शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

पत्रकारितेत स्वत:चे स्थान निर्माण करणारा साक्षेपी संपादक

By admin | Updated: March 22, 2017 23:40 IST

महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक गोविंदराव तळवलकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अमेरिकेच्या ह्युस्टन शहरात अखेरचा श्वास घेतला.

महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक गोविंदराव तळवलकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अमेरिकेच्या ह्युस्टन शहरात अखेरचा श्वास घेतला. वृत्तपत्रसृष्टीत तळवलकर केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हते, तर वैचारिक समृद्धीसह संवेदनशील मने घडवणारी ती एक चालती बोलती संस्था होती. १९६८ साली संपादकपदाची धुरा हाती घेतल्यानंतर सलग २८ वर्षे अत्यंत परखडपणे, मात्र सामान्य वाचकांनाही समजेल अशा शब्दांत, अभ्यासपूर्ण शैलीत, अभिजात दर्जाचे लिखाण त्यांनी केले. अप्रतिम दर्जाची वेगळीच धार त्यांच्या लिखाणाला होती. भाषेवरील प्रभुत्व आणि प्रचंड व्यासंग यांच्या बळावर अग्रलेखांना त्यांनी वेगळ्याच उंचीवर नेले.लोकमान्य टिळक आणि मानवेंद्रनाथ रॉय यांच्या लेखनाची व विचारांची परंपरा जपणाऱ्या तळवलकरांचे राजकीय आणि सामाजिक भान अलौकिक होते. राजकारण आणि समाजजीवनातल्या प्रत्येक अपप्रवृत्तींवर ते बेधडक प्रहार करीत. संपादकाचा वैचारिक आवाका आणि दृष्टिकोन किती व्यापक असावा, याचे तळवलकर आदर्श मानदंड मानले जातात. डावे विचारवंत टाइम्स समूहाच्या वृत्तपत्रांना ज्या काळात भांडवलदार गटाची साखळी वृत्तपत्रे मानायचे, त्या काळातही अभिजनांबरोबरच सर्वसामान्य वाचकही तळवलकरांचा महाराष्ट्र टाइम्स विशेष उत्साहाने व आपुलकीने वाचत असे. सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक जीवनातल्या लक्षवेधी विषयांना न्याय मिळवून देण्यासाठीही तळवलकर कमालीचे आग्रही होते. आपल्या लेखणीचा वापर त्यासाठी त्यांनी सातत्याने केला. महाराष्ट्र टाइम्स हे त्या काळी केवळ मुंबईतून प्रकाशित होणारे मराठी वृत्तपत्र असले तरी विविध समाजगटांतल्या आणि राज्यभरातल्या विशेष बातम्यांना त्यात स्थान असले पाहिजे, असा व्यापक विचार त्यांच्या मनात असे. तळवलकरांच्या कारकीर्दीत त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळणे हा मराठी पत्रकारांच्या आयुष्यातला सन्मान मानला जायचा. महाराष्ट्र टाइम्सचे व्यासपीठ अधिक व्यापक बनवण्याचे त्यांचे कायमच प्रयत्न असायचे.‘पत्र नव्हे मित्र’ या घोषवाक्यानंतर ‘बातम्या तर सगळेच देतात, आम्ही विचार देतो’ हे महाराष्ट्र टाइम्सचे घोषवाक्य होते. वर्तमान काळातल्या प्रसारमाध्यमांकडे पाहिले तर देशात आणीबाणी घोषित नसूनही माध्यमांचा प्रचंड संकोच झाल्याचे चित्र दिसते. मीडिया हाऊसच्या बऱ्याच मालकांनी सत्ताधाऱ्यांचे मांडलिकत्व पत्करले आहे. काही वृत्तवाहिन्यांना तर अलीकडे सत्ताधाऱ्यांची पथके बातमीत काय हवे, याचे सल्ले, सूचना आणि प्रसंगी आदेशही धाडू लागले आहेत. त्यानुसार अनेक वाहिन्या व काही वृत्तपत्रे मेक टू आॅर्डर बातम्या आणि त्यातला मजकूर तयार करण्याचे कारखाने बनले आहेत. अशा काळात तळवलकरांच्या कारकिर्दीतला महाराष्ट्र टाइम्स आठवल्याशिवाय रहावत नाही. याचे कारण खऱ्या अर्थाने सर्वांच्या मनाला भिडणारे ते एक संपूर्ण वृत्तपत्र होते. तळवलकरांनी आपल्या परखड अग्रलेखांद्वारे राजकीय नेत्यांची उडवलेली खिल्ली जशी वाचनीय असायची, तितकाच अमेरिकन आणि ब्रिटिश व अन्य परदेशी विचारवंतांच्या साहित्याचा तळवलकरांनी करून दिलेला परिचयही मराठी वाचकांच्या ज्ञानात भर घालणारा असायचा. महाराष्ट्र टाइम्सच्या विविध सदरांमधून विजय तेंडुलकरांपासून रा. ग. जाधव आणि दया पवारांपर्यंत सर्वांचे विचारधन प्रत्येकाच्या दारोदारी पोहोचायचे. तळवलकर हे हस्तिदंती मनोऱ्यात बसणारे संपादक आहेत, जमिनीवरील वास्तवाचे त्यांना नाही, अशी टीका त्यांच्यावर व्हायची. तथापि आपल्या लिखाणात बारीकसारीक वास्तवदर्शी तपशील नमूद करून त्या टीकेला तळवलकर चोख उत्तर द्यायचे. संपादकाच्या भूमिकेतील तळवलकरांचा आणखी एक सांगण्यासारखा गुण म्हणजे आपला वार्ताहर अथवा प्रतिनिधीने दिलेल्या बातमीमागे ते भक्कमपणे उभे राहायचे. कोणत्याही बातमीच्या दोन्ही बाजू प्रसिद्ध झाल्याच पाहिजेत, याविषयी ते आग्रही होते. तेव्हा धुळे आणि सध्याच्या नंदुरबार जिल्ह्यात नर्मदेच्या तीरावर तळोदा, अक्कलकुवा तालुक्यांमध्ये मेधा पाटकरांच्या नर्मदा बचाओ आंदोलनाचा प्रचंड प्रभाव असताना, आंदोलनाची दुसरी बाजू वाचकांपुढे जावी यासाठी तळवलकरांनी प्रस्तुत पत्रकाराला त्या भागात पाठवले. तिथल्या बातम्यांची दुसरी वस्तुनिष्ठ बाजू प्रकाशात आणल्यानंतर या लिखाणावर आक्षेप घेणारा बराच गहजब माध्यमांमध्ये उडाला. संस्थेतील काही सहकारीदेखील त्याला अपवाद नव्हते मात्र या प्रकरणात तळवलकर या लिखाणाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. इतकेच नव्हे तर त्यानंतरही सातत्याने या विषयाचा मागोवा घेण्यासाठी त्यांनी प्रोत्साहनच दिले. वर्तमानपत्राचे कार्यालय हे गावातल्या चावडीसमान असले पाहिजे, असा अलिखित दंडक अगदी नव्वदच्या दशकापर्यंत होता. सुरक्षेच्या समस्येने तेव्हा आजसारखे अक्राळविक्राळ रूप धारण केलेले नव्हते. महाराष्ट्र टाइम्समध्ये कोपऱ्यातल्या केबिनमध्ये तळवलकर त्यावेळी बसायचे. तळवलकरांना भेटायला येणाऱ्यांमध्ये विठ्ठलराव गाडगीळ, वि.म. दांडेकर, पु.भा. भावे, ना.धों. महानोर अशा विविध क्षेत्रांतल्या अनेकांचा समावेश असायचा. केबिनबाहेर दिनकर गांगल, अशोक जैन आणि कालांतराने कुमार केतकरांनी इतर सहकाऱ्यांसह गप्पांचे छोटे छोटे अड्डे जमवलेले असायचे. अनेक बातम्यांचे ताजे विश्लेषण त्यात आपोआपच सर्वांच्या कानावर पडत असे. ग्रंथालीच्या नवलाईचे दिवस होते. गांगल, अशोक जैन यांच्याकडे नवोदित लेखकांपासून सांस्कृतिक क्षेत्रातल्या अनेकांची वर्दळ असायची. तळवलकरांनी या व्यवहारात कधी हस्तक्षेप केला नाही. उलट सर्वांना उत्तेजनच दिले. मराठी वृत्तपत्रसृष्टीत अनेक पत्रकार व संपादक तळवलकरांनी घडवले. आजमितीला विविध वृत्तपत्रांमध्ये संपादकाची धुरा वाहणारे बहुतांश पत्रकार तळवलकरांचा वारसा सांगणारे त्यांचे जुने शागिर्द आहेत.गोविंद तळवलकर १९९६ साली महाराष्ट्र टाइम्समधून निवृत्त झाले. त्याच्या काही दिवस अगोदर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना नाशिकला नेले होते. कार्यक्रम आटोपल्यावर माजी मंत्री विनायकराव पाटलांच्या निवासस्थानी तळवलकरांच्या सन्मानार्थ कुसुमाग्रज, बाळासाहेब दातार, बापूसाहेब उपाध्ये, श्रीनिवास पाटील (सिक्कीमचे विद्यमान राज्यपाल) आणि काही पत्रकारांच्या उपस्थितीत एक गप्पांची मैफल जमली होती. निवृत्तीनंतर तळवलकर तुम्ही मुंबईतच राहणार की आणखी कुठे, असा प्रश्न कुसुमाग्रजांनी विचारला. त्यावर पुणे, दिल्ली, बेंगळुरू अशा विविध ठिकाणांचे पर्याय काही मान्यवरांनी सुचवल्याचे तळवलकर म्हणाले. यावेळी सर्वांनी कुसुमाग्रजांच्या जोडीला आपणही नाशिकला या, नाशिकचे वैभव वाढेल, असा आग्रह तळवलकरांना केला. विशेष म्हणजे या आग्रहाला प्रतिसाद देत तळवलकर लगेच तयार झाले. आपल्या घराशेजारचा मोकळा प्लॉट विनायकरावांनी तळवलकरांना घरासाठी उपलब्ध करून दिला. तळवलकरांचा ‘अक्षय’ बंगला त्यावर अल्पावधीत उभा राहिला. साधारणत: वर्षभर नाशिककर बनून तळवलकरांनी इथे वास्तव्य केले. मात्र त्यानंतर अमेरिकेत आपल्या कन्येकडे निघून गेले. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. अनेक संपादक आणि पत्रकार घडवणारा साक्षेपी संपादक काळाच्या पडद्याआड गेला आहे.-सुरेश भटेवरा(राजकीय संपादक, लोकमत)