- विश्वास पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदार संघातून २०२९ च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठीच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे कट्टर राजकीय विरोधक व शाहू समूहाचे नेते समरजित घाटगे यांच्याशी कागल नगरपालिकेत समझोता केल्याचे चित्र आहे. या बदल्यात समरजित यांना कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांच्या विरोधात किंवा पुणे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांना आमदार करण्याच्या घडामोडी या युतीमागे असल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हा समझोता आणि तसा शब्द दिला असल्याचे समजते. हे कितपत आकाराला येणार हे राज्याचे राजकारण कोणते वळण घेणार यावर ठरणार आहे.
खरेतर समरजित यांनी नोव्हेंबर २०१६ ला जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हाच त्यांना २०१८ ला विधान परिषदेच्या ज्या जागा रिक्त झाल्या होत्या, त्यातून संधी देण्याची तयारी भाजपची होती. सुरुवातीला ते त्यास तयारही होते. परंतु नंतर त्यांनी विधानपरिषद नको, जनतेतून विधानसभेत जाऊ असा विडा उचलला. परंतु चांगली लढत देऊनही सलग दोनवेळा पराभव झाल्यानंतर त्यांना गट टिकवण्यासाठी सत्तेची उब हवी होतीच. त्यामुळे पुढचे काही होईल ते होईल आता आपण सत्तेजवळ जावू असा निर्णय त्यांनी घेतल्याचे दिसते. या घडामोडीने ते भाजपमध्ये जाण्याचा मार्गही मोकळा झाला.
आता जे दोन पर्याय त्यांच्यासमोर आहेत, त्यामध्ये पुणे पदवीधरचा पर्याय तसा अडचणीचा आहे. तिथे भैय्या माने यांनी तयारी केली आहे. परंतु तोपर्यंत त्यांच्या पत्नीला आता कागलमध्ये संधी दिली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद लाड यांची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. या मतदारसंघात मतनोंदणीला महत्व असते. त्यासाठी आधी काम करावे लागते. त्यामुळे या पर्यायामध्ये तशा अडचणीच जास्त दिसतात. आमदार अरुण लाड यांची मुदत ६ डिसेंबर २०२६ पर्यंत आहे.
दुसरा पर्याय कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था गटातून निवडणूक लढवण्याचा आहे. हा कोल्हापूर जिल्ह्यापुरताच मतदार संघ आहे. शिवाय आता नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदेत महायुतीच्या जागा चांगल्या संख्येने निवडून आणायच्या आणि त्या बळावर सतेज पाटील यांना आव्हान द्यायचे अशी भाजपची रणनीती असू शकते. सतेज पाटील व मुश्रीफ यांची मैत्री जगजाहीर आहे. तेव्हा त्यांनाच समरजित घाटगे यांंना विजयी करण्याच्या जोडण्या लावायला लावायच्या असेही राजकारण खेळले जावू शकते. पश्चिम महाराष्ट्रात अगदी काँग्रेसच्या बाजूने सगळ्या पडझडीतही सतेज पाटील पाय रोवून उभे आहेत, त्यांना रोखण्यासाठी ही खेळी केली जावू शकते. त्यांची मुदतही १ जानेवारी २०२८ पर्यंत आहे. या दोन्ही निवडणुका विधानसभेच्या आधी असल्याने मुश्रीफ यांना दिलेले शब्द आधी पाळावे लागणार आहेत. आमची युती बरेच दिवस चालणार असल्याचे विधान मुश्रीफ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले आहे. त्यामागेही हा संदर्भ असू शकतो.
या युतीचे आणखीही काही अर्थ असे...- मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र येण्यामुळे माजी खासदार संजय मंडलिक हे मुश्रीफ यांच्यापासून जास्त दूर गेले. तसे ते अगोदर गोकुळमध्ये वीरेंद्रचा पराभव, त्यानंतर लोकसभेला त्यांचा पराभव यामुळे दूर गेले होतेच. मुश्रीफ-समरजित यांना एकत्र आणून मंडलिक यांना नव्हे तर शिंदेसेनेचे खच्चीकरण करण्याचाही प्रयत्न असू शकतो. राज्याच्या राजकारणात कुबड्या फेकून द्यायची घोषणा झाल्यापासून तशा हालचाली सुरू झाल्याचे दिसते.- कागल नगरपालिकेत मुश्रीफ व घाटगे हे दोन पिढ्यांचे पारंपरिक राजकीय विरोधक अचानक सोमवारी एकत्र आल्याने कोल्हापूरच काय राज्यभर खळबळ उडाली. या दोघांनीही कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता परस्पर एकत्र येण्याचा निर्णय घेतलाच. परंतु त्यांच्या या निर्णयामुळे कागलमधील भाजपचे कार्यकर्तेही तोंडघशी पडले. कारण त्यांना दिलेले एबी फॉर्म पक्षाने परत घेतले. त्यांनी आता पुन्हा पाच वर्षे पोस्टरला खळच लावावी अशी जबाबदारी पक्षानेच त्यांच्यावर टाकली आहे.- विधानसभेपासून माजी आमदार संजय घाटगे हे मुश्रीफ यांच्या अतिजवळ गेले होते. त्या जवळ जाण्याने त्यांचे राजकीय, आर्थिक पुनर्वसन झालेच आहे. त्यामुळे आपली फसवणूक झाली असे म्हणण्याचा अधिकार त्यांनी आधीच गमावला आहे.- मुश्रीफ-समरजित या दोघांनीही कुणाची तमा न बाळगता एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासाठी एकमेकांची डोकी फोडून घेणारे आणि व्हॉटस्अपवर विरोधातील मेसेज वाचूनही संतापून जाणाऱ्या कार्यकर्त्यांचेही या निर्णयाने चांगलेच नाक कापले आहे. तुम्ही बसा आमचा साहेब, आमचा दादा करत.. एकमेकाला विरोध करत..पाण्यात पाहत..आणि ते मारू देत एकमेकांना सोयीनुसार मिठ्ठ्या असाच अर्थ या एकत्र येण्याचा आहे. त्यांनी एकत्रच येऊ नये आणि कायमच राजकीय वैर करत राहावे असेही काही नाही. पण अशा सोयरिकी या फक्त आणि फक्त सत्तेसाठीच होतात, तशीच ही सोयरीक झाली आहे. त्याला कागलच्या विकासाचा मुलामा दिला जात आहे.- मुश्रीफ यांची राजकीय भूमिका कागल, मुरगूड, गडहिंग्लज, आजरा आणि चंदगडमध्येही वेगवेगळी आहे. परंतु हे त्यांचे राजकीय चातुर्य नव्हे तर त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास तो त्यांचा भाबडेपणा आहे म्हणा तरं..
संजय घाटगे काय करणार..?कागलमधील तिन्ही गटांची भूमिका स्पष्ट झाली आहे. माजी आमदार संजय घाटगे हे नाराज असल्याचे सोमवारी सांगण्यात येत होते परंतु आम्ही त्यांना सोबत घेऊ, असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. कागलच्या राजकारणात मंडलिक-संजय घाटगे यांच्यात फारसे कधीच सख्य नाही आणि मुश्रीफ यांना दुखवून ते वेगळे काही करतील, अशी शक्यताही नाही. ते समरजित यांच्याशी अंतर ठेवून मुश्रीफ यांच्यासोबत राहतील असे चित्र आहे.
उपमुख्यमंत्रीपदाची हवा..कागलमध्ये सोमवार मुश्रीफ-समरजित युतीने गाजवला. मंगळवारी दिवसभर मुश्रीफ हे उपमुख्यमंत्री होणार अशी हवा जोरात होती. उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजीनामा देवून मुश्रीफ यांना संधी देणार असल्याचे कार्यकर्ते उत्साहाने सांगत होते.
Web Summary : Mushrif and Ghatge's alliance aims to secure a legislative council seat for Ghatge, potentially challenging established leaders. This power play impacts regional dynamics.
Web Summary : मुश्रीफ और घाटगे का गठबंधन घाटगे के लिए विधान परिषद की सीट सुरक्षित करना चाहता है, संभावित रूप से स्थापित नेताओं को चुनौती दे रहा है। इस शक्ति प्रदर्शन से क्षेत्रीय गतिशीलता प्रभावित होती है।