‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जगभर भारताचे खासदार पोहोचले आणि आता आपली भूमिकाही आंतरराष्ट्रीय समुदायापर्यंत पोहोचू लागली आहे. भारताचा हा राजनैतिक विजय आहे. भारताची भूमिका बरोबर आहेच, पण जगासमोर ती जाणेही तेवढेच आवश्यक होते. भारत आणि पाकिस्तान हे दोन देश तयार होऊन आठ दशके होत आली, तरी पाकिस्तानला अद्याप शहाणपण यायला तयार नाही. पुलाखालून एवढे पाणी वाहून गेले, तरीही हा ताण संपायला तयार नाही. या आडमुठेपणामुळे पाकिस्तान स्वतः तर ‘फेल्ड स्टेट’ झालाच, पण भारताच्या वाटेतही मोठा अडसर तयार झाला. अशावेळी पाकिस्तानला नमवणे जेवढे महत्त्वाचे, तेवढीच जगासमोर या ढोंगीपणाची पोलखोल अपरिहार्य. जागतिकीकरणानंतरच्या जगात संघर्ष दोन देशांमध्ये असला, तरी हा मुद्दा कळत-नकळत अवघ्या जागतिक समुदायासमोर असतो. ‘ऑपरेशन सिंदूर’चा उद्देश आणि पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड करण्यासाठी देशातील खासदारांचे शिष्टमंडळ दोन दिवसांपूर्वी विविध देशांमध्ये रवाना झाले, ही बातमी म्हणूनच आश्वासक.
भारताच्या दहशतवादविरोधी लढ्यासाठी जगाचे मिळत असलेले समर्थन भारताला बळ देणारे आहे. भारत-पाकमधील संघर्षात अमेरिकेने केलेली मध्यस्थी सर्वसामान्य नागरिक आणि विरोधकांना रूचलेली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या शस्त्रसंधीच्या घोषणेवरून विरोधकांनी आरोपांची राळ उठवली. केंद्र सरकारला लक्ष्य केले. त्यापासून लक्ष हटवण्यासाठी ही नवी शिष्टाई केली जात असल्याची चर्चा आहे. त्यासाठी वापर विरोधकांचाच होत आहे, ते वेगळेच. पण, अशा पक्षीय अंगाने याकडे बघून चालणार नाही. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी खासदारांच्या भेटीच्या उपक्रमाबद्दल माहिती देत भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये आपले खासदार जगभरातील ३३ देशांच्या राजधान्यांना भेट देत आहेत. त्याचे सात सर्वपक्षीय गट तयार केले आहेत. त्यात माजी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताने केलेली लष्करी कारवाई फक्त दहशतवादाविरोधात होती, हा प्रमुख संदेश मित्र देशांना देण्यात येणार आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी होते. ही कारवाई पाकिस्तानी नागरिक वा लष्कराविरोधात नव्हती, हा संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावर या दौऱ्यात दिला जात आहे. पाकिस्तानमधून दहशतवादाला कसे खतपाणी घातले जाते, पाकिस्तान दहशतवाद्यांना भारताविरोधात रसद पुरवत असून, विविध स्तरांवर पाठिंबा देत आहे, हा मुद्दाही वेगवेगळ्या देशांच्या सरकारांसमोर मांडला जात आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे दहशतवादी गट आणि त्यांच्या संरचनांविरुद्ध होते. केलेल्या कारवाईत दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानी सैन्याने हा हल्ला स्वतःवरचा हल्ला मानला आणि प्रत्युत्तर दिले. यासंदर्भातील काही पुरावेही खासदार देत आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे, भारताने लष्करी कारवाईतही जबाबदारी आणि संयम दाखवला. कोणत्याही निष्पाप पाकिस्तानी नागरिकाचा जीव जाऊ नये, याची खात्री केली. पाकिस्तानने कारवाई थांबवण्याची विनंती केली, तेव्हा भारताने ती तत्परतेने स्वीकारली, हेही अधोरेखित होणार आहे. दहशतवादाविरुद्ध उघडपणे आवाज उठवण्यासाठी आणि त्याचा सामना करण्यासाठी, भारत-पाक वादाला ‘दहशतवादाविरुद्ध युद्ध’ म्हणून पाहण्याचे आवाहनही शिष्टमंडळ करत आहे. भारताच्या या प्रयत्नाना संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि जपानमध्ये यश आले असल्याचे दिसत आहे. दोन्ही देशांनी दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात, दहशतवादाचा सामना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे भारताच्या शिष्टमंडळास सांगितले. दहशतवादाला कोणत्याही स्वरूपात समर्थन देता येणार नसल्याचे सांगत जपानने दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत आहोत, असे सांगितले.
जपानचे परराष्ट्रमंत्री इवाया ताकेशी यांनी भारताच्या संसदीय शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली. संयुक्त अरब अमिरातीनेही गुरुवारी दहशतवादाविरुद्ध जागतिक लढाईत भारताला आपला थेट पाठिंबा दिला. ‘दहशतवाद हा केवळ एक देशासाठी धोकादायक नसून, ती जागतिक समस्या आहे. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे, याबाबत सुज्ञ नागरिकांनी आवाज उठवणे आवश्यक आहे,’ असे मत फेडरल नॅशनल कौन्सिलच्या संरक्षण व्यवहार अंतर्गत आणि परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष डॉ. अली अलनूआयामी यांनी व्यक्त केले आहे. एकूणच भारताच्या दहशतवादविरोधी मोहिमेस जागतिक समर्थन मिळत आहे. यातून भारताची भूमिका अधोरेखित होत जाणार आहे आणि पाकिस्तान एकटा पडणार आहे.