शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ही शिरजोरी तर पुरोगामी शक्तींच्या बदनामीसाठीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 23:54 IST

लॉकडाऊनच्या काळात वांद्रे रेल्वेस्टेशन येथे परप्रांतीय कामगारांचा जमाव जमवण्याचा उद्देश राज्य सरकारला अडचणीत आणण्याच्या कारस्थानाचा भाग होता.

सुभाष थोरातलोकमतच्या दि. २५ एप्रिलच्या अंकात माजी शालेय मंत्री आणि भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी काही ‘घटना आणि त्यामागचे बावटे’ या शीर्षकाखाली एक लेख लिहून ‘सीआयटीयू’सह डाव्या कामगार संघटना, डावे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. आपण ज्यावेळी आरोप करतो, त्या आरोपामागील राजकारण काय आहे, याची स्पष्टता मांडली गेली पाहिजे.लॉकडाउनच्या काळात वांद्रे रेल्वेस्टेशन येथे परप्रांतीय कामगारांचा जमाव जमवण्याचा उद्देश राज्य सरकारला अडचणीत आणण्याच्या कारस्थानाचा भाग होता. कारण, यानंतर भाजपचे प्रवक्ते, नेते ज्या पद्धतीने मीडियाला सामोरे जात प्रतिक्रिया देत होते, त्यातूनही दिसून येत होते. सुरुवातीला भाजपप्रणीत मीडियाने वांद्रे रेल्वेस्टेशनबाहेर असलेल्या मशिदीचा वापर करून जणू मुस्लिम जमले आहेत, असे भासवून मुस्लिमांना कोरोनाचे गांभीर्य नाही. त्यांना भारतभर कोरोना पसरवायचा आहे, ही तबलगी जमातच्या वेळी पुढे आणलेली थिअरी आणखी पुढे न्यायची होती आणि मुंबईत हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण करायचा होता. पण, ते खोटे उघडकीस आल्यानंतर त्यांचा हिरमोड होऊन नंतर त्यांनी राज्य सरकारला राज्य करणे कसे जमत नाही वगैरे आरोप पुढे आणले.

आता शेलार यांनी आणखी नव्या थिअरीचा शोध लावला, तो म्हणजे डाव्या कामगार संघटनांनी हा जमाव जमवला होता. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र सीआयटीयूचे सेक्रेटरी डॉ. विवेक माँटेरो यांचे नाव उघडपणे घेतले आहे. डॉक्टर माँटेरो यांनी त्यांच्यावर लावलेल्या बिनबुडाच्या आरोपाबद्दल आशीष शेलार यांना पत्र पाठवून सदर मजकूर मागे घेऊन माफी मागावी, असे सांगितले आहे.

स्थलांतरित कामगार व नागरिकांना मदत करण्यासाठी सीटू, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, डावे पक्ष, स्वयंसेवी संस्था आपापल्या परीने जेवण, अन्नधान्य पुरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुंबईतील अंधेरी, घाटकोपर, कुर्ला, वांद्रे अशा अनेक भागांत स्थलांतरित कामगारांना मदत करण्याचे कार्य सुरू आहे.आशीष शेलार यांच्या मतदारसंघातही सीआयटीयू यथाशक्ती मदत करत आहे. याबाबत सहकार्य करण्याचे व संयुक्तपणे काम करण्याबाबत डॉ. विवेक माँटेरो यांनी खुद्द शेलारांशी चर्चाही केली होती. हे ज्ञात असूनही शेलार यांनी केलेले आरोप खेदजनक आहेत.

दुसरी घटना पालघरची. दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या हत्येची. ही घटना ज्या गावात घडली, ते गाव सीपीएमचे निवडून आलेले आमदार विनोद निकोले यांच्या मतदारसंघातील आहे. असे असले तरी, हे गाव गेल्या १० वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. घटना घडली तेव्हा काही शहानिशा न करता काही जणांनी सुरुवातीला मुस्लिमांनी हत्या केली, असे खोटे पसरवण्यास सुरुवात केली.सत्य उघड होईपर्यंत देशभर हिंदू-मुस्लिम तणाव वाढून दंगलीची परिस्थिती निर्माण होईल, हा त्यांचा डाव होता. पण, त्यांचे हेही खोटे उघड झाल्यानंतर त्यांनी कम्युनिस्टांवर खापर फोडण्यात सुरुवात केली. संबित पात्रा आणि आरएसएसचे देवधर यांनी उघडपणे तसे आरोप केले. त्यांच्यावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कायदेशीर कारवाई करणार आहे. आता हे उघड झाले आहे की, या घटनेसंदर्भात अटक आरोपींमध्ये असलेले लोक भाजपशी संबंधित आहेत व त्यातील कोणाचाही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी दुरान्वयेही संबंध नाही.या दोन्ही घटनांमध्ये कम्युनिस्टांचा काडीचाही संबंध नसताना कम्युनिस्टांना गोवण्याचा व बदनामी करण्याचा प्रयत्न शेलार यांनी केला आहे. या घटनेच्या संदर्भाने आपण विचार करू. महाराष्ट्रात आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे आघाडी सरकार आहे.

या सरकारला डाव्या पक्षांच्या मुद्दयावर आधारित पाठिंबा आहे. प्रसंगी जनतेच्या विरोधी असणाऱ्या धोरणांना विरोध करण्याचे स्वातंत्र्य डाव्या पक्षांनी अबाधित ठेवले आहे. त्यामुळे वरील दोन्ही घटना घडवून, राज्य सरकार लॉकडाउनच्या काळात चांगले काम करत आहे, अशावेळी त्यांना अपशकुन होईल, असे राजकारण करण्याचा डाव्या पक्षांना काही राजकीय फायदा नाही. अशा स्वरूपाचे संधिसाधू, निर्बुद्ध राजकारण करण्याची डाव्या संघटनांची, पक्षांची परंपरा नाही. त्यामुळे या घटना घडवण्यात त्यांना काही स्वारस्य नसणार, ही बाब तार्किकदृष्ट्या कोणीही मान्य करेल. विरोध करायचाच तर ते केंद्रातील भाजप सरकारच्या गलथान कारभाराचा करतील.

या दोन घटनांनंतर शेलार यांनी पंतप्रधान मोदी यांचे सरकार आल्यापासून जेएनयू, एल्गार परिषद, वांद्रे ते पालघर तसेच गेट आॅफ इंडियाला झालेले आंदोलन आदी घटनांचा उल्लेख केला आहे. उमर खालिद, कन्हैया कुमार, हार्दिक पटेल यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थितीचा उल्लेख करून या शक्तींचे स्लीपर सेलचे धागेदोरे गडचिरोली ते कासा-पालघरपर्यंत आहेत काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. खोटा प्रचार कसा करावा, ज्याला फॅसिस्ट प्रचार म्हणतात, त्याचा उत्तम नमुना आहे. वरील घटनांचे कर्तेधर्ते हेच. म्हणजे, करणारे हेच आणि आरोप दुसऱ्यांवर. सत्तेचा दुरुपयोग व खोटारडेपणाचा कळस म्हणतात, तो हाच.

हिंसेचा आधार घेऊन राजकारण करणारे माओवादी आणि राज्यघटनेला अनुसरून राजकारण करणारे डावे पक्ष यांना सगळे एकच आहेत, असे भासवणे यामागे मुस्लिमांनंतर डाव्यांना बदनाम करण्याचे कारस्थान आहे. माओवाद्यांबरोबर अर्थातच डाव्यांचा काही संबंध नाही. असलाच तर तो राजकीय मतभेदांचा. त्यामुळे डाव्यांना आणि पुरोगामी शक्तींना बदनाम करण्याचे शेलारांचे कारस्थान देशातील कामगार, शेतकरी, दलित, आदिवासी, पुरोगामी कष्टकरी जनता यशस्वी होऊ देणार नाही, हे त्यांनी चांगले लक्षात ठेवावे.

शेलार आणि भाजपच्या अशाच खोटारड्या आणि दुसºयाला बदनाम करण्याच्या कटकारवाया व कारस्थानांमुळे शिवसेना भाजपपासून दूर गेली आणि काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. त्यामुळे शेलार यांच्या भाजपला सत्ता राखता आली नाही आणि म्हणूनच त्यांचा जळफळाट होत आहे. त्यातून ते डावे पक्ष व राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी गोबेल्सप्रमाणे खोटारडेपणाने बदनामी करीत आहेत.

(लेखक मार्क्सवादी कम्युनिस्ट कार्यकर्ते आहेत.)

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपा