शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यलढ्याला चालना देणारे हत्याकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 05:57 IST

दूरदर्शन आणि सोशल मीडिया या दोन्ही गोष्टी जर विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच अस्तित्वात असत्या तर भारत हे राष्ट्र १९४७ ऐवजी त्याअगोदर २५ वर्षे स्वतंत्र झाले असते.

>> व्यंकय्या नायडू, उपराष्ट्रपती

दूरदर्शन आणि सोशल मीडिया या दोन्ही गोष्टी जर विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच अस्तित्वात असत्या तर भारत हे राष्ट्र १९४७ ऐवजी त्याअगोदर २५ वर्षे स्वतंत्र झाले असते. १३ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाची भीषणता एवढी जबरदस्त होती की त्यामुळेच भारताच्या स्वातंत्र्याची निश्चिती झाली असती. त्या हत्याकांडाची भीषणता एक महिन्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांना समजल्यावर त्यांनी त्याच्या निषेधार्थ स्वत:ला मिळालेला सरदार हा सन्मान परत केला होता. शंभर वर्षांपूर्वी याच दिवशी वसाहतवाद्यांनी स्वत:ची तथाकथित तेजोमय सत्ता निर्दयी पद्धतीने कलंकित केली. अमृतसर येथील जालियनवाला बागेच्या २०० बाय २०० यार्ड परिसरात जमलेल्या शेकडो निष्पाप भारतीयांवर ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर या ब्रिटिश अधिकाऱ्याने आपल्या पलटणीला गोळीबार करण्याचा हुकूम दिला. ही माणसे बैसाखी उत्सवासाठी एकत्रित झाली होती आणि त्यांच्या सत्यपाल आणि डॉ. सैफुद्दीन किचलू या दोन नेत्यांना बंदी करून तुरुंगवासात टाकल्याचा निषेधही करीत होती.

तेथे जमलेल्या गर्दीला तेथून निघून जाण्याची संधी न देता बागेचे मुख्य दार अडवून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. ब्रिटिश सैनिकांच्या बंदुकीतल्या गोळ्या संपल्यावरच गोळीबार बंद झाला. गोळीबार सुरू होताच लोक पळू लागले तर काहींनी आत्मसंरक्षणासाठी परिसरात असलेल्या विहिरीत उड्या टाकल्या! त्या गोळीबारामुळे उडालेल्या गोंधळात एका सहा महिन्यांच्या बालकासह शेकडो लोक मारले गेले. त्या गोळीबाराच्या खुणा आजही त्या परिसरातील इमारतीच्या भिंतींवर जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.

जालियनवाला बाग घटनेला एक संदर्भ होता. वास्तविक भारताने पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सत्तेला सहकार्य करीत लढाईसाठी मनुष्यबळ आणि शस्त्रास्त्रे पुरविली होती. भारतात मर्यादित स्वायत्तता मिळावी हा त्यामागचा हेतू होता. पण वसाहतवादाविरुद्धची लढाई बंगाल आणि पंजाब या प्रांतात सुरूच होती. स्वातंत्र्यलढ्यात ही दोन राज्ये आघाडीवर होती. स्वातंत्र्य चळवळीवर अंकुश ठेवण्यासाठी लोकांच्या राजकीय व मुलकी हक्कावर निर्बंध आणण्यासाठी १९१५ साली डिफेन्स आॅफ इंडिया अ‍ॅक्ट मंजूर करण्यात आला होता. जर्मन व बोल्शेव्हिक क्रांतिकारकांसोबत असलेले भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचे संबंध शोधून काढण्यासाठी ‘राजद्रोही विरोधी’ समितीची स्थापना ब्रिटिश न्या. मू. सिडनी रौलट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती. त्यानंतर लोकांवर दडपशाही करणारा रौलट अ‍ॅक्ट १९१९ हा कठोर कायदा लादण्यात आला. त्याचा निषेध करणाºया अमृतसर येथील नागरिकांना गुडघ्यावर रांगण्यास भाग पाडले होते. मौंटग्यु चेम्सफोर्ड यांनी १९१७ मध्ये केलेल्या राजकीय सुधारणा भारतीय नेतृत्वाला पुरेशा वाटल्या नाहीत. त्यामुळे लोकांच्या असंतोषात भरच पडली होती.

भारतावर दडपशाहीने राज्य करता येणार नाही याची जाणीव झाल्याने ब्रिटिश सरकारने काही प्रगतिशील आणि प्रशासकीय सुधारणा अमलात आणल्या. ब्रिटिश सरकार हे न्याय, योग्य वागणूक आणि समतेने राज्य करण्यास बांधील आहे हे लोकांना पटवून देण्यासाठी प्रयत्न केले जात होते. जालियनवाला बागची घटना घडण्यापूर्वी समाजातील नेमस्त नेते लोकांना प्रशासनात अधिक वाटा मिळावा यासाठी प्रयत्नशील होते.

अमृतसर येथील बंदिस्त बागेत घडलेल्या निर्दयी कृत्याने लोकांचा ब्रिटिशांवरचा विश्वास उडून गेला. तोवर लोकांना इंग्रज माणूस हा उदार, न्याय देणारा वाटत होता. तो त्यांना एकदम रक्तपिपासू हैवान वाटू लागला. लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी जनरल डायरने गोळीबाराचा आदेश दिला, पण तो ब्रिटिश सरकारवरच उलटला. सरकारने देशभर राज्य करण्याचा न्याय्य हक्कच त्यामुळे गमावला. ब्रिटनचे युद्धमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी त्या कृत्याची गणना ‘राक्षसी’ अशीच केली. तर तेव्हाचे ब्रिटनचे पंतप्रधान हिज हायनेस अ‍ॅस्क्विथ यांनी ‘आपल्या इतिहासातील अत्यंत लज्जास्पद कृत्य’ असे त्या घटनेचे वर्णन केले. हाउस आॅफ कॉमन्समध्ये ८ जुलै १९२० रोजी त्या विषयावरील चर्चेत भाषण करताना चर्चिल यांनी त्या घटनेचे वर्णन करताना म्हटले, ‘‘तेथे जमलेली माणसं नि:शस्त्र होती आणि ती कुणावर हल्लाही करीत नव्हती. त्यांच्यावर गोळीबार सुरू होताच जमाव पळू लागला, पण लंडनच्या ट्रॅफल्गर स्क्वेअरपेक्षा कमी असलेल्या जागेतून जमाव पळत असताना एकाच गोळीने तीन ते चार लोक मारले जात होते. गोळ्यांचा मारा चुकविण्यासाठी लोक जमिनीवर झोपले तर त्यांच्या दिशेने गोळ्या चालविण्यात आल्या. हा प्रकार सतत आठ ते दहा मिनिटे सुरू होता.’’ त्यानंतर सभागृहाने २४७ विरुद्ध ३७ मतांनी डायरला दोषी ठरवून त्याला सेवेतून बडतर्फ केले. पण हाउस आॅफ लॉर्ड्सने मात्र डायरचे कौतुक केले!

जालियनवाला बाग हत्याकांडामुळे ब्रिटिश सत्ता भारतातून जाण्यासाठी केल्या जाणाºया प्रयत्नांना वेग आला. त्यातूनच असहकाराची चळवळ, इंडियन नॅशनल आर्मीची निर्मिती आणि भारत छोडो आंदोलन होऊन देश स्वतंत्र झाला. शंभर वर्षांपूर्वी देशासाठी प्राणार्पण करणाºया जनतेविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करू या. त्यांच्यामुळेच आज आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. नवभारताची निर्मिती करण्याचा प्रयत्न करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.