दिल्ली निवडणूक प्रचारातील हीन पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 03:45 AM2020-02-07T03:45:51+5:302020-02-07T03:46:32+5:30

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे स्वरूप उपरोधिक प्रचाराने आणि द्वेष भावनेने बरबटलेले झाले आहे.

Low level of Delhi election campaign | दिल्ली निवडणूक प्रचारातील हीन पातळी

दिल्ली निवडणूक प्रचारातील हीन पातळी

googlenewsNext

- डॉ. एस. एस. मंठा

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे स्वरूप उपरोधिक प्रचाराने आणि द्वेष भावनेने बरबटलेले झाले आहे. प्रचाराच्या भाषणात नम्रतेचा अभाव जाणवतो. अनेकदा ही भाषणे हीन पातळीची आणि भडकावू स्वरूपाची होतात. भावी निवडणुका याच पद्धतीने होणार आहेत का? भारतातील राजकारणी माणसे भविष्यात याच तºहेने वागणार आहेत का? आपल्या देशात कोणतीच बांधिलकी नसलेले मतदार केवळ आपल्यालाच मतदान करतील या हेतूने विरोधकांचा जास्तीत जास्त अपमान करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. आपल्या देशाची आर्थिक स्थिती का ढासळली आहे किंवा रोजगाराची क्षमता का कमी होत आहे, याविषयी कुणीच बोलत नाही. मतदारांना प्रभावित करण्यासाठी आपण संताप, चिंता, भय, राष्ट्रभक्ती याच भावनांचा वापर करणार आहोत का?

सरकारने असे अनेक निर्णय घेतले जे धक्कादायक होते. काही निर्णयांना लोक अनपेक्षितपणे सामोरे गेले आणि त्यामुळे त्या निर्णयांविषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. आपल्या विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या मनात संतापाची भावना निर्माण करून त्यांना प्रत्युत्तर देण्यास भाग पाडले जात आहे. मग ते जेएनयू, एएमयू किंवा जादवपूर विद्यापीठ असो, सर्वत्र विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू आहेत. त्याच्या प्रत्युत्तरात विरोधी विचारांचे विद्यार्थी उतरले आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांचा हा असंतोष पेटता राहावा असा प्रयत्न राजकारण्यांकडून केला जातो. त्यातून काय घडणार आहे, याचा अंदाज बांधता येत नाही. प्रश्न असा उभा होतो की, कुणाची विचारसरणी टिकून राहायला हवी? या सर्वात हिंसाचार हाच सर्वात प्रभावी असतो आणि तोच अखेर विजयी होताना दिसतो, हे दुर्दैव. या सर्व स्थितीचा सर्वांनी विचार करायला हवा आणि शहाणपणातून भविष्याकडे वाटचाल करायला हवी.

शाहीन बाग येथे महिलांनी बैठा सत्याग्रह केल्याबद्दल राजकीय पक्षांनी आत्मचिंतन करायला नको का? काही चुकीच्या गोष्टींविषयी चुकीच्या धारणा करून निर्माण झालेल्या भीतीचे हे परिणाम आहेत; पण ते अधिक संतापाला जन्म देण्यास कारणीभूत ठरत आहेत. सीएएमुळे लोकांच्या भावना पेटल्या आहेत. हा कायदा कुणावर कोणताही परिणाम घडवून आणणार नाही, हे लोकांना पटवून देण्यात सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे आंदोलनकारी लोकांनी या कायद्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे. प्रत्येकाने त्या कायद्याचा आपल्या पद्धतीने विचार केला आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. सत्तारूढ पक्षाने हे देशाविरुद्ध बंड पुकारले जात आहे, असे म्हणणे सुरू केले आहे, तर हे एका धर्माच्या विरोधातील युद्ध आहे असे विरोधकांचे म्हणणे आहे. वास्तविक हा विषय चर्चेने सुटायला हवा. लोकांच्या नुसत्या भावना भडकावून काहीही साध्य होणार नाही. या सर्व प्रकारात विकासाचे मुद्दे बाजूला पडले आहेत.

लोकांना सतत भयाच्या वातावरणात आणि भावनांच्या हिंदोळ्यावर ठेवणे परवडणारे नाही. देशापुढील प्रश्न हे अधिक महत्त्वाचे आहेत.
अशा वातावरणात लोकांना निवडणुकीविषयी काळजी वाटून ते ज्या उमेदवाराच्या पक्षाची धोरणे पटतात त्याच पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्याची शक्यता असते. भाववाढ, महिलांची सुरक्षितता, सरकारविरोधी मते बाळगणाऱ्यांचा छळ, या सर्वच गोष्टी चिंता निर्माण करणाºया आहेत. या सर्व गदारोळात आम आदमी पक्षाने यापूर्वी केलेल्या कामांचा लेखाजोखा सादर करून पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याची तयारी चालविली आहे. लोकांना विनामूल्य पाणी आणि वीज दिल्याचा डंका पिटण्यात येत आहे, तर विरोधकांकडून आपने पूर्वी दिलेली कोणती कोणती अभिवचने पूर्ण केली नाहीत, याचा पाढा वाचण्याचे काम चालवले जात आहे. पण दोन्ही पक्ष मतदारांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

लोकांमध्ये जाणूनबुजून भावनिक अस्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न सत्तारूढ पक्षाकडून केला जात आहे. त्यातून लोकांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होऊन त्या चिंता, संताप आणि भीतीला जन्म देतात. अलीकडे झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये ही स्थिती अधिक प्रमाणात पाहायला मिळाली. अस्थैर्याच्या भावनेने लोक नकारात्मक प्रचाराला बळी पडतात, असे दिसून आले आहे. कारण भय आणि भविष्यात होणारा धोका यांच्या विचारातूनच मतदार मतदान करीत असतात. लोकांच्या मनात निर्माण झालेल्या भयामुळे ते लोकप्रिय घोषणांच्या आहारी जातात.

लोकांच्या मनात संघर्ष निर्माण होतो आणि ते स्वत:हून नेत्यांनी भडकावलेल्या आगीत तेल ओतण्याचे काम करतात. सध्या विचारांचे ध्रुवीकरण इतक्या मोठ्या प्रमाणात झाले आहे, की दुसºया प्रकारचे विचार ग्रहण करण्याची लोकांची तयारीच नसते. वास्तविक भिन्न संस्कृतींचा संगम झालेली समाजव्यवस्था टिकायला हवी. हे आपले व्हिजन असायला हवे. अशा समाजव्यवस्थेत भिन्न भिन्न राष्ट्रीयत्वाचे, भिन्न भाषांचे, भिन्न धर्मांचे आणि भिन्न वंशांचे लोक परस्परांशी सुसंवाद साधत एकत्र नांदायला हवेत. आपण या तºहेच्या निरनिराळ्या परंपरा, जीवनशैली, मूल्ये आणि विचारधारा असलेल्या लोकांसह आजवर नांदत होतो. म्हणून जगातील सर्व राष्ट्रांमध्ये आपला लौकिक आजवर कायम होता. तो कायम कसा राहील, हे दाखवून देण्यासाठी दिल्लीच्या निवडणुकीचे निकाल महत्त्वाचे ठरतील.

Web Title: Low level of Delhi election campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.