खरे तर या गोष्टीला तसा उशीरच झाला. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून यापूर्वीच हकालपट्टी व्हायला हवी होती. त्यांच्यासारखी एक गुलछबूृ व्यक्ती राज्य मंत्रिमंडळात असणे हे सरकार आणि पर्यायाने महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यासाठी लांच्छनास्पद होते. म्हणे, नैतिकता दाखवून मुंडेंनी राजीनामा दिला! कसली नैतिकता? मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या निर्घृण आणि निर्दयीपणे हत्या करण्यात आली, त्याचे व्हिडीओ आणि छायाचित्रे पाहिली तर कोणाच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्यावाचून राहणार नाही. खरे तर हा विषय अत्यंत संवेदनशील असताना कोर्टात दाखल झालेल्या दोषारोपपत्रातील या छायाचित्रांना पाय फुटलेच कसे? समाज माध्यमांवर ती कोणी व्हायरल केली? त्यांचा हेतू काय? हा सगळाच अत्यंत गंभीर आणि तितकाच कसून चौकशी करण्याचा विषय आहे.
असो. संतोष देशमुख यांच्या हत्येची छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटून दोन समाजात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता दिसताच मुंडेंची गच्छंती करण्यात आली, हे त्यामागील एक प्रमुख कारण. अन्यथा मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी इतका विलंब होण्याचे कारण नव्हते. शिवाय मुंडेंचा राजीनामा का घेतला, यावरही एकवाक्यता दिसत नाही. अजित पवार म्हणाले, मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला, तर स्वत: मुंडे म्हणतात, मी आजारी असल्याने राजीनामा दिला! खरे-खोटे ते दोघेच जाणोत! नैतिकतेची एवढीच चाड होती, तर या हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचे नाव समोर येताच अजितदादांनी मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा होता; पण ते मुंडेंना पाठीशी घालत राहिले. धनंजय मुंडे ही सध्याची राजकीय वृत्ती, प्रवृत्ती आणि विकृती आहे. इतकी मग्रुरी आणि निर्ढावलेपणा महाराष्ट्राने आजवर कधी पाहिला नव्हता.
सर्व प्रकारची गैरकृत्ये करायची आणि आरोप होताच जातीआड दडायचे अथवा धार्मिक अधिष्ठात्यांकडे तरी आश्रय शोधायचा. हा नवाच प्रकार राज्यात सुरू झाला आहे. हे सारे महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेच्या सहनशीलतेच्या पलीकडे होते. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला जात नाही? त्यांना कोण पाठीशी घालते आहे, देवेंद्र फडणवीस एवढे हतबल का, असे एक ना अनेक प्रश्न लोकांच्या मनात होते. मुंडेंच्या राजीनाम्याने या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतीलच असे नाही; परंतु त्यातून जाणारा संदेश महत्त्वाचा आहे. सत्तेच्या बळावर अमाप माया जमविणे, वसुलीसाठी गुंड पाळणे, गुत्तेदारांमार्फत शासकीय निधीचा अपहार करणे, परळीतील औष्णिक विद्युत केंद्रातील राखेचा मलिदा ओरपणे, सर्व नियम धाब्यावर बसवून कृषी-समाजकल्याण खात्यात भ्रष्टाचार करणे, अशा एक ना अनेक भानगडींची आजवर दबक्या आवाजात कुजबुज होती.
मात्र, संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात वाल्मीक कराड गोत्यात आल्यानंतर मुंडेंच्या ‘पापाचे घडे’ भरले. संतोषच्या हत्येचा वाल्मीक हाच ‘मास्टरमाइंड’ असल्याचे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून स्पष्ट झाल्यानंतर मुंडेंची हकालपट्टी अटळ होती, तरीदेखील त्यांच्या गच्छंतीसाठी सरकारने दोन दिवस उशीर का केला? वाल्मीकने कोणाच्या जिवावर आजवर नंगानाच घातला, त्यास कोणाचे पाठबळ होते, हे सर्वज्ञात होते; पण मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची, एवढाच काय तो प्रश्न होता. फडणवीस यांच्या सरकारला स्पष्ट बहुमताचा भक्कम आधार असला तरी हे आघाडीचे सरकार आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना विश्वासात घेतल्याखेरीस अशा प्रकारचे निर्णय होत नसतात, हेही मान्य; परंतु मुंडेंमुळे सरकारच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होताच मुख्यमंत्र्यांनी आपला विशेषाधिकार वापरला असता तर महाराष्ट्राने त्यांचे कौतुकच केले असते.
एखाद्या मंत्र्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानंतर त्याने नैतिकता दाखवून राजीनामा देणे, हे काही अप्रूप नव्हे! अशा प्रकारच्या नैतिकतेची किती तरी उदाहरणे सांगता येतील. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मीक अनेक दिवस फरार होता. त्याची अटक टाळण्यासाठी आवादा नामक खासगी वीज कंपनी आणि पोलिसांवर कोणाचा दबाव होता, हे जगजाहीर आहे. त्यामुळे मुंडेंची गच्छंती अटळ होती. उशिरा का होईना मुंडेंचा राजीनामा घेतला ते बरेच झाले. आता माणिकराव कोकाटेंचे काय होणार, याबाबत उत्सुकता आहे. कारण ‘टेक्निकली ही इज सस्पेंडेड!’