अमोल उदगीरकरचित्रपट समीक्षक, अभ्यासकस्वातंत्र्योत्तर भारतात कुठल्याही विकसनशील समाजात असतो तसा ‘कला महत्त्वाची की जीवनावश्यक गोष्टी महत्त्वाच्या?’ असा एक वादाचा मुद्दा होता. कारण आर्थिक स्रोत अतिशय मर्यादित होते आणि नवजात राष्ट्रासमोर उभी असलेली आव्हानं डोंगराएवढी. पण, तरीही देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी फिल्म डिव्हिजनच्या मदतीने १९५२ साली इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी)ची सुरुवात केली. पहिला ‘इफ्फी’ मुंबईमध्ये पार पडला आणि नंतर भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पोहोचला. सिनेमा संस्कृती जवळपास शून्यवत असलेल्या देशात सिनेमाचं होणारं हे ‘विकेंद्रीकरण’ खूप महत्त्वाचं होतं.
‘इफ्फी’मुळे भारतीय सिनेमा जागतिक सिनेमाशी जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. ‘इफ्फी’मध्ये अनेक बाहेरच्या देशातले सिनेमे दाखवले जातातच, त्याचबरोबर जगातल्या वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारे निर्माते, अभिनेते, दिग्दर्शक, तंत्रज्ञही ‘इफ्फी’ला येतात. सिनेमाविषयक चर्चा होतात आणि सृजनशीलतेची देवाणघेवाण होते. ‘इफ्फी’ कानाकोपऱ्यातल्या भारतीय सिनेमांना एक प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं फार महत्त्वाचं काम पण करते. जिथं अनेक वेगवेगळ्या भाषांमधले सिनेमे बनतात असा भारत हा एक अपवादात्मक देश आहे. आपल्याकडे सिनेमा बनवणं तुलनेने सोपं आहे; पण तो लोकांपर्यंत पोहोचवणं मात्र अवघड असतंं. विशेषतः आशयघन सिनेमे बनवणाऱ्या पण फारसे स्रोत नसणाऱ्या फिल्ममेकर्ससाठी ‘इफ्फी’ एक उत्तम संधी आहे. १९७५पासून ‘इफ्फी’ गोव्यात स्थिरावला. ‘इफ्फी’ला स्वतःचं हक्काचं घर मिळालं.
यावर्षीचा ५६वा ‘इफ्फी’ आजपासून गोव्यात सुरू होत आहे. यावर्षीच्या ‘इफ्फी’चा केंद्रबिंदू जपान असणार आहे. जपान आणि जपानी संस्कृतीबद्दल भाष्य करणारे काही सिनेमे यावर्षी ‘इफ्फी’मध्ये दाखवले जातील. यावर्षी ब्राझिलीयन दिग्दर्शक गॅब्रियल मस्कारो यांची ‘द ब्ल्यू ट्रेल’ ही ओपनिंग फिल्म असणार आहे. यावर्षीच्या ‘इफ्फी’चं वैशिष्ट्य म्हणजे सिनेमा क्षेत्रातल्या कारकिर्दीला ५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महानायक रजनीकांत यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गुरुदत्त, रित्विक घटक आणि भूपेन हजारिका यांच्यासारख्या महान कलावंतांच्या सिनेमाची पण स्क्रीनिंग्ज यावर्षी ‘इफ्फी’मध्ये होणार आहे. भारतासारख्या खंडप्राय देशाचा तर भाषिक, धार्मिक, सामाजिक वैविध्य हा आत्मा. हे वैविध्य यावर्षी ‘इफ्फी’मध्ये साजरं होणार आहे. तब्बल १२७ देशांमधल्या व १८ भारतीय भाषांमधल्या सिनेमांच्या प्रवेशिका यावर्षी ‘इफ्फी’साठी आल्या होत्या.
‘इफ्फी’ आणि वाद हे समीकरण तसं जुनंच. काही वर्षांपूर्वी ‘सेक्सी दुर्गा’ आणि ‘न्यूड’ या दोन सिनेमांचं स्क्रीनिंग नाकारल्यामुळे वाद झाला होता आणि याच्या निषेधार्थ काही ज्युरींनी राजीनामे पण दिले होते. काश्मिरी पंडितांची नव्वदच्या दशकात झालेली क्रूर परवड दाखवणाऱ्या ‘कश्मीर फाइल्स’ या सिनेमावरूनही ‘इफ्फी’मध्ये वाद झाला होता. एका ज्युरीनी हा ‘प्रपोगंडा सिनेमा’ आहे, असा दावा करून सिनेमाचा निषेध केला होता. हे वर्ष पण वादविरहित असेल असं काही दिसत नाही. यावर्षीचा ‘इफ्फी’ सुरू होण्यापूर्वीच ‘इफ्फी’च्या ज्युरी मंडळामध्ये एकही महिला नाही, यावरून आयोजकांवर टीका होत आहे.
सध्या सगळ्याच क्षेत्रांप्रमाणे डाव्या आणि उजव्या विचारसरणीचं घर्षण इथंही होत आहे. दोन्ही विचारसरणींची रणभूमी बनल्यामुळे आणि सिनेमा क्षेत्रात कुणाचं वर्चस्व असावं यावरून असणाऱ्या झगड्यामुळे वाद निर्माण होणं काहीसं अपरिहार्यही आहे. सत्तेत असणाऱ्या लोकांच्या सामाजिक आणि राजकीय धारणांचं प्रतिबिंब ‘इफ्फी’च्या ध्येयधोरणांमध्ये पडणं हे पण आपल्या देशाच्या एकूणच भवतालात काहीसं स्वाभाविक आहे. वादविवाद होत राहणं हे शेवटी भारतासारख्या लोकशाही देशातलं वास्तव आहेच; पण या सगळ्यात ‘इफ्फी’सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सिनेमा बॅकसीटला जाऊ नये, इतकीच अपेक्षा.
Web Summary : IFFI, started by Nehru, connects Indian cinema globally. This year focuses on Japan, honoring Rajinikanth. Despite controversies, like jury selections and film choices, the core purpose of celebrating diverse cinema should remain central.
Web Summary : नेहरू द्वारा शुरू किया गया इफ्फी, भारतीय सिनेमा को विश्व स्तर पर जोड़ता है। इस वर्ष जापान पर ध्यान केंद्रित किया गया है, रजनीकांत को सम्मानित किया गया है। जूरी चयन और फिल्म विकल्पों जैसे विवादों के बावजूद, विविध सिनेमा का जश्न मनाने का मूल उद्देश्य केंद्रीय रहना चाहिए।