शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

बुरसटलेल्या विचारांचे विसर्जन गरजेचे !

By किरण अग्रवाल | Published: December 03, 2020 4:57 AM

व्यक्ती अगर कुटुंबाचे असो, की एकूणच समाजाचे; पुढारलेपण हे केवळ साधन-सामुग्री वा संपन्नतेवर जोखायचे नसते तर वैचारिकदृष्ट्या तो किती उन्नत किंवा प्रगल्भ झाला यावर ते मोजायचे असते.

किरण अग्रवाल  

मंगळ ग्रहावर पाण्याचे सरोवर सापडल्याने तेथे जीवसृष्टीची वसाहत साकारण्याचे आडाखे एकीकडे बांधले जात असताना, म्हणजे मनुष्य चंद्रावर व मंगळावरही पोहोचला असताना त्याच्या मनातील अमंगल विचारांचे धागे काही तुटताना दिसू नये हे खरे तर समाजशास्री वा धुरिणांपुढील आव्‍हानच म्हणायला हवे. ज्ञान-विज्ञान कितीही पुढे गेले तरी पारंपरिक समज-गैरसमजांची जळमटे सुटता सुटत नाहीत. पुढारलेपणाच्या समजात स्री-पुरुष समानतेच्या गप्पा केल्या जात असल्या तरी, वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा अशी मानसिकता बाळगणाऱ्यांच्या विचारांचे जळमटही दूर होऊ शकलेले नाही हे सुजणांना खिन्न करणारे वास्तव असल्याने समाजाच्या पुढारलेपणावर शंकाच घेता यावी.

व्यक्ती अगर कुटुंबाचे असो, की एकूणच समाजाचे; पुढारलेपण हे केवळ साधन-सामुग्री वा संपन्नतेवर जोखायचे नसते तर वैचारिकदृष्ट्या तो किती उन्नत किंवा प्रगल्भ झाला यावर ते मोजायचे असते. भौतिकतेच्या पातळीवर सुखासीन होणे म्हणजे प्रगती झाली, असे आज मानले जात असले तरी ती प्रदर्शनी प्रगती असते. खरी प्रगती ही वैचारिक - मानसिक पातळीवर होणे अपेक्षित असते, कारण बदलांचे किंवा परिवर्तनाचे प्रवाह त्यातून प्रशस्त होत असतात. त्यासाठी पै पैशाची नव्हे, तर शिक्षणाची वा जागरणाची गरज असते. विद्येविना मती नसते हे जे काही म्हणतात ते या संदर्भाने लक्षात यावे; पण विद्येची रेलचेल असलेल्या आजच्या काळातही जेव्हा काही घटना अशा घडून येतात की त्यात संबंधितांची मती मारली गेल्याचे दिसून येते तेव्हा आश्चर्य वाटून गेल्याखेरीज राहात नाही. अर्थात कालौघात समाजाच्या मानसिकतेत बराच बदल झाला आहे हेदेखील खरे; परंतु अपवादात्मक स्थितीत का होईना जेव्हा काही घटना घडून जातात तेव्हा त्या बाबतीत चिंता व्यक्त होण्याबरोबरच चिंतन करण्याची गरज व्यक्त होऊन जाते. मुलाच्या हव्यासापोटी मुलींचा गर्भातच जीव घेण्याचे प्रकार व या लालसेपायी विवाहितांच्या होणाऱ्या छळाच्या घटना यातच मोडणाऱ्या आहेत. या घटनांतून समाजातील मागासलेपण टिकून असल्याचेच दिसून येते.

विवाहितांच्या छळाची अनेक कारणे आढळून येतात, त्यात मुलगा होत नसल्याने होणाऱ्या छळाचे प्रकार अजूनही आढळून यावेत हे दुर्दैवीच म्हणायला हवे. अगदी अलीकडीलच काही घटना यासंदर्भात बोलक्या ठराव्यात. पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यात माळेगाव बुद्रुक येथे एका कुटुंबात तिसरीही मुलगीच झाल्याने अवघ्या सव्वा महिन्याच्या चिमुरडीला तिच्या जन्मदात्या आईनेच पाण्यात बुडवून ठार मारल्याची घटना समोर आली असून, मातेच्या ममत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ती आहे. सासरच्याकडील अपेक्षा काहीही व कितीही असू द्या; परंतु जन्मदात्रीनेच पोटच्या गोळ्याचा गळा घोटावा हे अतर्क्यच आहे. दुसऱ्या एका घटनेत लग्नानंतर पहिला मुलगाच हवा अशी आशा बाळगणार्‍या एका कुटुंबाने चार महिन्याच्या बाळंतीण सुनेला मारहाण करून तिच्या माहेरी पाठवून दिल्याचा प्रकार नाशिक तालुक्यातील चांदशी येथे घडला आहे. हिंगोली येथेही एका विवाहितेला मुलगीच होते म्हणून मारहाण करून तिचा गर्भ पाडला गेल्याची व नंतर तिला रॉकेल ओतून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली गेली आहे. या व अशा सर्वच घटना सुन्न करणाऱ्या असून, समाजाच्या पुढारलेपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आहेत.

कन्येच्या जन्माकडे लक्ष्मीचे आगमन म्हणून पाहिले जाऊ लागले असताना व पुरोगामी विचारांची पालखी वाहणाऱ्या महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये मुलींच्या नावाच्या पाट्या दारावर लावल्या जाण्याची प्रागतिकता दिसून येत असताना अपवादात्मक का होईना, मुलासाठी विवाहितांचा छळ होण्याचे किंवा नकोशीचा जीव घेण्याचे प्रकार घडून यावेत हे शोचनीयच ठरावे. मागे केंद्र शासनानेच केलेल्या एका सर्वेक्षणातही देशातील नकोशीचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली गेली होती. तेव्हा या संदर्भात पारंपरिक गैरसमजांची जळमटे दूर करणे गरजेचे बनले असून, केवळ शासन स्तरावरील प्रयत्नाने किंवा कायदे-कानूनमुळे हे होणार नसून सामाजिक संघटनांना व समाज धुरिणांनाही यासाठी जागरणाची भूमिका घ्यावी लागेल. वंशाच्या दिव्याबद्दलची मानसिकता बदलली तरच यासंबंधीचे यश लाभेल. ‘मुलगा मुलगी एक समान’चा नारा त्यासाठी मनामनामध्ये रुजवावा लागेल. एखाद दुसरी घटना म्हणून या प्रकारांकडे न पाहता, तसल्या बुरसट विचाराचे तंतू अजूनही समाजात आहेत यादृष्टीने त्याकडे पाहून त्या तंतूंचे, विचारांचे समूळ विसर्जन करण्यासाठी समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांकडून प्रयत्न व्हायला हवेत इतकेच यानिमित्ताने.