शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
3
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
4
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
5
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
6
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
7
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
8
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
9
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
10
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
11
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
12
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
13
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
14
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
15
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
16
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
18
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
19
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
20
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार पुस्तकांच्या संगतीतला एकाकी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 06:17 IST

rashid irani: वाचन आणि चित्रपटांत रमलेला एक कलंदर. त्याच्यासोबत मुंबईच्या वाचन संस्कृतीचा, सिनेमा संस्कृतीचा सुवर्णकाळही इतिहासजमा झाला आहे.

- -सुनील तांबे(स्वतंत्र पत्रकार)चित्रपट आणि कविता यांचं रशीद इराणीला वेड होतं. कोणत्याही भाषेतला चित्रपट मग तो चांगला असो की वाईट वा टाकाऊ तो पाहायचा. कविता मात्र प्रामुख्याने इंग्रजी भाषेतल्या. चित्रपट आणि कवितांमुळेच मी इतकी वर्षे जगलोय, असे तो म्हणायचा. इराणमधून पारसी काही शतकांपूर्वी भारतात आले. इराणी मात्र केवळ एक-दीड शतकापूर्वी आले. इराण्यांनी मुंबईत ठिकठिकाणी रेस्टॉरंट सुरू केली. धोबी तलाव येथील कॅफे ब्रेबॉर्न हे रेस्टॉरंट रशीदच्या कुटुंबाचं होतं. तरुण असताना रशीद हे दुकान चालवायचा, गल्ल्यावर बसायचा; परंतु त्याला वेड होतं सिनेमाचं.शाळकरी रशीदला हिंदी चित्रपटांचं आकर्षण होतं. आई-वडिलांसोबत महिन्यातून कधी तरी तो चित्रपट पाहायचा. एकदा ट्यूशन क्लासला दांडी मारून तो मित्रासोबत चित्रपट पाहायला गेला. त्यावेळी मुंबईत अमेरिकन चित्रपट धोबी तलावच्या मेट्रो टॉकीजला प्रदर्शित व्हायचे. त्याच्यामागे असलेल्या लिबर्टी सिनेमागृहात हिंदी चित्रपट. रशीद मित्रासोबत लिबर्टीला गेला. चित्रपट कोणता आहे याची चौकशी न करता तिकीट काढून ते थिएटरात गेले आणि पडद्यावर ‘ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स’ ही अक्षरं झळकली. रशीदने कपाळावर हात मारला. हेन्‍री हॅथवे दिग्दर्शित ‘नायगारा’ हा चित्रपट सुरू झाला. ओपनिंग शॉटमध्ये एक अमेरिकन ललना कॅमेऱ्यापासून दूर चालत जाते, पाठमोरी आणि नंतर कॅमेरा तिला पुढून शूट करतो. ही ललना होती मॅरिलीन मन्‍रो. रशीदचा कलेजा खलास झाला. त्या क्षणी रशीद मॅरिलीन मन्‍रोच्या आणि अमेरिकन चित्रपटांच्या प्रेमात पडला. सिनेमा थिएटरच्या अंधारात त्याचं या दोघांशी नातं जुळलं. त्याला विसर पडला आपल्या मित्राचा, घराचा, ट्यूशन क्लासचा वा शाळेचा. रशीद पूर्णपणे चित्रपटात बुडून गेला. १९५३ ते २०२१ रशीद चित्रपटांमध्येच डुंबत राहिला. कॉलेजात गेल्यावर रशीद दर आठवड्याला एक चित्रपट दोनदा पाहायचा. अर्थात अमेरिकन. चित्रपट दुसऱ्यांदा पाहावास वाटला नाही म्हणजे