शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

माझाच गाव मी,  पुन्हा नव्यानं पाहिला ! 

By सचिन जवळकोटे | Updated: April 22, 2020 07:16 IST

लॉकडाऊन १ महिना पूर्ण...

- सचिन जवळकोटे

स्वातंत्र्याची लढाई आम्ही पुस्तकात वाचलेली. स्वातंत्र्यासाठी स्वत:चे प्राणही देणाºया योद्ध्यांची कहाणी आम्ही लहानपणी ऐकलेली. मात्र, आता स्वत:चाच जीव वाचविण्यासाठी बंद दरवाज्याआडच्या पारतंत्र्यात आम्ही स्वत:हून स्वत:ला झोकून दिलेलं. एक नव्हे.. दोन नव्हे.. तब्बल तीस दिवस आम्ही मास्कच्या आडून हळूच श्वास घेतला. चार फूट दुरूनच आम्ही माणसातला माणूसही चाचपडून पाहिला. होय... माझाच गाव मी, पुन्हा नव्यानं पाहिला.

धुळीच्या गराड्यात अन् धुराच्या धुराड्यात आमची सारी जिंदगानी गेलेली. नवीपेठेतल्या गर्दीत नेहमीच छाती दडपलेली. मधल्या मारुतीजवळच्या कलकलाटाची कानाला सवय झालेली. मात्र, सरस्वती चौकातला शुकशुकाट प्रथमच अनुभवला. मेकॅनिकी चौकातला भीषण सन्नाटा शहरभर व्यापून राहिला. होय... माझाच गाव मी, पुन्हा नव्यानं पाहिला.

एसटी स्टँडसमोरची अस्ताव्यस्त वर्दळ तशी पाचवीला पुजलेली. रिक्षावाल्यांच्या कचाट्यातून कसंबसं आत शिरताना बाहेरची एसटी नेहमीच दमलेली. गेटवरच्या टॉयलेटची दुर्गंधी नव्या पाहुण्यांसाठी नेहमीच अनाकलनीय ठरलेली. मात्र, महिनाभरात इथला वास तर सोडाच, राजवाडे चौकातल्या गजºयाचा सुगंधही आम्हाला पोरका झाला. सोलापुरी भैय्या अन् राजस्थानी भैय्याचा पाणीपुरी गाडा केवळ मृगजळच ठरला. होय.. माझाच गाव मी, पुन्हा नव्यानं पाहिला.आयुष्यभर खारब्याळीची सवय लागलेली. एकाच दाळीसोबत ताटातली भाकरीही आम्ही कैकदा आवडीनं संपविलेली. मात्र ‘लॉकडाउन’ची घोषणा होताच आम्हाला जगातल्या साºया भाज्या जणू प्राणप्रिय ठरलेल्या. रोज सकाळी मार्केटमध्ये एकमेकांना खेटून आम्ही भाजी खरेदीसाठी सरसावलेलो.. उद्या कदाचित खायला काही मिळणारच नाही, असा साक्षात्कार जणू आम्हाला जाहला. ‘सोलापूरला काय होत नसतं रेऽऽ’ म्हणत ‘सोशल डिस्टन्सिंगचा आम्ही पुरता बाजार मांडला. होय.. माझाच गाव मी, पुन्हा नव्यानं पाहिला.

जेवल्यानंतर शतपावली म्हणून उगाच टू-व्हीलरवर गावभर भटकण्याची आमची जुनी स्टाईल नेहमीच चर्चेत राहिलेली. त्यामुळे आताही घरातल्या घरात ढेकर न दाबता सात रस्त्याकडं पावलं वळलेली. ‘मेंबरचं नाव सांगितलं की पोलीसबी काय करत नसतेत बगऽऽ,’ म्हणणारेही बरोबर तावडीत सापडलेले. ‘पार्श्वभागावरची काठी लई डेंजर बाबोऽऽ’ हाही ठसठसता अनुभव प्रथमच ज्ञानात भर टाकून गेलेला. ‘कोरोनासे नही साबऽऽ लाठीसे डर लगता है, हा डायलॉगही कळवळलेल्या अंगाला आठवलेला. होय.. माझाच गाव मी, पुन्हा नव्यानं पाहिला. सुरुवातीला गंमत म्हणून आम्ही कोरोनाची भरपूर चेष्टा केलेली. व्हॉटस्अ‍ॅपचे सारे ग्रुप फारवर्ड जोक्सनी भरून टाकलेले. गल्लीतल्या बाळ्याच्या गळ्यात हात टाकून स्पेन-इटलीवर खदखदून हसलेलोही. मात्र, तेलंगी पाच्छापेठेत पहिला ‘ब्रेकिंग बॉम्ब’ फुटताच आम्ही पुरते भेदरलेलो. चीनचं संकट आता आपल्याही घरात घुसलंय, हे लक्षात येताच दाराच्या कड्या-कोयंडा बाळ्या शोधू लागला. शेजारच्या घरात खोकण्याचा आवाज आला तरी तो घाबरून स्वत:च कफचं औषध घेऊ लागला. होय.. माझाच गाव मी, पुन्हा नव्यानं पाहिला. 

कलेक्टर अन् कमिशनर रोज कळवळून सांगत असतानाही आम्ही महिनाभर उनाडक्या करीत राहिलो. ‘लॉकडाउन’ची खिल्ली उडवत गावभर भटकत राहिलो. आता नाईलाजानं कर्फ्यू लागल्यानंतर घरातच चिडीचूप होऊन बसलो. कर्फ्यू तसा आम्हाला नवा नव्हता. गेल्या २० वर्षात कैक वेळा अनुभवलेला. त्यामुळे आता भीषण सन्नाटा कसा गल्लीबोळात पसरलेला. स्मशानशांततेचा रस्ता जणू घरापर्यंत पोहोचलेला. होय... माझाच गाव मी, पुन्हा नव्यानं पाहिला. 

नुसती ‘दानत’नव्हे.. ‘नियत’ही खूप महत्त्वाची !

महिनाभरात माणसांची अनेक नवी रूपं आम्ही पाहिलेली. जेव्हा दहा-पंधरा हजार पगारावरच्या परिचारिका जीव धोक्यात घालून ‘डेंजर झोन’मध्ये तपासणी करीत फिरत होत्या, तेव्हा लाखो रुपये कमविणारे काही डॉक्टर्स आपले दवाखाने बंद करून घरातल्या ‘एसी’त टीव्हीचा आनंद लुटू लागलेले. एकीकडे दोन-चार खाऊंची किरकोळ पाकिटं देताना फोटोसाठी हपापलेली मंडळी पाहून समोरचा कॅमेराही क्षणभर लाजून चूर झालेला. दुसरीकडे गाजावाजा न करता शांतपणे खºया भुकेल्यांना चार घास खाऊ घालणारा ‘आधुनिक हरिश्चंद्र’ फ्लॅशपासून मुद्दाम दूर राहिलेला. नुसती ‘दानत’असून चालत नाही. ‘नियत’ही खूप महत्त्वाची असते, याची मनोमन जाणीव करून देणारा महिना सोलापूरकरांनी भोगला. होय... माझाच गाव मी, पुन्हा नव्यानं पाहिला. 

माणुसकीचा हुंदका आजीबाईच्या डोळ्यात तरळला !

सोलापूरची ‘खाकी’ नेहमीच वसूलदारांमुळे चर्चेत राहिलेली. ‘झीरो पोलिसां’मुळे सतत वादातही अडकलेली. मात्र, हीच ‘खाकी’ या काळात मनाला खूप भावली. एकीकडे उडाणटप्पूंवर लाठी उगारण्यासाठी हात उंचावलेला.. तर दुसरीकडे गरीब भुकेल्यांना बिस्किटं देताना हाच हात हळूच झुकलेला. माणुसकीचा हुंदका या बिचाºया आजीबाईच्या डोळ्यात तरळलेला, तेव्हाच माझा गाव माझ्यासाठी लाख मोलाचा ठरला. होय.. माझाच गाव मी, पुन्हा नव्यानं पाहिला. 

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस