शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

माणसासमोर आरसा धरणारे सरते वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 02:19 IST

- विजय दर्डा  ‘अहंभाव’ मिरवणाऱ्या माणसाला या वर्षाने भानावर आणले ! आनंदाची गोष्ट हीच की, या वर्षाने घेतलेल्या परीक्षेत ...

- विजय दर्डा 

‘अहंभाव’ मिरवणाऱ्या माणसाला या वर्षाने भानावर आणले ! आनंदाची गोष्ट हीच की, या वर्षाने घेतलेल्या परीक्षेत माणूस म्हणून आपण उत्तीर्ण झालो !

माणसाने आपल्या सोयीसाठी कॅलेंडर निर्माण करून काळाची विभागणी वर्ष, महिने, दिवस, तास, मिनिटे आणि सेकंदात केली असली तरी प्रत्यक्षात कालगतीचे फक्त तीनच संदर्भ असतात - जो निघून गेला तो भूतकाळ, आपण  अनुभवत असतो तो वर्तमान  आणि ज्याच्या उदरात काय असेल याबद्दल आपण सदैव अनभिज्ञ असतो तो भविष्यकाळ ! आज हे नकोसे वर्ष सरत आलेले असताना मागे वळून पाहणे सोपे नाही. संपूर्ण जगाला जणू मृत्यूच्या खाईत ढकलून देणारे एक विचित्र वर्ष होते ! मानवाचे धैर्य आणि चिकाटीची परीक्षा पाहणारा  काळ होता. पण  सर्जनशीलतेचा आणि कालानुरूप परिवर्तनाचाही हा काळ होता.

२०२०च्या सुरुवातीला नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी आपण पायघड्या घातल्या होत्या. नव्या वर्षाच्या प्रारंभी काही नवे घडेल, जगण्याची रीत बदलेल असे वाटते. मात्र २०२०च्या सुरुवातीला एका अज्ञात विषाणूने चीनमध्ये शिरकाव केल्याच्या वार्ता कानी पडू लागल्या होत्या, काहीतरी विचित्र घडते आहे याची चाहूल लागली होती; पण अख्खे वर्षच जगासाठी इतके भयावह असेल असे मात्र कुणालाच वाटले नव्हते. जगभरातल्या लाखो लोकांचे बळी घेऊन हा विषाणू महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही थेट गुडघे टेकायला लावील, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. पण बघता बघता चित्र बदलू लागले.  

चार भिंतीत कोंडून घेण्याशिवाय  दुसरा पर्याय राहिला नाही.  रुग्णालये भरून गेली, रुग्णांसाठीच्या खाटा कमी पडू लागल्या. मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी स्मशानभूमी आणि दफनभूमीत जागा अपुरी पडू लागली. हा हाहाकार सर्वत्र सुरू असताना ना जाणे कुठून माणसाच्या कानी काळाची हाक आली : सोडा ते भय आणि उभे राहा खमकेपणाने ! सामना करा संकटाचा, हिम्मत दाखवण्याची हीच तर खरी वेळ आहे ! बघता बघता कोरोनायोद्ध्यांची फळीच्या फळी मैदानात उतरली. त्यांनी दाखवलेली हिंमत पाहून भयाचे सावट हलके हलके ओसरू लागले. या परिस्थितीत जी जिगर  दाखवून या कठीणकाळात माणसांनी एकमेकांना सांभाळले, ते सारेच केवळ अलौकिक असेच होते. याच दरम्यान एका ज्येष्ठ उद्योगपतींशी माझी भेट झाली. त्यांनी विचारले, ‘काय म्हणता? कसे चालले आहे तुमचे वर्तमानपत्र ?- मी म्हटले, ‘‘परिस्थिती वाईट आहे, आम्ही तगून राहण्यासाठी संघर्ष करतो आहोत !’ गप्पांच्या ओघात त्यांनी एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, हे व्यवसाय करण्याचे नव्हे, जिवंत राहण्याचे वर्ष आहे ! सध्या तगून राहाल, तर भविष्य तुमचेच असेल !

कोरोनाच्या  काळात आपण सेवा आणि चिकाटीच्या अनेक सृजनांचा अनुभव घेतला. आपल्या जिवाची पर्वा न करता सेवारत राहिलेले पोलीस, पत्रकार, डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयांत काम करणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांच्या कामाला  दाद देणे आपले कर्तव्य आहे. यातल्या काहीना तर मृत्यूनेही गाठले. सुरुवातीच्या टप्प्यात शासकीय यंत्रणेमध्ये घोळ  दिसला हे खरे; पण त्यानंतर मात्र सरकारने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि ज्या कर्तव्यदक्षतेने परिस्थिती हाताळली, त्याला तोड नाही. रस्त्यांवरून पाय ओढत माघारी निघालेल्या मजुरांना जसे आपण पाहिले तसेच या असहाय बांधवांना मदत करण्यासाठी धावून आलेले फरिश्तेही याच काळाने आपल्याला दाखवले.  मजुरांसाठी ठिकठिकाणी अन्नछत्रे उघडून त्यांच्या भाजीभाकरीची व्यवस्था करण्यासाठी धडपडणाऱ्या संस्था या काळात सर्वत्र उभ्या राहिलेल्या दिसल्या.

आपल्या वडिलांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सायकलवरून १२०० किलोमीटरचा रस्ता पार करणाऱ्या बहादूर कन्येच्या निर्धाराची  तडफही याच काळात आपण पाहिली. याच कठीणकाळात जगभरातल्या वैज्ञानिकांनी एकत्र येत कोरोनाविरोधी लसीच्या निर्मितीसाठी स्वतःला  वाहून घेतले. तात्पर्य हे की, जीवघेणे संकट घोंघावू लागते तेव्हा अख्खी मानवजात  त्याच्याशी दोन हात करण्यासाठी जिद्दीने सारे सामर्थ्य एकवटून उभी राहाते हेच या कोरोनाकाळात माणसाने दाखवून दिले. संकटसमयी माणसाने निडर आणि अविचल राहणेही तितकेच महत्त्वाचे असते. 

वैयक्तिक बाबतीत सांगायचे, तर हे दिवस निभावून नेणे सोपे नव्हते ! माझ्या लोकमत कुटुंबात ३७७१ सदस्य आहेत. या सर्वांना धीर देणे, त्यांच्या मनातले  भय निपटून काढणे हे एक आव्हानच होते ! आज आपण एकत्र आणि तगून राहिलो, तर उद्याचा दिवस आपलाच असेल, फक्त या कठीणकाळात आपण खंबीर राहिले पाहिजे; हे यातल्या प्रत्येकाला सांगणे ही माझी जबाबदारी होती ! तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मी लोकमत परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीच्या निकट संपर्कात राहिलो. आप्त व इष्टमित्रांशी असलेले माझे नाते अधिक दृढ केले. फुरसतीच्या वेळेत पेंटिंगमध्ये रमलो, कविता केल्या, गीते रचली. माझ्यातल्या सर्जनशीलतेला आव्हान देत मी माझ्या रिकाम्या दिवसांमध्ये अर्थ भरीत राहिलो. हा अनुभव अर्थातच अनेकांचा असेल ! प्रत्येकानेच आपापल्या परीने उपाय शोधले आणि निराशेचा अंमल मनावर  चढू न देता कोरोनाशी दोन हात केले.  

सरत्या वर्षाने आपल्याला बरेच काही शिकवलेही आहे. कोरोनापूर्व काळात अनेक सरकारी मोहिमांचे आयोजन करूनही हातांच्या स्वच्छतेत बहुतेक लोकांना स्वारस्य असल्याचे कधीच दिसले नाही. कोरोनाने परिस्थिती बदलली. आज प्रत्येकजण दिवसांतून अनेकवेळा हात धुताना दिसतो. स्वच्छतेविषयीची ही सजगता २०२०ची सर्वांत मोठी भेट म्हणावी लागेल. काही महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे निसर्गाला पुन्हा पल्लवित आणि पुष्पभारीत होण्याची संधी मिळाली. शहरांतून प्रदूषण गायब झाले. नभांगण इतके नितळ झाले की शेकडो मैलांवरून हिमालयाच्या पर्वतरांगा दिसू लागल्या. पण दुर्भाग्य पाहा ! - लॉकडाऊन संपताच निसर्गाची धूळधाण करण्याचे आपले काम आपण पुन्हा सुरू करूनही टाकले.

कचरा फेकणारे, कचरा जाळून हवा प्रदूषित करणारे, झाडे तोडणारे, पशु-पशुपक्ष्यांच्या जिवावर उठणारे लोक अपराधी आहेत. त्यांच्याबरोबरच प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या उद्योगांच्याही मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजेत.  मला तर वाटते, कोरोनानंतरही दरवर्षी एका आठवड्याचा लॉकडाऊन लावून सगळे व्यवहार सक्तीने बंद केले पाहिजेत ! निसर्गाला श्वास घ्यायला थोडी उसंत तरी मिळेल !भारतीय संस्कृती आणि शिष्टाचार किती महत्त्वाचे आहेत, हेही या सरत्या वर्षाने अवघ्या जगाला शिकवले आहे. हात जोडून स्वागत करणे, नमस्कार करणे हे भारतीय रिवाज म्हणजेच खरे  ‘सोशल डिस्टन्सिंग’ ! आता जगभरातले लोक हात जोडूनच परस्परांना अभिवादन करू लागले आहेत. किती शिकवले आपल्याला या वर्षाने ! निसर्गावर कुरघोडी केल्याचा ‘‘अहंभाव मिरवणाऱ्या माणसासमोर या वर्षाने आरसा धरला, हे बरेच झाले म्हणायचे ! निसर्गाच्या अमर्याद जादुई शक्तीसमोर आपली लायकी काय आहे, हे माणसाला कळले तरी !.. 

पण आनंदाची गोष्ट ही, की या वर्षाने घेतलेल्या परीक्षेत माणूस म्हणून आपण पुन्हा एकवार उत्तीर्ण झालो ! म्हणून म्हणतो, स्वतःची आणि एकमेकांची  काळजी घ्या, मजेत- आनंदात राहा ! नवी स्वप्ने, नव्या आशा घेऊन आलेले नवे वर्ष आपल्या उंबरठ्यावर उभे आहे ! नववर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! (लेखक लोकमत मीडिया समुहाचे चेअरमन आहेत) 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLokmatलोकमत