शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘हे जरा अतीच होते..’

By admin | Updated: June 26, 2014 09:50 IST

प्रीती झिंटा आणि तिचा आठ वर्षे जुना माजी मित्र, प्रियकर किंवा रखवालदार नेस वाडिया हे वर्तमानपत्रांच्या चर्चेचे विषय नाहीत. अग्रलेखाचे व्हावे एवढे तर ते नाहीच नाहीत.

प्रीती झिंटा आणि तिचा आठ वर्षे जुना माजी मित्र, प्रियकर किंवा रखवालदार नेस वाडिया हे वर्तमानपत्रांच्या चर्चेचे विषय नाहीत. अग्रलेखाचे व्हावे एवढे तर ते नाहीच नाहीत. त्यामुळे हा त्यांच्यावरचा लेख नाही. त्यांच्या निमित्ताने देशभरच्या आंबटशौकिनांचे कुतूहल जागविण्याच्या व शमविण्याच्या प्रसिद्धी माध्यमांनी चालविलेल्या चाळ्यांविषयीचा तो आहे. मुळात प्रीतीचे नटी असणे संपले आहे. तिचे सिनेमे जीव धरत नाहीत. सिनेमे नाहीत म्हणून ती क्रिकेट या गर्दीभरू व गल्लाभरू खेळात उतरली. आयपीएल नावाच्या गौडबंगालात तिने कुठलीशी चमू विकत घेतली. ती आरंभी जिंकत होती; पण नंतरच्या काळात तिच्या सिनेमांसारखीच तीही पडत राहिली. या चमूच्या खेळाडूंमध्ये जीव आणण्यासाठी तिने तर्‍हेतर्‍हेच्या गमती केल्या. त्यांना भर मैदानावर मिठय़ा मारल्या, त्यांच्या सोबतची छायाचित्रे छापून आणली, पण सिनेमांसारखेच तिचे हे खेळही पडतच राहिले. तिच्याविषयीचे राहिलेले जुने कुतूहल तेवढे एकच. नेस वाडिया नावाच्या अब्जाधीश उद्योगपती दोस्ताचे व तिचे एकत्र राहणे आणि बागडणे. लिव्ह इन रिलेशनशिपविषयी जिज्ञासा असलेल्या अनेकांना त्यांचे एवढय़ा वर्षांचे जिणे भावले.  बिनालग्नाची ही रिलेशनशिप तिच्या सगळ्या सौंदर्यानिशी आणि उन्मादानिशी टिकते म्हणजे काय? आणि ती तशी टिकलीच असेल, तर त्या टिकण्याचे रहस्य कोणते? हे अशी आंबट चर्चा करणार्‍यांचे प्रश्न. माध्यमांना काय, कशाचाही बाजार करणे हाच त्यांचा धंदा आणि तोच त्यांचा गुणविशेष. मग प्रीती आणि तो नेस इथे दिसले, तिथे लपले, इकडे उगवले, तिकडे मावळले.. अशाच बातम्या..  सिनेमा संपला, क्रिकेट कोरडे झाले मग याच बातम्यांनी लोकांना चाळवायचे.. आणि एक दिवस बातमी आली, या प्रीतीने त्या नेसविरुद्ध चक्क ‘अतिप्रसंगाची’ तक्रार (तीही प्रथम) वर्तमानपत्रात आणि नंतर पोलिसात केली. आपल्या पोलीस खात्यालाही प्रसिद्धीचे वेड आहे. ते दाभोळकरांचे खुनी शोधत नाहीत. त्या मुस्लिम तरुणाचा खून करणारे पकडत नाहीत, नक्षल्यांविरुद्ध त्यांच्या बंदुका चालत नाहीत पण त्याला प्रसिद्धी हवी आहे. अशावेळी प्रीती झिंटा ही कुतूहलाचा विषय असलेली नटी त्यांच्या हाती लागली. मग तिचे पहिले बयाण, दुसरे बयाण, विदेशात भ्रमंती करून आल्यानंतरचे बयाण, वानखेडे स्टेडियमवरचे बयाण आणि अखेर ते सोडल्यानंतरचे बयाण. महाराष्ट्राची सारी पोलीस डायरी भरावी एवढी एकट्या झिंटाचीच बयाणे. त्यातले एका दिवशी त्या नेसच्या वकिलाने सांगितले, की प्रीतीच्या आरोपात ‘लैंगिक आक्रमणाचा’ उल्लेख नाही. स्वाभाविकच त्यामुळे अनेकजण नाराज झाले. ‘ते’ नसेल तर एवढय़ा सार्‍या घोळात गंमत कसली व हा त्या बिचार्‍यांना पडलेला सरळ व साधा प्रश्न. दुसरा प्रश्न, मग ही तक्रार आहे तरी कशाविषयीची हा. नुसतीच शब्दांची देवघेव, शिवीगाळ, हातापाई, ओढाताण, धक्काबुक्की वा तसलेच काही असेल ‘तर त्यात काय मेले तक्रार करण्यासारखे?’ असा त्यांचा प्रश्न. पोलीसही असे वस्ताद, की ते बयाणे घेतल्याचे सांगतात, त्यात काय आहे ते नेमके सांगत नाहीत. ते न सांगितल्याने या प्रकरणाचा टीआरपी वाढतो असे त्यांना स्वाभाविकपणेच वाटत असणार. आमची बोलभांड वर्तमानपत्रेही तशीच. ती रकानेच्या रकाने या ‘नसलेल्या’ बातमीला देतात.. देशात एवढे सारे घडले, अजून घडत आहे आणि पुढेही घडण्याचे संकेत आहेत पण त्यांना जागा नाही. झिंटाला जागा आहे. त्या नेसलाही ती आहे. पण देशाला जागा नाही. समाजाला जागा नाही. ‘मात्र हा देश आणि समाज असे सारेच मिळून प्रीतीच्या बातम्या वाचत असतील तर?’ हा एका नव्या बातमीदाराचा प्रश्न. असे प्रश्न नवशिक्यांना आणि आंबटशौकिनांनाच पडतात.  पण तेही देशाचे नागरिक आहेत आणि त्यांनाही प्रत्येकी एक मत देण्याचा आणि हव्या त्या बातम्या वाचण्याचा हक्क घटनेने दिला आहे. सबब, प्रीतीचे प्रकरण लांबणार. तो नेस त्यात ओढला आणि भरडला जाणार. माध्यमांची चांदी होणार आणि तरीही त्यातून स्त्री हक्क, स्त्रियांचे सबलीकरण आणि स्त्रियांचा सन्मान वाढणार असे समजणारे समजणार.. तर हाणा, मुक्ती मिळवा आणि आपले शौक पुरवा. माध्यमांनो, तुम्हा आपला टीआरपी वाढवा, मात्र त्यासाठी देश आणि समाज यांना माध्यमांत मिळणारी जागा तेवढी बळकावू नका. कारण, त्यांच्याही सबलीकरणाचा व सशक्तीकरणाचा प्रश्न आपल्यासमोर आहे. प्रीती झिंटाचे बळ वाढवून स्त्रियांचे सबलीकरण होते असे ज्यांना वाटते त्यांच्याविषयीचा पूर्ण आदर मनात राखूनही हे सांगायचे की, ‘बाबांनो, हे जरा अतीच होते.’