समाजात जसा वाईटपणा आहे, तसा चांगुलपणाही आहे. असत्याचे पावलोपावली दर्शन घडत असले, तरी कोठे ना कोठे सत्याची कास धरून चालणारेही आढळतात. अशुभ घटनांचा सुकाळ दिसत असला, तरी शुभाचा दुष्काळ आहे असेही म्हणता येणार नाही. परजिवाविषयीची आस्था, आपुलकी पूर्णत: लयास गेली असे म्हणूनही चालणार नाही. ज्या ज्या वेळी महाराष्ट्रावर अस्मानी, सुलतानी संकट ओढवले त्या त्या वेळी संवेदना शाबूत असलेले माणुसकीचे पुजारी मदतीसाठी धावून आलेले आहेत. मग ते संकट भूकंपाचे असो, त्सुनामीचे असो, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे असो वा एखाद्या दुर्घटनेचे असो. यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट असताना जगाचा अन्नदाता असलेला बळीराजा हवालदिल झाला आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या थांबलेल्या नाहीत. अशा बिकट परिस्थितीत राज्य आणि केंद्र आपापल्या पातळीवर उपाययोजना करीत असताना राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या एक दिवसाच्या वेतनाची सुमारे सहा कोटी २६ लाख ३१ हजार ४८९ रुपयांची रक्कम दुष्काळनिधी म्हणून दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून उभी झालेली एवढी मोठी रक्कम दुष्काळनिधीसाठी निश्चितच हातभार लावणारी आहे. सव्वासहा कोटींचा मदतनिधी दुष्काळासाठी उभा करून एसटी कर्मचाऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. आतापर्यंत एसटी हीच ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असल्याचे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक होते; परंतु आपल्या वेतनातून मदतनिधी उभारून एसटी कर्मचारीसुद्धा जनतेच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. या निधीचा कसा विनियोग करावा ही आता राज्य सरकारची जबाबदारी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मुंबई सेंट्रल आगारात एसटी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आठ योजनांच्या शुभारंभाचा कार्यक्रम घेतला होता. त्याठिकाणी सदर मदतनिधी जाहीर करण्यात आला. वास्तविक एसटीचे चालक-वाहक रात्रंदिवस जीव धोक्यात घालून प्रवाशांच्या सेवेसाठी कर्तव्य बजावत असतात; परंतु त्यांना इतर महामंडळांच्या तुलनेने वेतन अल्प असून, सेवानिवृत्तीनंतर पाचशे रुपयात पती-पत्नीसाठी सवलतीचा पास देण्याची मागणीही दहा वर्षांपासून प्रलंबितच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून, सर्व कर्मचारी हासुद्धा आपला परिवार आहे. आजपर्यंत त्यांच्याकडे परिवार म्हणून कोणी पाहिले नव्हते असे नमूद केल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. फक्त एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण केव्हा होते, ते बघणे महत्त्वाचे ठरेल.