शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

‘हिन्दू आहोत, हिन्दुत्ववादी नाही’ हाच बिहारचा धडा

By admin | Updated: November 11, 2015 20:59 IST

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाची इतकी धूळधाण कशी झाली? जातीची समीकरणं जमविण्यात पुरेसं यश न आल्यानं, स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य न दिलं गेल्यानं

प्रकाश बाळ, (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाची इतकी धूळधाण कशी झाली? जातीची समीकरणं जमविण्यात पुरेसं यश न आल्यानं, स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य न दिलं गेल्यानं, की विरोधकांनी युती केल्यानंं निवडणुकीतील मतांचं गणित सोडवता आलं नाही म्हणून?हे आणि असेच आणखी काही घटक भाजपाच्या दारूण पराभवास कारणीभूत असतीलही, मात्र बिहारमधील मतदारारांनी भाजपाला एक धडा शिकवला आहे व तो म्हणजे, ‘आम्ही हिंदू असलो, तरी हिंदुत्ववादी नाही’! उलट मोदी यांचा झंझावात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात तयार झाला, तोच मुळात ‘तुम्ही हिंदू असणं, हा गुन्हा आहे’, असं बिगर भाजपा पक्षांनी आधीच्या काही दशकात मतदारांना वाटायला लावलं त्यामुळं! संयुक्त पुरोगामी आघाडीच्या कारभाराला विटलेल्या मतदारांपुढं विकासाचा मुखवटा चढवलेल्या मोदी यांना संघ परिवारानं उभं केलं आणि संघाचा हा खंदा प्रचारक ‘भारताचा खरा भाग्यविधाता’ आहे, असं माहिती तंत्रज्ञानाचा अतिशय कौशल्यानं वापर करून मतदारांच्या मनावर ठसविलं. मतदारांनी मोदी यांना पंतप्रधानपदावर बसवलं आणि आता ‘अच्छे दिन’ येतील, अशा अपेक्षेनं मतदार सुखावले. मात्र घडत गेलं, ते विपरीतच. मतदारांचा कौल म्हणजे आता ‘हिंदू राष्ट्रा’च्या दिशेनं पावलं टाकण्याचा मार्ग मोकळा झाला, अशी समजूत संघ परिवारानं करून घेतली. जादा रोजगार, महागाईला व भ्रष्टाचाराला आळा, गुन्हेगारांना लगाम, याऐवजी महत्व मिळताना दिसू लागलं, ते गाय, गोहत्त्या, गोमांस यालाच. गप्पा ‘डिजिटल इंडिया’च्या मारल्या जात होत्या, पण पंतप्रधानांसह सर्व जण बोलत होते, ती पुराणात व हिंदू संस्कृतीत कशी भारतीय विज्ञानाची बीजं रोवली गेली आहेत, त्याबद्दल. गोमांस खाल्याचा आरोप ठेवून माणसं मारली जाऊ लागली. दलित मुलाना जिवंत जाळल्यावर ‘कुत्र्याला दगड मारला म्हणून त्याची पंतप्रधान दखल घेणार काय?’, असं केंद्रीय मंत्री बोलू लागले. हे संघ परिवारातील परिघावरचे फुटकळ लोक आहेत, आमचं हे मत नाही’, अशी भूमिका घेतली गेली. पण ती खोटी होती. या वक्तव्यामागील विखार व विद्वेष हा हिदुत्वाचा गाभाच आहे. तीच प्रेरणा असल्यानं हे बोललं जात होतं. म्हणूनच बिहारच्या निवडणूक प्रचारात अशा प्रकारांची हद्द झाली. ‘भाजपा हरली, तर पाकमध्ये आनंदानं फटाके वाजवले जातील’, असं खुद्द भाजपाचे अध्यक्षच म्हणू लागले. अशा वाढत्या प्रकारांबाबत विविध बुद्धिवंतांनी पुरस्कार परत करण्याच्या प्रकाराला शाहरुख खान यानं पाठिंबा दर्शवल्यावर त्यानं पाकमध्ये जावं, अशी कोल्हेकुई संघ परिवारातून सुरू झाली. शाहरूख कोट्यवधी भारतीयांच्या, विशेषत: भाजपा ज्या तरूणांबद्दल सतत बोलत असते, त्यांच्या दृष्टीनं, ह्रदयाची धडकन आहे, ही साधी गोष्टही संघ परिवारानं लक्षात घेतली नाही. अशा या प्रकारांना विटलेल्या मतदारांनीच बिहारमध्ये संघ परिवाराला माती खायला लावली.वस्तुत: लोकसभा निवडणुकीतील यश ही भाजपाला मोठी सुवर्णसंधी होती. देशाची आर्थिक घडी नीट बसवण्याला प्राधान्य देऊन व त्यातून आपला प्रभाव वाढवत नेऊन २०१९ नंतर ‘हिंदू राष्ट्रा’च्या दिशेनं संघाला ठोस पावलं टाकता आली असती. उदाहरणार्थ, गाय, गोहत्त्या, गोमांस, पुराणं इत्यादीपेक्षा ‘समान नागरी कायदा’ हा मुद्दा २०१९ नंतर संघाला उचलता आला असता. त्याला बहुसंख्य हिंदूंचा पाठिंबा मिळाला असता. अनेक पुरोगाम्यांनाही अशा प्रस्तावाला पाठबळ देता आलं असतं. इतकंच नव्हे, मुस्लिमातील असंख्य प्रगल्भ घटकांना आपल्या समाजात सुधारणा करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकणं सोपं गेलं असतं. पण संघ परिवारानं हे केलं नाही. कारण हिंदुत्वाचा विचार हा सामाजिक सलोख्याऐवजी विद्वेष व विखार या पायांवरच उभा आहे.अशा परिस्थितीत बिहारमधील मतदारांनी जी चपराक दिली आहे, ती भाजपाला सुवर्णसंधी ठरू शकते. त्यासाठी या पक्षाला संघाशी असलेली नाळ तोडणं अपरिहार्य आहे. संघाचं हिंदुत्व हिंदू समाजाला मान्य नाही, हे परत एकदा सिद्ध झालं आहे. केवळ विरोधकांच्या मतभेदांना खतपाणी घालून निवडणुकीतील मतांची गणितं जमवून भाजपाला सत्ता मिळवता आली, तरी संघाची राजकीय आघाडी म्हणून ‘हिंदू अजेंडा’ राबवण्याचा प्रयत्न या पक्षानं केल्यास काय होऊ शकतं, ते बिहारमधील मतदारांनी दाखवून दिलं आहे. भारतीय राजकारणात ‘उजव्या प्रवृत्तीच्या, पण मध्यममार्गी’ पक्षासाठी राजकीय अवकाश आहे. ती जागा भाजपा व्यापू शकतं आणि आपल्या विरोधकांना यशस्वीपणं तोंडही देऊ शकतं. मात्र संघाशी नाळ तोडली, तरच हे शक्य आहे. दुसऱ्या बाजूस भाजपा विरोधकांसाठीही बिहार ही सुवर्णसंधी आहे. ‘बिगर काँगे्रसवादा’चा आधार घेऊन संघानं प्रथम जनसंघ व नंतर भाजपामार्फत विरोधकांची आघाडी उभी करून टप्प्याटप्प्यानं दिल्लीची सत्ता काबीज केली. सत्तेत वाटा देण्याचं आमीष संघानं काँगे्रसच्या विरोधकांना दाखवलं. आता काँगे्रसला याच पद्धतीनं भाजपा विरोधात एकजूट घडवून आणावी लागेल. त्यासाठी पूर्वअट आहे, ती ‘आपण नैसर्गिक सत्ताधारी पक्ष राहिलेलो नाही’, याची जाण काँगे्रसला येण्याची. विविध राज्यातील प्रभावशाली पक्षांशी हातमिळवणी करून आणि त्यांना प्राधान्य देऊन काँगे्रसनं ही आघाडी उभी करण्याची गरज आहे. मात्र एकत्र येण्याचं कारण केवळ ‘सत्ता’ हे असता कामा नये. राजकारणात सत्ता हवीच. एकत्र येण्याचा फायदा सत्ता मिळण्यात होईलच. पण ‘हिंदुत्ववादा’च्या विद्वेषी व विखारी विचासरणीच्या विळख्यातून देशाला सोडवण्याची आवश्यकता आहे, ही अशा एकजुटीमागची प्रेरणा असायला हवी. त्यासाठी ‘आपण गेली साडेतीन दशकं ज्या चुका केल्या, त्यामुळंच हिंदुत्ववाद्यांच्या हाती सत्ता गेली’, हेही सर्व बिगर भाजपा राजकीय पक्षांनी प्रामाणकिपणं जाहीररीत्या मान्य करण्याची गरज आहे.बिहारच्या निवडणुकीचा हाच खरा धडा आहे.