शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

आता काय ते होऊनच जाऊ दे, मिस्टर ट्रम्प!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 09:21 IST

आर्थिक बळ, राजनैतिक हिंमत आणि मित्रराष्ट्रांची आघाडी, हे सारे सोबत घेऊन भारताने ट्रम्प यांच्या व्यापारी दादागिरीला बेधडक सामोरे जावे!

प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार 

इतिहासात काही घटनांची पुनरावृत्ती होते. पहिल्यांदा त्या विनोदी वाटतात, दुसऱ्यांदा हास्यास्पद. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना ही दोन्ही विशेषणे लागू पडतात. भारत आणि पाकिस्तानदरम्यान आपणच शांतता प्रस्थापित केल्याचा खोटा दावा करत असतानाच या गृहस्थाने  ३० जुलैला  २५ % आयात कराचा बॉम्ब भारतावर टाकला. अमेरिका निवासी भारतीय वंशाच्या धनाढ्य लोकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये नरेंद्र मोदींची गळाभेट घेणाऱ्या माणसानेच ही कृती केली आहे. ‘सच्चा दोस्त’, ‘महान नेता’ या त्याच्या तोंडच्या वाफांना आता दांभिकतेचा दर्प येत आहे. त्यांना आता  दहशतवादी छावण्या जोपासणाऱ्या पाकिस्तानविषयी  बंधुप्रेमाचे भरते आलेले दिसते. हे करताना ट्रम्प यांनी रशियाच्या जोडीने भारताची अर्थव्यवस्था मृत घोषित केली. भारताने रशियाकडून तेल घेणे थांबवल्याची खोटी कथाही रचली. भारताने ‘करहीन व्यापाराचा’ देकार दिल्याचे खोटेच सांगितले. 

२०१७ मध्ये मोदींनी व्हाइट हाऊसमध्ये  दिलेले प्रेमालिंगन, अहमदाबादचा नमस्ते ट्रम्प उत्सव आणि परस्पर स्तुतिपाठांनी सजलेल्या मोदींच्या अमेरिका भेटी यातून निर्माण झालेल्या विश्वासाला या नव्या कर धोरणाने नख लावले. २०२४ पर्यंत द्विपक्षीय व्यापार १२० अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता. ‘जेवढ्यास तेवढा कर’ टाळण्यासाठी मोदींनी ट्रम्पबरोबर गेल्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या भेटीत कर कपातीचा देकार दिला आणि २०३० पर्यंत परस्पर व्यापार ५०० अब्ज डॉलर्सवर नेण्याचे लक्ष्य ठरवले. पण, नंतर ट्रम्प यांच्या युद्धबंदी केल्याच्या बढाया, अणुयुद्ध थांबवल्याच्या वल्गना, यामुळे पाकला ढाल मिळून  भारताची मानहानी झाली. 

‘अमेरिकेकडून कोणतीही मध्यस्थी झालेली नाही’, असे मोदींनी ट्रम्पना सांगितले असल्याचा खुलासा  परराष्ट्र सचिव विक्रम मिश्रींनी  केला, तरीही ट्रम्प यांनी आपले दावे सुरूच ठेवले. सत्य हेच आहे की, भारताचेच या हल्ल्यावर संपूर्ण प्रभुत्व होते. पाकिस्तानातून चालवले जाणारे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. भारताने नऊ दहशतवादी तळ जमीनदोस्त करून शंभरावर दहशतवाद्यांना यमसदनी पाठविल्यावर पाकिस्तान नाक मुठीत धरून शरण आला. 

भारताची १.४ ट्रिलियन डॉलर्सची बाजारपेठ आणि ग्लोबल साऊथचे नेतृत्व हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या या जशास तसे कराच्या  धक्क्याचे दुहेरी लक्ष्य आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेच्या मते ट्रम्प यांच्या या करामुळे विकसनशील राष्ट्रे प्रादेशिक मोट बांधू लागतील. औषधे आणि कपडे यांसारखी भारताची वैविध्यपूर्ण निर्यात आशिया आणि युरोपकडे वळू शकेल.  अमेरिकेच्या दादागिरीविरुद्धच्या लढ्यात भारत ब्रिक्सचे नेतृत्व करू लागेल. भारत एकाकी नाही. ब्रिक्स उभरत आहे. आसियान देश बदलत्या परिस्थितीकडे लक्ष ठेऊन आहेत आणि युरोप कूस बदलत आहे. ट्रम्पनी आपला हेका चालूच ठेवला, तर ब्रिक्सबरोबरचे संबंध भारत  अधिक दृढ करू लागेल. एक महत्त्वाचा मित्र गमावल्याचा पश्चात्तापच ट्रम्पच्या वाट्याला येईल. 

ट्रम्प यांची कर चालाकी ही राजनैतिक बुरख्याआडची दुटप्पी चाल आहे.  भारत हार्ले आणि हॅमवर जबरदस्त कर लादतो, ही बाब कर धोरणाच्या समर्थनार्थ सांगितली जाते. ट्रम्प यांच्या धनदांडग्या दादागिरीने त्यांच्या ब्रँडला फायदा झाला असेल, पण त्यामुळे भारत, जपान,  कॅनडा आणि अगदी नाटो राष्ट्रांशीही त्यांचे नाते तुटू लागले आहे. ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेचा  आर्थिक विस्तारवाद २५ ते ४० % अशा जबरी करांद्वारे १४ राष्ट्रांचे नुकसान करत आहे आणि ब्रिक्सला संकटात लोटत आहे.  या साहसवादापोटी आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकन मदतीवर चालणारे   शिक्षण प्रकल्प, नागरी सेवा, बडे उद्योगपती आणि विविध देशांतील आर्थिक आणि नीतीगत  निर्णय प्रभावित करणारा समाजातील अभिजनवर्ग इत्यादी घटक  दुबळे होतील.

ट्रम्प यांचे दिखाऊ वर्तन, नफेखोरी आणि तद्दन खोटारडेपणा यामुळे ते लोकशाहीचे पालनकर्ते नव्हे जागतिक दर्जाचे दादा ठरत आहेत. हे धोरण ‘अमेरिका फर्स्ट’ असे नसून, ‘ट्रम्प फर्स्ट’ असावे, असे स्पष्ट दिसते. पाकिस्तानकडे झुकलेला अमेरिकन लंबक दहशतवादाच्या जाळ्याला नवे बळ पुरवत आहे. ‘भारताला एकटे पाडा, इस्लामाबादशी जवळीक वाढवा आणि शांतता प्रस्थापनेचे नाटक रंगवत राहा’, ही १९७० च्या दशकातली नीती पुन्हा येताना दिसते आहे ! पण आजचा भारत दुबळा राहिलेला नाही. त्याची अर्थव्यवस्था ३.९ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठत आली आहे. जगातील हा  सर्वात मोठा लोकशाही देश आज  ग्लोबल साऊथचा आधारस्तंभ आहे. भारत आमिषाला, धाकदपटशाला बळी पडणार नाहीच, तसेच तो विकलाही जाणार नाही, हा संदेश वॉशिंग्टनला पोहोचायला हवा. आर्थिक बळ, राजनैतिक हिंमत आणि अमेरिकन कक्षेपलीकडची  मित्रराष्ट्रांची आघाडी घेऊन भारताने या संकटाला बेधडक सामोरे जावे. आता काय ते होऊनच जाऊ दे, मिस्टर ट्रम्प !

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका