निष्ठावंत जनसेवक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:16 AM2020-06-17T00:16:09+5:302020-06-17T12:12:30+5:30

मिलिंद कुलकर्णी दोनदा आमदार, दोनदा खासदार, प्रतिष्ठित साखर कारखान्याचे चेअरमन, राज्यमंत्र्याचा दर्जा असलेले पद असा लौकिकार्थाने मानमरातब मिळूनही काळ्या ...

Loyal public servants! | निष्ठावंत जनसेवक !

निष्ठावंत जनसेवक !

Next

मिलिंद कुलकर्णी
दोनदा आमदार, दोनदा खासदार, प्रतिष्ठित साखर कारखान्याचे चेअरमन, राज्यमंत्र्याचा दर्जा असलेले पद असा लौकिकार्थाने मानमरातब मिळूनही काळ्या मातीशी आणि सर्वसामान्य जनतेशी बांधिलकी, स्वपक्षाशी निष्ठा जपणारा कार्यकर्ता, नेता अशी ओळख हरिभाऊ जावळे यांनी कार्यकर्तृत्वाने निर्माण केली होती. राजकारणाविषयी सर्वसामान्यांमध्ये प्रचंड चीड असतानाही हरिभाऊंसारख्या मोजक्या नेत्यांकडे भांगेतील तुळस म्हणून बघीतले जाते. त्या हरिभाऊंचे अचानक जाणे म्हणूनच प्रत्येकाला हुरहूर लावणारे ठरले.
उंच, धिप्पाड देहयष्टी, हसतमुख व्यक्तिमत्व, संवादात माधुर्य असलेले हरिभाऊ संपर्कातील प्रत्येक व्यक्तीला आपलेसे करत, ते त्यांच्या स्वभाव वैशिष्टयामुळे. जवळच्या कार्यकर्त्याला अरे तुरे करताना आपसूक खांद्यावर, पाठीवर हात जायचा. वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींशी दांडगा संपर्क असताना त्यांना आदरपूर्वक संबोधन केले जायचे. त्यामुळे हरिभाऊंचा गोतावळा मोठा होता. राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याने विनम्रपणा, शिस्त हे गुण अंगी होते. त्यांच्या यशामागे ही कारणे आहेत.
हरिभाऊंना प्रत्येक यश हे खडतर परिश्रमाने मिळाले. यावल विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीचा अपवाद वगळता तेथे विरोधी पक्षाचा आमदार निवडून येणे कठीण होते. १९९९ मध्ये भाजपचे पहिले आमदार होण्याचा मान हरिभाऊ जावळे यांना मिळाला. अरुण महाजन यांचे दोनदा प्रयत्न असफल झाल्यानंतर हरिभाऊंच्या रुपाने आमदारकी भाजपला मिळाली. शेजारील रावेर मतदारसंघात डॉ.गुणवंतराव सरोदे यांच्यारुपाने १९८५ मध्येच भाजपचा जिल्ह्यातील पहिला आमदार निवडून आला होता. केळीचा पट्टा म्हटल्या जाणाऱ्या यावल-रावेर तालुक्यात डॉ.गुणवंतराव सरोदे आणि हरिभाऊ जावळे यांनी भाजपचे रोपटे रुजवले आणि वाढवले. मधुकरराव चौधरी, जे.टी.महाजन, रमेश विठ्ठल चौधरी यांचे वर्चस्व असलेल्या या भागात भाजपने यशाची चव चाखली ती कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे आणि सरोदे-जावळे यांच्यासारख्या लोकाभिमुख नेतृत्वामुळे. फैजपूरचा मधुकर सहकारी साखर कारखाना हा या दोन्ही तालुक्यांचा श्वास. पक्षीय जोडे काढून सहकार क्षेत्रात सगळे नेते एकत्र येण्याची परंपरा. डॉ.गुणवंतराव सरोदे, साकळीचे डॉ.गोकूळ नेवे यांनी कारखान्यात संचालक म्हणून काम केले होते. त्या कारखान्याचे चेअरमनपद हरिभाऊ जावळे यांच्याकडे पाच वर्षे राहिले.
पहिले खासदार डॉ.गुणवंतराव सरोदे यांच्या नंतर नशिराबादचे वाय.जी.महाजन हे खासदार झाले. त्यांच्यावर बालंट आल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत हरिभाऊ जावळे यांनी ही जागा भाजपकडे कायम राखली. जिल्ह्यातील दुसरी जागा भाजपने गमावली, पण ही जागा राखली. पुढे दुसऱ्यांदा पुन्हा हरिभाऊ खासदार झाले.
हरिभाऊंवर अन्याय, पक्षपात अनेकदा झाला, पण मूकपणे सोसला. दोनदा खासदार झाल्यानंतर त्यांचे तिकीट कापण्यात आले. पुन्हा आमदारकीची निवडणूक लढवत असताना ‘फौजदार झाला कॉन्सेटबल’ अशी अवहेलना त्यांनी पचवली. भाजपची राज्यात सत्ता आल्यानंतर अनुभवी हरिभाऊंच्या ज्ञानाचा फायदा करुन घेतला जाईल असे वाटले होते. पण शेवटच्या तीन महिन्यासाठी त्यांना कृषी परिषदेचे उपाध्यक्षपद देण्यात आले. दोन तुल्यबळ नेत्यांमधील वादात हरिभाऊ जावळे यांच्यासारखा सज्जन नेत्याची घुसमट होत होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही उघडपणे त्यांच्या प्रतिस्पर्र्धींना पक्षांतर्गत बळ दिले गेले आणि हरिभाऊंना पराभव स्विकारावा लागला. राज्यात भाजपची सत्ता जाताच अनेक नेत्यांनी स्वत:च्या पराभवाचे खापर पक्षश्रेष्ठी, नेते यांच्यावर फोडले असताना हरिभाऊ जावळे यांनी कधीही जाहीर वा खाजगीत नाराजीचा सूर आवळला नाही. शिस्तबध्द असलेल्या भाजपच्या व्यासपीठांवर अलिकडे नेत्यांनाच मारहाण होऊ लागल्याचे प्रसंग वरचेवर घडत असताना पक्षाला एकसंघ ठेवण्यासाठी जिल्हाध्यक्षपदासाठी हरिभाऊंना गळ घालण्यात आली. शिस्तबध्द कार्यकर्ता म्हणून विनम्रपणे त्यांनी ती स्विकारली. मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवला. राजकारणात अशी माणसे विरळा म्हणावी लागतील. त्यांच्या निधनाने राजकारणातील एक सत्शील नेतृत्व हरपले आहे.

Web Title: Loyal public servants!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.