शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 06:19 IST

लेवोटोबी पर्वतरांगांमधील लाकी-लाकी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे अवकाशात तब्बल १० हजार फूट उंचीपर्यंत राख व धूर पसरल्यामुळे एकूणच हवाई प्रवास धोक्याचा बनला आहे.

अख्खे जग हादरवून सोडणाऱ्या अहमदाबाद येथील १२ जूनच्या विमान अपघाताला गुरुवारी एक आठवडा पूर्ण होईल. तिथल्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनजवळच्या गॅटविककडे झेपावलेले विमान लगतच्या रहिवासी वस्तीत पडले. प्रवासी व पायलटसह कर्मचारी मिळून २४२ जणांपैकी केवळ एक जण वाचला. विश्वास कुमार रमेश नावाचा तो प्रवासी बचावला हा केवळ चमत्कार मानला गेला. टाटा समूहाच्या एअर इंडिया कंपनीकडून चालविले जाणारे बोइंग कंपनीचे ७८७ ड्रीमलायनर हे महाकाय विमान बी. जे. मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी वसतिगृहावर कोसळले. तिथे राहणारे काही भावी डॉक्टर, परिसरातील नागरिक मिळून पावणे तीनशेच्या आसपास जीव या अपघातात गेले. जळालेल्या मृतदेहांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटविण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. शेकडो कुटुंबे या महाभीषण अपघाताने उद्ध्वस्त झाली.

मृतांमध्ये कर्तबगारीचा झेंडा सातासमुद्रापार रोवणारे प्रतिभावंत होते, व्यापारी-उद्योजक होते. भविष्याची स्वप्ने डोळ्यांत घेऊन लंडनला निघालेले काही होतकरू होते. घरगुती समारंभ, काही कार्यक्रम आटोपून दूरदेशी स्थायिक झालेल्या आप्तेष्टांकडे निघालेले काही जण होते. गेला आठवडाभर देशात व जगभर या भयंकर अपघाताचीच चर्चा आहे. प्रत्येक संवेदनशील माणूस पुन: पुन्हा हळहळतो आहे. मनामनांत आक्रोश सुरू आहे. अपघाताच्या दृश्यांनी अनेकांची झोप उडाली आहे.

केवळ सामान्य माणूसच नव्हे, तर देशाचे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय म्हणजेच ‘डीजीसीए’देखील हादरले आहे. असा अपघात देशाच्या कोणत्याही भागात घडला असता तरी भारतीय जनमानस असेच स्तब्ध झाले असते. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या गुजरात या गृहराज्यात हा अपघात घडला आणि संपूर्ण यंत्रणा थोडी अधिक हलली, खडबडून जागी झाली. आता सगळ्या विमानतळांवर विमानांची सर्व प्रकारची तपासणी सुरू आहे. कोणत्याही प्रकारची थोडी जरी शंका आली तरी उड्डाण थांबविण्यात येते. पूर्णपणे निर्दोष व्यवस्थेत विमान आकाशात झेपावेल याची काळजी घेतली जाते. हजारो किलोमीटर अंतर कापावे लागते अशा आंतरराष्ट्रीय उड्डाणाविषयी तर डोळ्यांत तेल घालून पहारे दिले जात आहेत. त्यामुळेच मंगळवारी एकाच दिवशी एअर इंडियाच्या सहा ड्रीमलायनर विमानांची उड्डाणे ऐनवेळी थांबविण्यात आली. त्याशिवाय सॅन फ्रान्सिस्कोवरून मुंबईला येणाऱ्या बोइंग-७७७ विमानाचा प्रवास सायंकाळी उशिरा कोलकाता येथेच थांबविण्यात आला.

प्रवाशांना मुंबईपर्यंत पोहोचविण्यासाठी दुसरी व्यवस्था करण्यात आली. पश्चिम आशियातील ओमान देशातील मस्कतवरून कोचीमार्गे दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यामुळे ते नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. तपासणीअंती स्पष्ट झाले की, बॉम्ब वगैरे काही नाही. तेव्हा, काही तासांनंतर ते विमान दिल्लीकडे झेपावले. बुधवारी सकाळी दिल्लीवरून इंडोनेशियातील बाली बेटाकडे निघालेले विमान त्या भागात ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याच्या कारणाने माघारी वळविले गेले. लेवोटोबी पर्वतरांगांमधील लाकी-लाकी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे अवकाशात तब्बल १० हजार फूट उंचीपर्यंत राख व धूर पसरल्यामुळे एकूणच हवाई प्रवास धोक्याचा बनला आहे. थोडक्यात, देशातील हवाई प्रवासात पुन्हा कोणताही अपघात होणार नाही, प्रवास सुखरूप होईल, याची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. 

अहमदाबाद अपघातानंतर तांत्रिक दोष किंवा अन्य संशयावरून मंगळवारपर्यंत तब्बल ८३ फेऱ्या थांबविण्यात आल्या आहेत. त्यात ७८७ ड्रीमलायनरची संख्या ६६ आहे. या दक्षतेसाठी ‘डीजीसीए’ची पाठ थोपटायला हवी हे खरे. तथापि, हे करताना अहमदाबाद अपघाताचे कारण शोधण्याचे काम थांबायला नको. कारण, अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या बोइंग ७८७ ड्रीमलायनरची दोन्ही इंजिने एकावेळी बंद पडणे, उड्डाणानंतर विमानाने जेमतेम ६२५ फूट एवढीच उंची गाठणे, उंची गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या पंखांवरील ॲलिराॅनच्या झडपा उघडलेल्या नसणे, एअरब्रेक व लँडिंग गीअर अंमलात येणे हे सारे एकाचवेळी घडणे अपवादातील अपवाद म्हणूनदेखील पटण्यासारखे नाही. केवळ अपघात म्हणून ही घटना सोडून देणे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य होणार नाही. तेव्हा, डीजीसीए सध्या दाखवत असलेली सजगता, दक्षता कायम ठेवतानाच अहमदाबाद अपघाताच्या चौकशीलाही वेग द्यायला हवा. प्रत्येक प्रवासासाठी अशीच काळजी घ्यायला हवी. तरच आकाशीचा देव हवाई प्रवासावर प्रसन्न राहील. प्रवासी सुरक्षित राहतील आणि हरेक प्रवास आनंददायी असेल.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाInternationalआंतरराष्ट्रीय