शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सुतासारख्या सरळ रस्त्यांचा हव्यास धराल, तर माणसे मरणारच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 08:04 IST

निसर्गाच्या विरुद्ध वागणाऱ्या माणसांना माफी नाही, हे आपण विसरलो आहोत! भारतासारख्या डोंगरदऱ्यांच्या देशात वळणे नकोत म्हणून किती डोंगर फोडणार? 

हल्ली टीव्हीवर बातम्या लावा, नाहीतर सकाळसकाळी वर्तमानपत्र उघडा, हमखास ठरलेली बातमी म्हणजे रस्त्यावरील वाहनाचा अपघात व मृत्यूचा आकडा! हे इतके सातत्याने डोळ्यावर आदळते की, त्याबद्दल काहीच वाटेनासे झाले आहे. हल्ली लोक अपघातातील  जखमींना मदत करण्यापेक्षा फोटो व व्हिडीओ काढण्यात मग्न असतात. अपघातातील जखमी व्यक्तीला मदत केल्यास आता पोलिसांचा ससेमिरा मागे लागत नाही, पण हे किती जणांना ठाऊक आहे, कोण जाणे! जाणारे फारच घाईत असतात, त्यांच्याकडे वेळच नसतो! ज्या देशात वेळेला आणि पैशाला अति महत्त्व येते तेथे अनारोग्य वाढते. आपल्या देशाची सध्या तीच परिस्थिती आहे. 

देशात गेल्यावर्षी १,५५,६२२ लोक रस्ते  अपघातात मृत्यू पावले, असे आकडेवारी सांगते. म्हणजे दररोज ४२२ तर तासाला १८ जण दगावतात!  अपघातांची मुख्य कारणे? - तीच ठरलेली!  चालकाचा निष्काळजीपणा, लाल लाइट असताना पुढे जाणे, मध्यरात्रीनंतरच्या झोपेचा विचार न करता अवेळी प्रवासाचा हट्ट, पैसे-वेळ वाचविण्यासाठी गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबणे, गाडीची देखभाल नीट नसणे, टायर फुटणे, धुक्यात रस्ता दिसत नसताना दामटून गाडी चालविणे, ब्लाईंड कर्व्हवर बिनधास्त  वेगात पुढे जाणे... अशी नेहमीचीच! ती इतकी घातक आहेत हे माहीत असूनही लोक पुन्हा त्याच चुका करतात. काही साधे नियम पाळणे फार अवघड नाही. सीटबेल्ट लावावा, चालक व्यसनी, रागीट नसेल हे पाहावे. त्याची नीट झोप झाली आहे ना, याची खात्री करावी. प्रवासात चालकाचे खाणे, (चहा) पिणे आणि विश्रांती याची काळजी घ्यावी. गाडी अत्याधुनिक म्हणजे ऑटोमॅटिक वगैरे असेल तर ते तंत्र चालकाला माहिती आहे ना, याची खात्री करावी.

लांबचा प्रवास असेल तर उर्वरित सगळ्याच प्रवाशांनी झोपू नये, निदान एकाने तरी चालकासोबत जागे रहावे, गप्पा कराव्यात. वेगावर लक्ष असू द्यावे, अकारण आणि उद्धटपणाने ओव्हरटेक करण्याचा मोह टाळावा. वाहतुकीचे नियम आणि रस्त्याच्या कडेला लावलेल्या सूचना यांचे पालन करावे.  दर तीन-चार  तासांनी गाडी थांबवावी, विश्रांती घ्यावी. अकारण वेगाचा मोह आणि इच्छितस्थळी लवकरात लवकर पोहोचण्याची इर्ष्या टाळावी. हे एवढे केले तरी पुष्कळ अपघात कमी होतील. अर्थात, हे काही नवे ज्ञान नव्हे, ते सगळ्यांनाच माहिती असते, वारंवार सांगितले जाते; पण ऐकतो कोण? 

त्यात सध्या चर्चेत असलेला समृद्धी महामार्ग! इथे तर रोज किमान एक तरी अपघात झालाच पाहिजे, असा जणू नियम होऊन बसला आहे. मी या विषयातला तज्ज्ञ नाही, पण या रस्त्याची आखणी  सदोष असावी, असे या रस्त्यावरून प्रवास करताना मला वाटले जरूर! खूपच उंच भराव टाकून रस्ता कितीतरी उंच केला आहे आणि नाकासमोर सरळ रेषेत आखला आहे.  अनेक ठिकाणी डोंगर व झाडे तोडून रस्ता केला आहे. गाडी चालवताना वाहकाला काहीच काम नसते. नुसते स्टेअरिंग धरून ठेवायचे. या सरळसोट रस्त्यावर अफाट वेगाची  गुंगी इतकी आहे की झोपच यावी!  नकळत डुलकी लागते व अपघात होतो! 

गाडीचा वेगही १६० च्यावर. त्यात संपूर्ण रस्ता सिमेंटचा म्हणजे टायर तापून फुटण्यास  आमंत्रणच! या रस्त्यावरच्या अफाट वेगाने  प्रवाशांनाही गुंगी येऊन डुलकी लागते आणि चालकाला तर अपघात झाला कसा, हेच उमजत नाही. 

निसर्गाच्या विरुद्ध वागणाऱ्या माणसांना माफी नाही, हे आपण विसरलो आहोत!  याचे उदाहरण म्हणजे नवीन महाड-पुणे रस्ता! तो  ताम्हणी घाटातला डोंगर फोडून केला आहे.  या रस्त्यावर  वरंध घाटातून जाणाऱ्या रस्त्यापेक्षा जास्त अपघात होतात.  वरंध घाट  डोंगराचे  नुकसान न करता निसर्गानुसार केला आहे. विशेष म्हणजे वळणेदेखील सरळ न करता आहे तशीच ठेवली आहेत. भारत हा डोंगरदऱ्यांचा देश आहे, हे विसरू नये. हा काही वाळवंटी अगर पठारी भाग असलेला अरब देश नव्हे.  सुताने आखलेले असावेत असे सरळ रस्ते हवेत म्हणून डोंगर फोडण्याचा उपद्व्याप आपण जितका लवकर थांबवू तेवढे बरे! नाहीतर निसर्गाच्या विरुद्ध वागल्याची शिक्षा म्हणून भरधाव रस्त्यावर माणसे मरत राहतील, हे नक्की आहे! 

डॉ. हिम्मतराव बावस्कर, वैद्यकीय क्षेत्रातले कार्यकर्ते himmatbawaskar@rediffmail.com

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात