ते मंत्रिपद त्याला गेल्या दहा वर्षांत मिळाले आणि एकेकाळी तर तो सध्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांचा प्रतिस्पर्धीही मानला गेला. भाजपामधील नेतृत्वाच्या स्पर्धेत शिवराजसिंगांनी नरेंद्र मोदींऐवजी लालकृष्ण अडवाणी व सुषमा स्वराज यांची बाजू घेतली, त्यामुळे मोदींची त्यांच्यावर नाराजी आहे. या नाराजीचा फायदा घेण्याच्या प्रयत्नातही हा लक्ष्मीकांत मागे नव्हता. पंकज त्रिवेदी या नावाचे आणखीही एक पात्र भ्रष्टाचाराच्या या यादीत आहे. राज्यातील व्यावसायिक स्पर्धा परीक्षांचा तो संचालक आहे. तो नियमितपणे लक्ष्मीकांतला त्याच्या बंगल्यावर भेटायचा आणि त्याच्याकडून ‘पास करावयाच्या’ विद्यार्थ्यांच्या नावाच्या याद्या आपल्या कार्यालयात न्यायचा. ते विद्यार्थी नंतर रीतसर उत्तीर्णही व्हायचे. या विद्यार्थ्यांच्या नावाच्या याद्याच आता लक्ष्मीकांतच्या  संगणकावर पोलिसांना सापडल्या आहेत. मध्य प्रदेशातील परीक्षा घोटाळा जुना आहे आणि त्याविषयीच्या चौकशीच्या मागण्याही तेवढय़ाच जुन्या आहेत. मात्र, शिवराज सिंगांचे सरकार त्या चौकशा पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात राहिले आहे. डिसेंबर २0१३ मध्ये या प्रकरणाची नोंद पोलीस खात्यात प्रथम झाली व त्याच्या चौकशीला सुरुवात झाली. हे प्रकरण सार्‍या राज्यात पसरले असल्याचा व ते बरेच खोलवर गेले असल्याचा संशय पक्का झाला, तेव्हा न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली व पुढे उच्च न्यायालयानेच त्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. राज्य सरकारने घ्यावयाच्या स्पर्धा परीक्षांत एका कॅबिनेट मंत्र्यासह ३00 लोकांना अटक होण्याचे देशाच्या इतिहासातील हे पहिले प्रकरण आहे आणि ते घडवून आणण्यात मध्य प्रदेशमधील शिवराजसिंगांचे भाजपा सरकार व त्यातील लक्ष्मीकांत वर्मा यासारखे दिवटे मंत्री सामील आहेत. कर्नाटकात येदियुरप्पांचे सरकार असताना, रेड्डी बंधूंनी खाणींचा मोठा घोटाळा केला. हा भ्रष्टाचार काही हजार कोटींचा होता. या पैशावर ताबा मिळवणारे रेड्डी बंधू येदियुरप्पांच्या सरकारात मंत्री होते आणि त्यांचा तोरा एवढा की ‘या पुढच्या काळात सुषमा स्वराज यांना आम्ही देशाचे पंतप्रधान बनवू’ अशी भाषा ते उघडपणे बोलायचे. सुषमा स्वराज यांनी बेल्लारी लोकसभा क्षेत्रातून सोनिया गांधींविरुद्ध निवडणूक लढविली होती व त्यात त्या पडल्या होत्या. त्या काळात त्याच क्षेत्रात असलेल्या या खाणींमधून रेड्डींनी त्यांची अमाप संपत्ती उभी केली व ती सुषमा स्वराज यांच्या मागे लावण्याचा आपला इरादाही उघड केला. हे प्रकरण एवढे गाजले, की स्वत: स्वराज यांनीच या रेड्डी बंधूंशी आपला संबंध नसल्याचा खुलासा केला. तेवढय़ावर न थांबता परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत रेड्डींना पक्षाची तिकिटे मिळू नयेत, यासाठी त्यांनी आपल्या परीने जमेल तेवढी धडपडही केली. कर्नाटकातील खाण घोटाळ्यानंतरचा भाजपाचा महाघोटाळा असे लक्ष्मीकांत वर्मा याचे हे मध्य प्रदेशातील परीक्षाकांड आहे. ज्याच्याकडून पैसे घेतले, त्याला पास करून देण्यासाठी या वर्माने आपले खाते कसे वापरले याच्या कथा उच्च न्यायालयानेच आता नोंदविल्या आहेत. नव्या परीक्षार्थ्याच्या बाजूला त्याला मदत करायला जुने व यशस्वी विद्यार्थी बसविण्यापर्यंत आणि त्यांच्याकडून हव्या तशा उत्तरपत्रिका लिहून घेण्यापर्यंत या वर्माची व त्याच्या खात्याची मजल गेली होती. शिक्षण हे राष्ट्राची पायाभरणी करणारे क्षेत्र आहे. वर्मा, शर्मा किंवा त्रिवेदी यांच्यासारखी संघाच्या तालमीत तयार झालेली माणसे या पायातच असे पाणी घालत असतील, तर हे राष्ट्र कसे उभे होईल?