-द्वारकानाथ संझगिरी
अत्यंत जड अंत:करणाने मी हा लेख लिहितोय. पराभूत धोनी पाहताना त्यादिवशी खूपच वाईट वाटत होतं. कारण तसं त्याला कधी फारसं पाहिलेलंच नाही. त्यामुळे धोनीने आयपीएल खेळण्याचा पुनर्विचार करावा, असं कुठे तरी मनात येऊन गेलं. सचिननंतर जर कुणी एखादा खेळाडू तरुणांना आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवायचा असेल तर तो धोनी आहे. त्याची कथा ही अस्स्सल ‘रँगज टू रीचेस स्टोरी’ आहे. कुठे रेल्वे स्टेशनवरचा तिकीट चेकर आणि कुठे दोन वर्ल्डकप जिंकून देणारा भारताचा कर्णधार आणि क्रिकेट रसिकांच्या गळ्यातला ताईत! प्रसंग कितीही बाका असो, बर्फालाही त्याच्याकडून थंडपणा घ्यावासा वाटावा असा थंड. मैदानावर आणि मैदानाबाहेर सहसा वाद-विवाद नाही ! वनडे आणि टी-ट्वेन्टीमध्ये, जागतिक दर्जाचाच नाही, तर ऑलटाइम ग्रेटमध्ये जाऊन बसावा असा परफॉर्मन्स. आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधल्या इतिहासातला तो सर्वोत्कृष्ट कर्णधार. कॅप्टन कुल! अशा माणसाला त्याच्या आयपीएल खेळण्याबद्दल पुनर्विचार करायला सांगताना मनावर दगड ठेवावा लागतो. आयपीएल २०२० मध्ये धोनी हा धोनी वाटलाच नाही. हिंदी चित्रपटाच्या डॉयलॉगच्या स्टाइलमध्ये सांगायचं तर, ‘कोई बहेरूपीया धोनी की जगह पर खेल रहा था..’ असंच काहीतरी वाटत होतं. आयुष्यात सर्वोच्च स्थानावर असताना योग्यवेळी कार्य संपवणं हे सर्वांनाच जमत नाही. ते ज्ञानेश्वरांना जमलं. ते नेल्सन मंडेलांना जमलं. सत्तावीस वर्ष तुरुंगवास ! मग देशाचा अध्यक्ष होणं आणि तहहयात अध्यक्ष राहायची शक्यता असताना निवृत्त होणं.. अखेरीस सर्वसामान्य माणसासारखं निवांत निवृत्त आयुष्य जगणं. सगळंच ग्रेट. क्रिकेटमध्ये सर डॉन ब्रॅडमनबद्दल तसं म्हणता येईल. १९४८ साली सर डॉन ब्रॅडमन ऑस्ट्रेलियाचे कर्णधार होते. त्या ॲशेश सिरीजमध्ये ते एकही काउंटी मॅचसुद्धा हरले नाहीत. पाच कसोटीपैकी चार कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकल्या. स्वत: ब्रॅडमनने वयाच्या ४०व्या वर्षी ७२च्या सरासरीने नऊ डावात ५०८ धावा केल्या. त्यात दोन शतकं ठोकली. आणि तरीही निवृत्त झाले. निवृत्त होताना ते शेवटच्या डावात शून्यावर बाद झाले. त्यामुळे त्यांची सरासरी ९९.९४ अशीच झाली. ते भारतीय असते तर ‘खास लोकाग्रहास्तव’ त्यांना आणखी एक कसोटी खेळवून सरासरी १०० करायला लावली असती. ९९.९४च्या कड्यावर आयुष्यभर लटकून राहायला त्यांना दिलं गेलं नसतं. त्यानंतर फार कमी जणांना ते जमलं.