Lokmat Deepotsav 2023: यावर्षीचा लोकमत 'दीपोत्सव' पुरुषांच्या बाजूने आणि बायकांच्या विरोधात आहे का? 

By Aparna.velankar | Published: November 3, 2023 03:26 PM2023-11-03T15:26:05+5:302023-11-03T15:28:53+5:30

पुरुष हा प्राणी सध्या एकूणच ‘आरोपीच्या पिंजऱ्या’त उभा आहे आणि त्याला सबळ कारणेही आहेत, याचा विसर पडून अर्थातच चालणार नव्हते. पण तरीही, त्याच्या खांद्यावर मैत्रीचा हात टाकून ‘मित्रा, तू कसा आहेस?’ असा एक साधा, प्रांजळ प्रश्न आपण विचारू शकतो का?

Lokmat Deepotsav Diwali Special 2023 What is the thought behind theme Men or Purush | Lokmat Deepotsav 2023: यावर्षीचा लोकमत 'दीपोत्सव' पुरुषांच्या बाजूने आणि बायकांच्या विरोधात आहे का? 

Lokmat Deepotsav 2023: यावर्षीचा लोकमत 'दीपोत्सव' पुरुषांच्या बाजूने आणि बायकांच्या विरोधात आहे का? 

- अपर्णा वेलणकर 
संपादक, लोकमत दीपोत्सव 

यावर्षीच्या ‘दीपोत्सव’ या 'लोकमत'च्या दिवाळी अंकाचे सूत्र आहे : ‘पुरुष’!

ते सुचले, आणि मानेवर बसले. त्यात ‘धक्का’ होता, संपादकांना शोधणे भागच असते त्या ‘पण तरी यंदा नवीन, वेगळे काय?’ या प्रश्नाचे चपखल उत्तर होते, चोहोबाजूंनी सैरावैरा भटकण्याची संधी होती आणि उत्तम मजकूर हाताशी लागण्याची खात्रीही!

पुरुषांच्या मनात, त्यांच्या आयुष्यात शिरावे असे वाटत होते, पण त्याचा मार्ग सापडेना. म्हणजे नक्की काय करायचे, या साध्या प्रश्नालाही नेमके, नीटस उत्तर दिसेना. आपल्या सामाजिक आणि व्यक्तिगत विचारविश्वात स्त्री-पुरुषांच्या नात्याभोवती ठरलेल्या युक्तिवादांचे, परंपरागत आरोप-प्रत्यारोपांचे बोचके गुंडाळून केवढा मोठा घोळ आपण घालून ठेवला आहे; याचा हा रोकडा अनुभव अस्वस्थ करणारा होता.

- शेवटी, पाटी पुसली!

नेहमीच्या वाटा-वळणांच्या चकव्यात न अडकता सरळ चालत सुटावे असे ठरवले आणि एकच प्रश्न समोर ठेवला : पुरुषाच्या मनात उतरून पाहिले, तर तिथे काय सापडते?

पुरुष हा प्राणी सध्या एकूणच ‘आरोपीच्या पिंजऱ्या’त उभा आहे आणि त्याला सबळ कारणेही आहेत, याचा विसर पडून अर्थातच चालणार नव्हते. पण तरीही, त्याच्या खांद्यावर मैत्रीचा हात टाकून ‘मित्रा, तू कसा आहेस?’ असा एक साधा, प्रांजळ प्रश्न आपण विचारू शकतो का, आणि त्या प्रश्नाला जी खरी उत्तरे मिळतील, ती तशीच्या तशी ऐकण्याची, समजून घेण्याची आपली तयारी असेल का? - यावर आपले संपादकीय नियोजन प्रत्यक्ष कृतीत कसे उतरणार हे अवलंबून असेल,हे नक्की होते. 

लोकमत दीपोत्सवच्या वेबसाईटला भेट द्या!

शिक्षण-संस्कार आणि विचार या सगळ्या बळावर स्त्री-पुरुष समानतेचे मूलभूत सूत्र ज्यांच्या जगण्या-वागण्याचा स्वाभाविक भाग होऊन गेला आहे, असे साधारण वीसेक टक्के पुरुष, समजा, वरच्या (वैचारिक) स्तरात असतील... लिंगभावाची/लिंगभेदाची रूढ चौकट विचाराने ओलांडणे जमले आहे आणि तो विचार कृतीतही उतरवता आला आहे असे पुरुष! ज्यांना अजूनही बाईची जागा चपलेच्या ठिकाणीच आहे असे मनातून वाटते, तिचे शरीर ही आपल्या उपभोगासाठी निर्माण केली गेलेली वस्तू वाटते आणि कोणत्याही कारणाने ती कशालाही ‘नाही’ म्हणाली, तर तिच्यावर हात उगारणे, तिला पायदळी तुडवणे, तिच्या चेहऱ्यावर अँसीड फेकून तिला विद्रूप करणे, तिच्या शरीरावर बळजोरी करून वर तिला ठार मारणे या साऱ्यात ज्यांना ‘पुरुषार्थ’ दिसतो; असे वीसेक टक्के पुरुष खालच्या स्तरात असतील!

- उरले मध्ये कोंबलेले साठ टक्के!

मध्यममार्गी, आपल्या वाट्याला आलेल्या बाईशी होता होईतो जुळवून घेणारे, कधी आवाज चढला- हात उठला तर त्याबद्दल अपराधी वाटणारे, संसार चालवण्यासाठी खस्ता खाणारे, हातातल्या स्वस्त स्क्रीनवर पोर्न पाहाणारे आणि तसली मजा आपल्या वाट्याला नाही याबद्दल मनातून खंतावणारे, कधीच पुरे न पडणाऱ्या  पैशाच्या तकतकीने सदा वैतागलेले, मुलाबाळांच्या काळजीने खंगलेले, ‘पुरुष’ म्हणून आपण नेमके कसे वागावे हे न उमजून भांबावलेले पुरुष! त्यामध्ये करियरच्या शिड्या चढण्यासाठी झुंबड उडालेले शहरी पुरुष आले, शेतीभातीत राबण्यावाचून पर्याय नसलेले खेड्यातले पुरुष आले, याच्या मध्ये लटकून ‘पर्याय’ शोधण्याच्या लगबगीतले पुरुष आले, सगळेच आले!

- या अधल्यामधल्यांच्या आयुष्यात उतरून पाहू, त्यांच्या सुखाची साधने, दु:खाची कारणे शोधू असे ठरवले... मग हळूहळू कसे, कुठून जावे याच्या वाटा दिसू लागल्या; पण निग्रहाने त्यावर चालत राहाणे सोपे नव्हते.

हे नियोजन आकाराला येत असतानाच लिव्ह-इन पार्टनर स्त्रीचा खून करून तिच्या शरीराचे तुकडे तुकडे कापून जंगलात फेकणाऱ्या, करवतीने कापलेले मैत्रिणीच्या मृतदेहाचे अवयव कुकरमध्ये शिजवून मिक्सरमध्ये दळून ते पाणी गटारात ओतणाऱ्या  पुरुषांच्या क्रूर कहाण्या बातम्यांमध्ये झळकत होत्या... एका जवळच्या मैत्रिणीने विचारलेही, हे एवढे सगळे आजूबाजूला घडते आहे आणि तरीही तुम्ही पुरुषांची बाजू घेऊन ‘दीपोत्सव’चा अख्खा अंक उभा करणार म्हणता?

त्यावर मी सहज म्हटले, बाजू घेण्याचा प्रश्नच नाही, एखाद्या माणसाला समजून घेण्यासाठी त्याची बाजू घ्यावी लागते असे कुठे आहे?

- नजरेसमोरचे उरलेसुरले मळभही दूर झाले आणि म्हटले, चला!

Web Title: Lokmat Deepotsav Diwali Special 2023 What is the thought behind theme Men or Purush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.