तो चित्रपट वाईट अशी रशीदची थिअरी होती. चित्रपट पाहण्याचे व्यसन होते म्हणून रशीद ‘स्क्रीन शॉट’ नावाचे मासिक नियमितपणे वाचू लागला. त्यामध्ये अमेरिकन चित्रपटांच्या कथा, निर्माते-दिग्दर्शक-अदाकार-अदाकारा यांच्या मुलाखती असायच्या. त्याशिवाय चित्रपट कोडे असायचे. ते सोडविण्यात रशीदला मौज वाटायची. चित्रपटासोबत तुमचे वैयक्तिक नाते तयार होते, चित्रपटाची प्रत्येक फ्रेम तुम्हाला कळतेच असे नसते, कवितेचा आनंद तुम्हाला थेट मिळतो, असे रशीद एकदा म्हणाला.‘स्क्रीन शॉट’ या नियतकालीकानंतर साइट अँड साउंड, फिल्म कमेंट या गंभीर नियतकालिकांची गोडी रशीदला लागली. या नियतकालिकांमुळे चित्रपटातलं सौंदर्य शब्दांत कसं पकडायचं हे मी शिकलो, असं रशीदने सांगितलं. मुंबईत केवळ हिंदी चित्रपट आणि अमेरिकन चित्रपटच पाहायचो, कधी कधी मराठी चित्रपट कारण त्या काळात मुंबईत हेच चित्रपट पाहायला मिळायचे; परंतु मॅक्स मुल्लर भवन, गटे इन्स्टिट्यूट यांच्यामुळे वेगळ्या सिनेमाची ओळख झाली. सुचित्रा या फिल्म सोसायटीमुळे वेगवेगळ्या देशांतले, भाषांमधले सिनेमे रशीद पाहू लागला. उत्तम, चांगले, वाईट सर्व प्रकारचे चित्रपट पाहावेत म्हणजे आपली अभिरुची तयार होते, असे रशीद सांगायचा. पूर्व युरोपातले विशेषतः हंगेरी, पोलंड या देशांतले सिनेमे रशीदने साठ-सत्तरच्या दशकात पाहिले. हॉलीवूड चित्रपटांचा हा सुवर्णकाळ होता आणि अनेक उत्कृष्ट भारतीय फिल्म्सही याच काळात निर्माण झाल्या. आमची पिढी नशीबवान होती, कारण त्यावेळी व्हिडिओ नव्हते, डीव्हीडी नव्हत्या, गुगल नव्हते. आम्ही थिएटरमध्येच चित्रपट पाहायचो. चित्रपटाबद्दल विविध नियतकालिकांमध्ये वाचायचो. ग्रंथ वाचायचो, कविता संग्रह वाचायचो. रशीदच्या घरात पाच हजार पुस्तके होती.१९६९ साली नवी दिल्ली येथे भारत सरकारने भरवलेला चित्रपट महोत्सव पाहायला रशीद दिल्लीला गेला. दिवसाला पाच चित्रपट तो पाहायचा. रशीदचा हा पहिला चित्रपट महोत्सव. त्यानंतर सलग ५० वर्षे तो इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावायचा. टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाइम्स अशा अनेक नियतकालिकांमध्ये तो चित्रपट समीक्षण लिहायचा. तोपावेतो रशीदचे कुटुंबीय कालवश झाले. प्रिन्सेस स्ट्रीटवरील छोट्याशा फ्लॅटमध्ये रशीद एकटाच राहायचा. रशीद पूर्ण शाकाहारी होता आणि शाकाहारी थाळी हा त्याचा वीक पॉइंट होता. त्याच्या घरामध्ये घरगुती सामान कमी होते. कारण सकाळचा चहा, ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण सर्व काही तो रेस्टॉरंटमध्येच करायचा.वाढत्या वयानुसार मधुमेह, रक्तदाबही त्याच्या शरीरात वस्तीला आले. गेल्या वर्षी कोरोनातून तो पूर्ण बरा झाला. लॉकडाऊनमुळे घरात कोंडून पडल्याने तो हादरला. घरात त्याच्याशिवाय कुणीच नव्हते. लॉकडाऊन सैल झाल्यावर तो पुन्हा पूर्वीप्रमाणे प्रेस क्लबमध्ये येऊ लागला. क्लबच्या मीडिया सेंटरमध्ये तो लिखाण करायचा. शुक्रवार, ३० जुलै आणि शनिवार ३१ जुलै रोजी तो प्रेस क्लबमध्ये आला नाही. सोमवारी, २ ऑगस्टलाही तो प्रेस क्लबला नव्हता. मित्रांना काळजी वाटली. त्यांनी पोलिसांना खबर दिली. फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलीस आतमध्ये शिरले, बाथरूममध्ये रशीदचा मृतदेह होता. ३१ जुलै रोजीच त्याने बहुधा शेवटचा श्वास घेतला. मृत्यूसमयी तो ७४ वर्षांचा होता. रशीदसोबत मुंबईच्या वाचन संस्कृतीचा, सिनेमा संस्कृतीचा सुवर्णकाळही इतिहासजमा झाला आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई