शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

गोलंदाज जेव्हा गुलामगिरीच्या साखळ्या भिरकावून देतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 04:45 IST

फलंदाजांच्या बॅटची हुकमशाही झुगारणारे बंडखोर गोलंदाज मला प्रचंड भावतात. त्यामुळेच जाणवतं की तुटपुंजी का होईना, क्रिकेटमध्ये लोकशाही अस्तित्वात आहे.

- द्वारकानाथ संझगिरी, चित्रपट-क्रीडा समालोचकआयपीएल ट्वेन्टी ट्वेन्टीमधले फटके पाहताना माझ्या डोळ्यात गोलंदाजांसाठी दोन अश्रू उभे राहतात. टी-ट्वेन्टीमधली नियमांची सर्व सुखं ही फलंदाजांच्या पारड्यात टाकली गेली आहेत. सीमारेषा इतक्या छोट्या, की फुंकर मारलेले फटके षटकार होतात. शिवाय बाउन्सरवर नियंत्रण. लेग साइड वाइड बॉल आणि चांगला चेंडू यातली सीमारेषा तर सुईच्या जाडीएवढीसुद्धा नाही. नो बॉलला नुसती धावच नव्हे, वर बाद न व्हायचं वरदान, शिवाय फ्री हिटचा बोनस! क्षेत्ररचनेवरची बंधनं ही तर मूलभूत विषमता! बॅटचा दर्जा इतका वाढलेला, की पूर्वीचे फलंदाज मोरपिसाने खेळत होते, असं वाटतं. बॅटला स्पर्श झाला की चेंडू सीमापार जायला आसुसलेला; पण तशी सुधारणा चेंडूत मात्र नाही. त्यामुळे सध्या फलंदाज जमीनदार आणि गोलंदाज वेठबिगार! पण गोलंदाज गुलाम म्हटले तरी त्यांना मिळणारे पैसे जमीनदारांचे डोळेसुद्धा चमकवू शकतात.

यंदा नव्याने विकत घेतलेल्या खेळाडूंमध्ये सर्वात महागडा खेळाडू आहे पॅट कमिन्स. त्याची किंमत १५.७५ कोटी. सुनील नरेनची किंमत १२.५० कोटी. त्याचा चेंडू नेमका कुठे वळणार हे शेवटपर्यंत चेंडूलासुद्धा माहीत नसतं. राशीद खान हा नऊ कोटीचा ‘गुलाम’ आहे. मुंबई संघाने नाथन कुल्टरनाईनला आठ कोटीला खरेदी केलंय. पण अजून वापरल्याचं आठवत नाही. पीयूष चावला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून शेकडो मैलावर; पण चेन्नईने त्याला ६.४५ कोटीला विकत घेतलाय. याचं कारण असं की, फलंदाजांनी कितीही षटकार चढवले, तरी शेवटी जिंकायला गोलंदाजच लागतात.
आयपीएलचं ब्रीद आहे, करमणूक, करमणूक आणि करमणूक! सामान्य जनतेसाठी ही करमणूक म्हणजे काय? तर उंच उंच फटके. माझ्यासारख्यांसाठी करमणुकीमध्ये बोल्टचा स्विंग होणारा चेंडू, आर्चर किंवा रबाडाचा भस्सकन उसळलेला चेंडू, राशीद खानचा फलंदाजांना न कळलेला गुगली वगैरे गोष्टीसुद्धा येतात. आणि क्षेत्ररक्षणसुद्धा! माझ्यासाठी ही सर्वोच्च करमणूक आहे. एकतर शारजाचं मैदान आणि तिथली खेळपट्टी जणू गोलंदाजांची वैरी ! सर्वत्र दवामुळे गोलंदाजांना चेंडू ग्रीप करणं कठीण जातं. बघता बघता यॉर्करचा फुलटॉस किंवा बिमर होऊन जातो. एकच चांगली गोष्ट म्हणजे अबूधाबीला चेंडू थोडा स्विंग वगैरे होतोय. त्याचा फायदा बोल्ट वा बुमराहसारखे चांगले वेगवान गोलंदाज उठवतात. त्यांनी गुलामगिरीच्या साखळ्या तोडताना वेगवेगळे चेंडू शोधून काढलेत. बाउन्सरच्या जोडीला स्लोअर बाउन्सर आला, यॉर्करच्या जोडीला स्लोअर यॉर्कर आला, लेंथ बॉलला तडीपारची शिक्षा मिळते म्हटल्यानंतर त्यांनी यॉर्करचा सराव केला. गेल्या दहा वर्षात वेगवेगळे चेंडू जन्माला आले.
मला सगळ्यात कौतुक फिरकी गोलंदाजांचं आहे. ऐंशीच्या दशकात फिरकी गोलंदाजांना ‘वनडे के अंगने में तुम्हारा क्या काम है?’ म्हणत ! आता टी-ट्वेन्टीत तर लेग स्पिन गुगली गोलंदाजांचा सुळसुळाट आहे. राशीद खान, चहल, गोपाळ, बिष्णोई वगैरे वगैरे. चक्क पीयूष चावलालासुद्धा कोटी कोटी दिलेत. मधल्या षटकांसाठी हे उपयुक्त ठरतात. राशीद खानला, विसाव्या षटकात आणायच धाडसही मी करेन. मेडन स्पेशालिस्ट बापू नाडकर्णी यांना मी एकदा गंमतीत म्हटलं होतं, ‘आजचा एक महान फलंदाज मला असं म्हणाला की, बापू नाडकर्णी आम्हाला मेडन षटकं टाकू शकले नसते. एक तर आम्ही त्यांना फोडून काढलं असतं किंवा बाद झालो असतो.’
बापू हसले आणि म्हणाले, ‘अरे, ते बाद झाले असते. कारण गोलंदाज काही रेम्या डोक्याचा नसतो. तोही विचार करतो. मी जर आजच्या काळात खेळत असतो तर मीसुद्धा फलंदाजाप्रमाणे विचार करून त्याप्रमाणे माझ्या गोलंदाजीत बदल केले असते.’ खरंय हे..! मला मॅग्रा, अक्रम, मार्शल, बोथम, हेडली, कपिल वगैरेंनी आजच्या टी ट्वेंटीत कशी गोलंदाजी टाकली हे पहायला आवडलं असतं. अरे बुमराह नाही का आपल्याला ह्यातून मिळाला. आईपीएल ते टेस्ट हा प्रवास त्याने किती सहज केला!
क्रिकेटमध्ये गोलंदाज हे दुय्यम नागरिक ! गोलंदाजांमध्ये मूठभर लिजंड झाले; पण त्यांची संख्या फलंदाजांएवढी नाही. पण म्हणून आयपीएल पाहताना मी षटकार एन्जॉय करत नाही असं नाही ! उलट एखाद्या वॉशिंग्टन सुंदरने नव्या चेंडूंने पॉवरप्लेमध्ये टाकलेला स्पेल किंवा राशीद खानचा फलंदाजांना बेड्या ठोकणारा स्पेल, उसळत्या चेंडूवर रबाडा, आर्चर किंवा कमिन्सने उडवलेली भंबेरी पाहताना मला तितकाच आनंद होतो. कारण कुठेतरी या दुय्यम नागरिकांनी डोकं वर काढून हुकूमशाहीला आवाज दिला असं मला वाटतं. फलंदाजांच्या बॅटची हुकमशाही झुगारणारे बंडखोर गोलंदाज मला प्रचंड भावतात. त्यामुळेच जाणवतं की तुटपुंजी का होईना, क्रिकेटमध्ये लोकशाही अस्तित्वात आहे.

टॅग्स :IPL 2020IPL 2020